एकाच दिवसातील गेल्या दोन महिन्यांतील सुमार कामगिरी बजावत सेन्सेक्स मंगळवारी २६,५०० च्याही खाली आला. तर शतकी घसरणीमुळे निफ्टीनेही ८ हजारांखालील पातळी गाठत तीन आठवडय़ांचा नीचांक नोंदविला. सलग दुसऱ्या व्यवहारात रुपयाच्या ६१ खालील गटांगळीचीही बाजाराने नकारार्थी दखल घेतली.
व्याजदर निश्चितीबाबतची अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हची बैठक मंगळवारी उशिरा सुरू होण्यापूर्वीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ३२४.०५ अंश घसरण राखत २६,४९२.५१ हा स्तर गाठला. तर १०९.१० अंश आपटीने निफ्टी ७,९३२.९० वर येऊन ठेपला. दोन्ही निर्देशांकांमध्ये जवळपास सव्वा टक्के घट झाली.
सेन्सेक्सने यापूर्वी १ ऑगस्ट रोजी एकाच व्यवहारात तब्बल ४१४.१३ अंश आपटी नोंदविली होती. सोमवारीही आठवडय़ाची सुरुवात करताना सेन्सेक्सने सव्वा महिन्यातील एकाच सत्रातील घसरण नोंदवली होती. तर निफ्टीने याच वेळी ८,१०० च्या खालचा प्रवास नोंदविला होता.
सोमवारी सावरलेल्या महागाई दराचे स्वागत न करणारा भांडवली बाजार दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या संभाव्य व्याजदर निर्णयावर चिंता व्यक्त करणारा ठरला. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेमार्फतही व्याजदर कपात न करण्याचे संकेत जाहीर झाल्याची प्रतिक्रियाही गुंतवणूकदारांनी नोंदविली. मध्यवर्ती बँकांची भूमिका, परकी चलनाची घसरती कमान आणि पोटनिवडणुकीतील भाजपचे अपयश या साऱ्यांभोवती बाजारातील व्यवहार मंगळवारी फिरते राहिले. मुंबई शेअर बाजारातील सर्व १२ क्षेत्रीय निर्देशांक नकारात्मक राहिले.
यापूर्वी निफ्टीनेही १ ऑगस्ट रोजी ११८.७० अंशांच्या रूपात सत्रातील सर्वात मोठी घसरण नोंदविली होती. ८ हजाराखाली आल्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा हा प्रमुख निर्देशांक तीन आठवडय़ांच्या नीचांकावर आला. तर एकूण शेअर बाजार वधारूनही गेल्या काही व्यवहारांमध्ये वाढ राखणारा मिड व स्मॉल कॅप मंगळवारी अखेर प्रत्येकी ३ टक्क्याने घसरणीच्या फेऱ्यात अडकले. २६,५०० खालील सेन्सेक्स आता २६ ऑगस्टच्या २६,४४२.८१ च्या समकक्ष येऊन पोहोचला आहे.

बाजाराला फेड चिंता
व्याजदर निश्चितीबाबत अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हची बैठक मंगळवारी उशिरा (भारतीय वेळेनुसार मध्यरात्री) सुरू  होणाऱ्या महत्त्वाच्या बेैठकीतील निर्णयाकडे बाजाराच्या नजरा खिळल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे फेडने व्याजाचे दर वाढविल्यास आणि प्रोत्साहन रोखे खरेदी थांबविल्यास, स्थानिक बाजारात गुंतवणूक करणाऱ्या फंड, वित्तसंस्था आपला पैसा काढून घेण्याची भीती आहे. गेले काही दिवस या शक्यतेने चलन बाजारात अमेरिकी डॉलरला मजबूती आली असून, रुपया कमकुवत बनला आहे. त्या उलट भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी महिनाअखेर जाहीर होणाऱ्या पतधोरणात व्याजदर कपातीची शक्यता स्पष्टपणे फेटाळणारे विधान करून बाजाराचा हिरमोड केला आहे.