गेले महिनाभर शेअर बाजाराचा २०१२ मधील ‘हॉट स्पॉट’ ठरलेल्या मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप धाटणीच्या समभागांची नृशंसपणे कत्तल सुरू आहे. अनेक चांगल्या दमाच्या समभागांचे भाव महिनाभरात निम्म्यावर आले आहेत. तथापि गेल्या दोन दिवसापासून बाजाराचा अक्ष पुन्हा मिडकॅप, स्मॉलकॅपच्या दिशेने झुकू लागलेला दिसत आहे. यातून ‘मिडकॅप’बाबत नेमके धोरण काय घ्यावे याबाबत गुंतवणूकदारांच्या संभ्रमात भर पडली आहे.
जानेवारीच्या मध्यापासून बाजारातील वाढत्या वध-घटी व अस्वस्थतेचा सर्वाधिक फटका हा समभागांच्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप अवकाशाला बसला असल्याचे दृश्य स्वरूपात पुढे आले आहे. २०१२ सालात गुंतवणूकदारांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या अनेक मिडकॅप कंपन्यांच्या समभागांची बेदरकारपणे विक्री निरंतर सुरू असून, कैक समभागांचे भाव सतत खालचे सर्किट लागून घसरत आलेले पाहायला मिळतात. सोबतच्या कोष्टकात १६ जानेवारी ते १८ फेब्रुवारी (मंगळवारी प्रमुख निर्देशांकांनी घेतलेल्या पाऊण टक्क्यांच्या उभारीत, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप निर्देशांकानी अनुक्रमे १.२२% आणि ०.९०% झेप घेतली असल्याने त्या दिवसाचा अपवाद!) अनेक नामांकित मिडकॅप कंपन्यांचे भाव निम्म्यावर आलेले दिसून येतात. प्रत्येक कंपनीबाबत बाजारात उठलेल्या वेगवेगळ्या वदंता हेच घसरणीचे मुख्य कारण असले, तरी त्यात बहुसंख्या ही स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपन्यांची असल्याचे दिसते. या क्षेत्राबाबत बाजाराचा हिरमोड झाला आहे असे मानण्याचे कारण नाही. महिन्याभरात समभागांच्या भावाचा झालेला पाळापाचोळा पाहता सध्या मिड-कॅप व स्मॉल-कॅप समभागांबाबत बाजाराची धारणा साशंक बनली आहेत. अशा स्थितीत प्रवाहाविरोधी मतप्रवाह सेंट्रम या दलाल पेढीने व्यक्त केला आहे. मिडकॅपमधील घसरण असमर्थनीय असून, भावाने गाठलेला तळ खरेदीची संधी असल्याचा सेंट्रमचा दावा आहे. सेंट्रमचे मुख्य गुंतवणूक अधिकारी जी. चोकलिंगम यांच्या मते, ऑक्टोबर ते डिसेंबर २०१२ दरम्यान कंपन्यांच्या वित्तीय निष्कर्षांवर नजर फिरविली तरी मिडकॅप क्षेत्रातील कंपन्यांनी या तिमाहीत नक्त नफ्यात सरासरी ४५ टक्क्यांची वाढ दर्शविली आहे, तर सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात समाविष्ट कंपन्यांचा तिमाहीतील नफ्याचे सरासरी प्रमाण १ टक्काच आहे.
तात्पर्य : मिडकॅप समभाग गुंतवणूकदारांना अल्पावधीत मोठय़ा प्रमाणात फायदा मिळवून देतात हे २०१२ने दाखवून दिले त्याचप्रमाणे २०१३च्या पहिल्या दीड महिन्यात या समभागांमध्ये कमावलेला फायदा वेगाने हातून निसटून जातो, हेही दाखवून दिले. अशा मिडकॅपमध्ये डेरिव्हेटिव्हज् (फ्युचर्स आणि ऑप्शन्स) व्यवहार धोकादायक ठरतात, असा सावधगिरीचा इशारा सल्लागार देतात. गुंतवणूक भांडारात (पोर्टफोलियोमध्ये) मिडकॅप धाटणीच्या समभागातील गुंतवणूक ३०-३५ टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, हा मंत्र प्रत्येकानेच जपायलाच हवा.

जबर घसरलेले मिडकॅप समभाग
कंपनी                         बंद             भाव (रुपये)                 महिन्यात
                             १८ फेब्रुवारी        १६ जानेवारी             घसरण (%)
एचडीआयएल                 ६९.५०             १२०.०५                  ४५
डीबी रिअ‍ॅल्टी                  १५६.२०            ८७.७०                  ४३.९
ऑप्टो सर्किट्स               ६०.८०            १०७.१५                  ४३.३
आर्शिया इंटरनॅशनल       ३१.५५            ५४.०५                  ४१.६
बॉम्बे डाइंग                    ९८.२५            १२६.६०                  २२.४
जैन इरिगेशन                 ६३.३५            ८२.८५                  २१.१
युनिटेक                         ३०.२५            ३७.९०                  २०.२
युको बँक                       ६६.१०              ८२.४५                  १८.५
मन्नपुरम फायनान्स    ३६.२५              ४४.४५                  १८.५
फायनान्शियल टेक.      ९३१.६०            १,१३२.७५              १७.८
एमसीएक्स                  १२१६.३०           १३८९.७०              १२.५
जेपी इन्फ्राटेक              ४७.७५               ५३.२५                  ११.३
ज्युबिलन्ट फूडवर्क्‍स    १११०.३०        १२४४.८०                  १०.६