देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोबाइल सेवा व्होडाफोनने अखेर भांडवली बाजारात प्रवेशासाठी सुसज्जता केली आहे. तर डिसेंबरपासून कंपनी मुंबईतून ४जी सेवेचा प्रारंभ करत आहे. यासाठी आवश्यक सुसज्ज जाळे विणण्यासाठी ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनीने केली आहे.
प्रारंभिक खुल्या भागविक्रीच्या तयारीत व्होडाफोन असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विट्टोरिओ कोलाओ यांनी सांगितले. कंपनीने मे २०१५ मध्येच याबाबत गुंतवणूक सल्लागार बँक रोथशिल्डची नियुक्ती केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भागविक्रीचा मानस ठेवणाऱ्या व्होडाफोनला भारतात नियामक व्यवस्था व अनेक कर विवादांचा सामना करावा लागणाऱ्या अडचणींमुळे ही प्रक्रिया मागे पडली होती.
व्होडाफोनच्या ग्राहकांना ४जी सेवा देणे सुलभ होण्यासाठी याबाबतची आवश्यक चाचणी यशस्वीरीत्या सुरू झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे. याबाबतच्या दूरसंचार जाळे अद्ययावत करण्यासाठी पायाभूत तंत्रज्ञान सुविधा पुरविणाऱ्या जागतिक सेवा पुरवठादारांबरोबर भागीदारीही करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
४जीसाठीच्या ग्राहकसंख्येत अपेक्षित असलेली वाढ तसेच तंत्रज्ञान सेवेचा वेग लक्षात घेऊन मोठय़ा प्रमाणात यंत्रणा उभारली जात असल्याचे कंपनीच्या मुंबई परिमंडळाचे व्यवसाय प्रमुख इश्मित सिंग यांनी सांगितले. डेटाच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणाऱ्या परिमंडळात मुंबईचा समावेश असून तो ३० टक्के या प्रमाणात आर्थिक महानगरीतून मिळतो, असेही सिंग म्हणाले.
व्होडाफोन १८०० मेगाहर्ट्झ या तरंगपट्टय़ामध्ये मुंबईत ४जी सुविधा देणार आहे. यासाठी शहरात गेल्या सहा महिन्यांत १,००० साइटही सुरू करण्यात आल्या आहेत. डिसेंबरमध्येच रिलायन्स-जिओचाही ४जी तंत्रज्ञानावरील सेवेमार्फत शुभारंभ होणार आहे.