सौंदर्यप्रसाधन उत्पादनांना आयुर्वेदाची जोड देऊन त्याची साता समुद्रापार बाजारपेठ निर्माण करणारे ‘विको लेबोरेटरीज’चे अध्यक्ष गजाननराव केशव पेंढरकर यांचे गुरुवारी सकाळी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे चार भाऊ, एक बहीण, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे तसेच बराच मोठा परिवार आहे.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर गुरुवारी त्यांची प्राणज्योत मावळली. परळ येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव दर्शनार्थ ठेवण्यात आले होते. सायंकाळी दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांचे कुटुंबीय तसेच अनेक उद्योगपती उपस्थिती होते.
१२ सप्टेंबर १९३४ मध्ये जन्मलेल्या गजाननराव यांच्या खांद्यावर थोरले पुत्र म्हणून तरुण वयातच ५० च्या दशकात वडिलांनी स्थापित विको समूहाची धुरा आली. औषधनिर्माण विषयातील पदवीधर असलेल्या गजाननराव यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक नव्या उत्पादनांची जोड ‘विको’ समूहाला दिली. त्याचबरोबर बदलत्या बाजारपेठेनुरूप उत्पादन सादरीकरण व त्यांचे विपणन यात ते स्वत: लक्ष घालत.
विको (विष्णू इंडस्ट्रीज केमिकल कंपनी) हे त्यांच्या आजोबांच्याच, विष्णू यांच्या नावानिशी सुरू झालेली कंपनी आहे. मध्य मुंबईतील परळसारख्या भागात १,२०० चौरस फूट जागेत अवघ्या १५ ते २० जणांसह त्यांचे वडील केशव व्ही. पेंढरकर यांनी दंतमंजन उत्पादनापासून विको समूहाला सुरुवात केली. पुढे नवनवीन उत्पादनांची भर घालत विको ही नाममुद्रा साता-समुद्रापार नेण्यात गजाननरावांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
विको कंपनीचे महाराष्ट्रात (डोंबिवली व नागपूर) दोन व गोव्यात एक उत्पादन निर्मिती प्रकल्प आहे. कंपनीची उलाढाल सध्या ५०० कोटी रुपयांहून अधिक आहे. दंतमंजन, टूथपेस्ट, वेदनाशमक मलम, गोरेपणाची क्रीम, शेव्हिंग क्रीम आदी सौदर्यप्रसाधनांशी आयुर्वेदाची सांगड समूहाने घातली आहे.
गजाननराव यांच्या निधनानिमित्त शनिवार, १० ऑक्टोबर रोजी परळ येथील निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता शोकसभा आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांचे थोरले पुत्र संजीव पेंढरकर यांनी दिली.

श्रद्धांजली..
‘विको गर्ल’ ओळख मिळाली
अभिनय क्षेत्रातील माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मला ‘विको’च्या माध्यमातून संधी मिळाली. उत्पादनासाठीच्या जाहिरातीमधील माझ्या छायाचित्रामुळे परदेशात ‘विको’चा खप वाढला, अशी त्यांची भावना होती. त्यामुळेच १९९५ पासून त्यांनी माझे छायाचित्र अगदी आतापर्यंतही कायम ठेवले. ‘विको गर्ल’ ही माझी ओळख त्यांनीच मला दिली. त्यांच्यामुळे खरा उद्योजक कसा असतो हे मला अगदी जवळून अनुभवता आले.
’ मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री, ‘विको’ची सदिच्छादूत
मराठी उद्यमशीलतेचा प्रेरणास्रोत
आयुर्वेदाच्या माध्यमातून तत्कालीन करधोरणाचा खुबीने वापर त्यांनी करून घेतला. व्यवसायातील अपयशही प्रसंगी खेळकरपणे कसे स्वीकारले जाऊ शकते हे त्यांच्याकडून शिकता आले. अपयशामुळे खचून न जाता त्याच हिमतीने पुन्हा उभे राहणे हेच यशस्वी उद्योजकाचे गमक आहे हा विचार त्यांनी तरुण वर्गालाही दिला. अपयश हे तात्पुरते असते; तर यश हे कायमचे, हे त्यांनी वेळोवेळी स्व-कतृ-त्त्वातून बिंबविले.
’ राम भोगले, संचालक, निर्लेप अप्लायन्सेस
प्रवाहाच्या विरूद्ध वेगळी वाट
शिस्तबद्धता, वक्तशीरपणा या गजाननरावांच्या अनुकरणीय बाबी होत. उद्यमशीलतेत नव्या कल्पना आणून त्या यशस्वीपणे राबविणे हे त्यांनी सार्थ केले. आयुर्वेदाची कास धरत प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तुम्हाला आवडेल ते नाही तर शरीरारोग्यासाठी आवश्यक ती उत्पादने विकण्याचे विपणनशास्त्र त्यांनी अवगत केले होते. व्यवसायातील स्वामित्वाद्वारे अनेक रोजगार उपलब्ध करता येतात, अनेक कुटुंबे स्थिरावतात हे त्यांनी प्रत्यक्षातून दाखविले.
’ प्रा. सुभाष सावरकर, गजाननरावांवरील आत्मचरित्राचे संकलक