गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत ना-नफा तत्त्वावर पुरविण्याच्या उद्देशाने वॉखार्ट फाऊंडेशनने सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स लि.बरोबरच्या भागीदारीत ‘मोबाईल १०००’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम घोषित केला आहे. या उपक्रमांअंतर्गत फिरती वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्हॅन्स सुरू केल्या जाणार असून, त्यातील पहिली व्हॅन मुंबईत चेंबूरमध्ये सोमवारी दाखल करण्यात आली. चेंबूरमधील ही व्हॅन दरवर्षी २२,५०० रुग्णांना त्यांच्या घराच्या उंबरठय़ापर्यंत जाऊन मोफत प्राथमिक आरोग्यसेवा देईल, असे नियोजन वॉखार्ट फाऊंडेशनच्या विश्वस्त व मुख्य कार्याधिकारी डॉ. हुजैफा खोराकीवाला यांनी सांगितले. सर्दी, खोकला, ताप, अतिसार, मलेरिया, डेंग्यू व अन्य साथीच्या आजारांवर प्राथमिक उपचार पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.