जर्मनीतील फोक्सव्ॉगन या वाहन निर्मात्या कंपनीने एकूण पाच कार भारतात सादर करण्याचे ठरवले असून त्यात बीटल, एसयूव्ही तिग्वान यांचा समावेश आहे. परिणामी येत्या दोन वर्षांत कंपनीचा देशातील कार बाजारपेठेत वाटा वाढणार आहे.
फोक्सव्ॉगनने मध्यम आकाराची सेदान व्हेन्टो ही नव्या रूपात मंगळवारी दिल्लीत झालेल्या अनावरणात प्रस्तुत केली. नवीन व्हेन्टोची किंमत ७.८५ लाख ते ११.८७ लाख (दिल्लीतील एक्स शोरूम) आहे. या प्रसंगी बोलताना फोक्सव्ॉगनचे मोटार विभाग संचालक मायकेल मेयर यांनी सांगितले की, भारत ही फोक्सव्ॉगनसाठी मोठी बाजारपेठ आहे. येत्या २४ महिन्यात आम्ही आमची आणखी पाच कार भारतात उपलब्ध करून देणार आहोत.
२०१० मध्ये व्हेन्टो प्रथम प्रस्तुत करण्यात आली व आजवर १.१० लाख व्हेन्टो विकल्या गेल्या आहेत. व्हेन्टोची नवी आवृत्ती पेट्रोल व डिझेल दोन्ही प्रकारात असून भारतात कमी उत्पादन खर्चावर आधारित कारखाने सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे. स्थानिकीकरणावर कंपनी १५०० कोटी रुपये खर्च करणार असून किफायतशीर उत्पादने तयार करणार आहे. २०१८ पर्यंत आणखी नवीन मॉडेल्सचे उत्पादन चाकण येथील प्रकल्पात होईल तसेच २०१८ पर्यंत दोन लाख मोटारींचे उत्पादन करण्याचा विचार आहे.