जलद तंत्रज्ञान असलेली ४जी ही दूरसंचार सेवा व्होडाफोन इंडियाही वर्षअखेपर्यंत भारतात रुजू करण्याच्या प्रयत्नात आहे. बहुप्रतीक्षित रिलायन्स जिओचे ४जी तंत्रज्ञानावरील मोबाइल सेवा याच दरम्यान प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.
देशातील सर्वाधिक मोबाइलधारक असणाऱ्या भारती एअरटेलचे ४जी भारतातील प्रमुख ३०० शहरांमध्ये काही दिवसांपूर्वीच सुरू झाले आहे. आता तिची कट्टर स्पर्धक व्होडाफोनही सज्ज झाली आहे. ४जी सेवेबाबतच्या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी नुकतीच पूर्ण झाली असून संबंधित नेटवर्कसाठी आघाडीच्या जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान पायाभूत सेवा कंपनीबरोबर भागीदारी करण्यात आली आहे, अशी माहिती कंपनीने दिली.
व्होडाफोनची अद्ययावत तंत्रज्ञानावरील दूरसंचार सेवा पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, कोटी आदी प्रमुख शहरांमधून सुरू होईल आणि त्यानंतर तिचे देशव्यापी जाळे पुढील अल्पावधीत विणले जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. ४जीसाठी मुंबई, दिल्ली, कोलकाता, केरळ आणि कर्नाटक या पाच परिमंडळांसाठी तूर्त ध्वनिलहरी परवाना मिळाला आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये झालेल्या याबाबतच्या लिलावात यशस्वी ठरलेला हा परवाना म्हणजे कंपनीचा या भौगोलिक क्षेत्रातील निम्मा व्यवसाय आहे.
मूळच्या ब्रिटनमधील व्होडाफोनची १८ देशांमध्ये ४जी सेवा आहे. त्याचे दोन कोटी ग्राहक आहेत. कंपनी याचबरोबर तिचे ३जी जाळेही भारतातील विविध सात परिमंडळांत विस्तारणार आहे. यामुळे ही सेवा देशातील दुप्पट, एकूण १६ परिमंडळांत उपलब्ध होईल.