भारतीय बँकांचे तब्बल नऊ हजार कोटी रूपयांचे कर्ज बुडवून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याला अंमलबाजवणी संचलनालयाने (ईडी) मोठा झटका दिला आहे. ईडीने मल्ल्याच्या तब्बल १०० कोटी रूपयांच्या समभागांची मालकी सरकारकडे हस्तांतरित केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) ही कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन इंडियाने (एसएचसीआयएल) युनायटेड ब्रेव्हरीज लिमिटेडचे १०० कोटी रूपयांच्या समभागांचे मालकी हक्क सरकारकडे हस्तांतरित केले आहेत. यापैकी अनेक समभागांची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मालकी विजय मल्ल्याकडे होती.

‘ईडी’ने दोन महिन्यांपूर्वी ‘स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन इंडिया’ला पत्राद्वारे केलेल्या मागणीनंतर या कारवाईला सुरूवात झाली होती. युनायटेड ब्रेव्हरीज लिमिटेड आणि मॅकडोनाल्ड होल्डिंग लिमिटेड या दोन कंपन्यांमध्ये मल्ल्याने वैयक्तिक आणि इतर कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल ४००० कोटींची गुंतवणूक केली आहे. पीएमएलए कायद्यातील कलम ९ अंतर्गत या समभागांची मालकी सरकारकडे हस्तांतरित करावी, असे ‘ईडी’ने ‘स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन इंडिया’ला पत्रात म्हटले होते.

किंगफिशर एअरलाईन्सचे सहा हजार कोटींचे कर्ज थकल्यानंतर ईडीने सप्टेंबर २०१६ मध्ये या समभागांवर टाच आणण्याची मागणी केली होती. ईडीची ही मागणी मान्य करण्यात आली होती. त्यानुसार यूबीएल कंपनीच्या ४ कोटींच्या अनप्लेज्ड शेअर्सवर टाच आणण्यात आली होती. तर यूएसएल आणि मॅकडोनाल्ड होल्डिंग कंपनीचे अनुक्रमे २५.१४ लाख आणि २२ लाख रूपये किंमतीचे समभाग ईडीने गोठविले होते.

पीएमएलए कायद्यानुसार समभागधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा त्याला फरारी घोषित केल्यास विशेष न्यायालय संबंधित समभागधारकाची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देऊ शकते. दरम्यान, या कारवाईनंतर मल्ल्याच्या प्रवक्त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही.