विदेशातील मालमत्ता जाहीर न केल्याबद्दल  नाराजी व्यक्त करत येत्या महिन्याभरात विजय मल्या यांनी या संबंधी स्पष्टीकरण देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.

न्या. कुरियन जोसेफ व आर. एफ. नरिमन यांच्या खंडपीठाने मल्या यांनी यापूर्वीही न्यायालयाचे विदेशातील संपत्ती जाहीर करण्याचे आदेश पाळलेले नाहीत, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. तेव्हा आता येत्या चार आठवडय़ांत मल्या यांनी विदेशातील मालकीच्या सर्व मालमत्तेची माहिती द्यावी, असेही न्यायालयाने बजाविले.

मल्या यांना फेब्रुवारी २०१६ मध्ये ब्रिटिश कंपनी दिआजिओमार्फत ४ कोटी डॉलर मिळाल्याचे न्यायालयात मंगळवारी सांगण्यात आले. त्याबाबत मल्या यांनी न्यायालयाला अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.