प्रक्रिया नव्याने करण्याचे न्यायालयाचे आदेश

मद्यसम्राट विजय मल्या यांच्या जेट विमानाचा लिलाव रद्द करण्यास उच्च न्यायालयाने अखेर सोमवारी सेवा कर विभागाला परवानगी दिली. परंतु त्याचबरोबर आठवडय़ाभरात या विमानासाठी नवा खरेदीदार शोधण्याची वा त्याची नव्याने विक्री करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश अमेरिकास्थित खासगी विमान ‘सीजे लिझिंग (केमन) प्रा. लि’ या कंपनीला दिले आहेत. हे विमान या कंपनीचेच असून मल्या यांच्या ‘किंगफिशर’ या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आले होते.

मल्या यांच्या विमानाच्या लिलावाला परवानगी देणाऱ्या २२ ऑगस्टच्या आदेशाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी सेवा कर विभागाने याचिका केली होती. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने सेवा कर विभागाला विमानाचा लिलाव रद्द करण्यास परवानगी देताना अमेरिकन कंपनीला नव्याने खरेदीदार शोधण्याचे आदेश दिले.

मागील सुनावणीच्या वेळेस न्यायालयाने विमानाच्या लिलावाला परवानगी देणाऱ्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. तसेच मल्या यांचे हे विमान देशांतर्गत विमानतळावर अमर्यादित काळासाठी ठेवू दिले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करताना त्याची विक्री करण्याचे सरकारला बजावले होते. मात्र लिलावाचा करार कायम ठेवला जाऊ शकत नाही, असे पुन्हा एकदा सेवा कर विभागातर्फे सोमवारच्या सुनावणीच्या वेळेस न्यायालयाला सांगण्यात आले. करार विमानाच्या लिलावासाठी निश्चित केलेल्या  रक्कमेपेक्षा ८१.८ टक्क्यांनी तुटीचा आहे, असे कारणही सेवा कर विभागाच्या वतीने देण्यात आले. परंतु लिलावाची रक्कमही अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा लिलाव कायम ठेवण्यात काही अर्थ नसून तो रद्द करण्याची परवानगीही मागण्यात आली. परंतु अमेरिकास्थित विमान कंपनीने त्याला विरोध करत लिलावाची रक्कम ठरलेलीच नव्हती. उलट विक्रीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सेवा कर विभागाला रक्कम कमी असल्याची अचानक जाग आली. परंतु त्यांच्या या सततच्या बदलणाऱ्या निर्णयामुळे आम्हाला नुकसान होत असल्याचा दावाही कंपनीतर्फे करण्यात आला. तसेच लिलाव रद्द करण्यासाठी अनुकूलता दाखवण्यात आली.