डिआजिओ व्यवहार आठवडय़ात; किंगफिशरचा आराखडाही लवकरच
यूबी समूहाचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांना सुरू असलेली साडेसाती संपण्याच्या मार्गावर आहे. ब्रिटनच्या डिआजिओमार्फत फायद्यातील यूबीतील मोठा हिस्सा खरेदी करण्याची प्रक्रिया चालू आठवडय़ातच होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे; तर किंगफिशर या कर्जसंकटातील विमान वाहतूक कंपनीही नव्या आर्थिक आराखडय़ांसह सज्ज होऊ पाहत आहे.
स्वत: मल्ल्या यांनी डिआजिओ-यूबी समूहातील यूनायटेड स्पिरिट यांच्या भागीदारीच्या व्यवहारावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याचे संकेत दिले आहेत. तर किंगफिशर सशक्त अशा वित्तीय आराखडा नागरी हवाई महासंचालनालयाला त्वरित देईल, असेही किंगफिशर एअरलाईन्सने स्पष्ट केले आहे. मद्य निर्मितीतील मल्ल्या यांची यूनायटेड स्पिरिटमधील ५१ टक्के हिस्सा डिआजिओ कंपनी खरेदी करणार आहे. येत्या आठवडाभरात होणारा हा व्यवहार ११ हजार कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे. यामुळे यूनायटेड स्पिरिटच्या व्यवस्थापन पदांवर मात्र कोणताही बदल होणार नाही; मल्ल्या हेच स्पिरिटचे अध्यक्ष असतील, असेही समजते. कंपनीच्या सप्टेंबरमधील वार्षिक सर्वसाधारण सभेत स्वत: मल्ल्या यांनी या व्यवहाराची शक्यता वर्तविली होती.
किंगफिशरचा नव्या व्यवसाय आराखडय़ावर काम सुरू आहे; त्यानंतर तो नागरी हवाई महासंचालनालयाला सादर करण्यात येईल, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला दिली.
कंपनीचा हवाई परवाना येत्या डिसेंबपर्यंतच आहे. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीपोटी कंपनीने गेल्या महिन्यात शेवटची टाळेबंदी जाहीर केली होती. त्यानंतर नेमके धोरण जाहीर होत नाही तोपर्यंत कंपनीच्या हवाई उड्डाणावर मर्यादा घालण्यात आल्या. मार्चपासून थकित असलेले वेतन देण्यासही कंपनीने सुरुवात केली आहे.    
..तर किंगफिशर उडणार नाही : स्टेट बँक
किंगफिशर एअरलाईन्सने येत्या ३० नोव्हेंबपर्यंत नव्याने निधी उभारला नाही तर कंपनीचे एकही विमान उडू शकणार नाही, अशी भीती कंपनीला मोठय़ा प्रमाणात कर्ज देणाऱ्या राष्ट्रीयीकृत भारतीय स्टेट बँकेने व्यक्त केली आहे.
कंपनी पुन्हा कार्यरत होण्यासाठी विविध १७ बँकांनी वेळोवेळी मुदतवाढ दिली आहे. मात्र कंपनी काहीही ठोस पावले उचलताना दिसत नाही, अशा शब्दात बँकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी यांनी प्रथमच कंपनीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
एअर इंडिया कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन
सरकारी मालकीची एअर इंडिया आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करेल, असा शब्द देण्यात आला आहे. कंपनी मे आणि जून महिन्यातील कार्यकुशलतेशी निगडित भत्ताही कर्मचाऱ्यांना देईल. दिवाळी आता अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली असून वेतन आणि या भत्त्यापोटी कंपनीला ४३० कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. केंद्रीय नागरी हवाई मंत्री अजितसिंह यांनी कंपनीला दिलेल्या निर्देशानंतर एअर इंडियाने याबाबत आजच पत्रक काढून ही माहिती जाहीर केली.
मार्च २०१३ पर्यंत कर्ज अदा करणार : जेट एअरवेज
येत्या मार्च २०१३ पर्यंत कंपनी ६० कोटी डॉलरचे कर्ज फेडेल, असा दावा खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या हवाई कंपनी जेट एअरवेजने केला आहे. नरेश गोयल प्रवर्तित या कंपनीवर सप्टेंबर २०१२ अखेपर्यंत १२ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. पैकी ३ हजार कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज फेडले जाणार आहे. कार्यरत भांडवल आणि कार्यरत भांडवली कर्ज यामाध्यमातून हे कर्ज अदा केले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीसमोर ताफ्यातील विमाने भाडय़ाने देण्याचा तसेच ती विकण्याचा पर्यायही आहे, असे जेट एअरवेजने म्हटले आहे.