१.५४ कोटी रुपयांच्या सेवा कर बुडविले प्रकरणात सेवा कर विभागाने बुधवारी व्हिडीओकॉन समूहातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक केली. सायंकाळी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. समूहाशी निगडित मालमत्ता व्यवहार क्षेत्रातील हा अधिकारी असून त्याचे नाव नागराज कोतवाल असे आहे. व्हिडीओकॉन समूहातील नेक्स्ट या विद्युत उपकरण दालनांसाठीच्या भाडेतत्त्वावरील जागेसाठी मुद्रांक कागदपत्रांचे व्यवहार करताना इव्हान्स फ्रॅजर या कंपनीने १.५४ कोटी रुपयांचा सेवा कर चुकविल्याचे सेवा कर आयुक्त सुशील सोलंकी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. दरम्यान समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांनी मात्र वृत्तसंस्थेजवळ कर भरल्याचा दावा केला व अधिकाऱ्याला अटक केल्याचा इन्कार केला. नेक्स्ट रिटेलसाठी इव्हान्स फ्रॅजरने २००८ मध्ये करार केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे; मात्र यासाठीचे मुद्रांक कागदपत्रे मात्र ऑगस्ट २०१३ मध्ये खरेदी केल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. जागेचा वापर व देखभाल तसेच दुरुस्ती या कारणास्तव उभय कंपन्यांमध्ये १५ कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचेही सांगण्यात आले.