बँकांकडून कर्जबुडवे म्हणून शिक्का बसलेल्या विजय मल्या यांच्या पुढय़ातील संकट अधिक गहिरे झाले आहे. युनायटेड स्पिरिट्सचे अध्यक्षपद भूषवायचे असल्यास बदनामीचा शिक्का पुसा, असा इशाराच कंपनीच्या भागभांडवलावर निम्म्याहून अधिक मालकी असलेल्या डिआजिओने दिला आहे. युनायटेड स्पिरिट्सचे अध्यक्ष म्हणून विजय मल्या यांची भागधारकांनी पुनर्नियुक्ती केली आहे. या घडामोडीला एक दिवस होत नाही तोच कंपनीत ५४ टक्के हिस्सा असलेल्या ब्रिटिश कंपनी डिआजिओने मल्या यांना आधी सर्व कर्जे फेडण्याविषयी सुचविले आहे. ब्रिटनच्या या कंपनीने तिच्या भारताबाहेरील मुख्यालयातून याबाबतचे वक्तव्य जारी केल्याने मल्या यांच्या अध्यक्षपदाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. मल्या यांना युनायटेड स्पिरिट्सचे बिगर – कार्यकारी संचालक तसेच अध्यक्ष म्हणून कार्य करण्यास असलेला आक्षेप डिआजिओने कंपनीच्या संकेतस्थळावर नोंदविला आहे.