शीतपेयांची जागतिक नाममुद्रा पेप्सिकोची भारतातील सर्वात मोठी सहयोगी कंपनी वरुण बेव्हरीजेस लिमिटेड भांडवली बाजारातून सुमारे १,१०० कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. या कंपनीच्या समभागांची खुली विक्री येत्या बुधवारपासून २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान प्रत्येकी ४४० रुपये ते ४४५ या किमतीदरम्यान राबविली जाणार आहे.

वरुण बेव्हरीजेस पेप्सिकोसाठी १९९० पासून देशात १६ ठिकाणी बॉटलिंग प्रकल्प चालवीत असून, १७ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिच्याकडून पेप्सीच्या उत्पादनांचे विक्री व वितरणही पाहिले जाते. पेप्सिकोच्या भारतातील एकूण विक्रीत वरुणचे योगदान २०११ आर्थिक वर्षांत २६.५ टक्के होते ते उत्तरोत्तर वाढत आर्थिक वर्ष २०१५ मध्ये ४४.१२ टक्क्यांवर गेले. शिवाय नेपाळ, श्रीलंका, मोरोक्को, मोझांबिक आणि झांबिया या देशांच्या बाजारपेठांमधील विक्रीही वरुणकडून केली जाते.

भागविक्रीतून कंपनीचे प्रवर्तक वरुण जयपुरिया आणि रविकांत जयपुरिया त्यांच्याकडील प्रत्येकी ५० लाख समभाग विकणार आहेत. भागविक्रीतून येणारा बहुतांश निधी (६३० कोटी रुपये) हे कंपनीवरील कर्जफेडीसाठी वापरात येईल. मार्च २०१६ अखेर कंपनीवर १,६९० कोटी रुपयांचे एकंदर कर्जदायित्व आहे. सामान्य वैयक्तिक गुंतवणूकदारांना या भागविक्रीत किमान ३३ समभागांसाठी बोली लावता येईल.