आलिशान मोटार विक्रीतील अव्वल स्थान राखण्यासाठी झटत असलेल्या बीएमडब्ल्यूने चालू वर्षांत नवीन १५ वाहने सादर करण्याचा संकल्प गुरुवारी चेन्नई येथे सोडला. त्याचबरोबर जर्मन बनावटीच्या या कंपनीने तिच्या वाहनांची ५० टक्क्य़ांपर्यंतची उभारणी भारतातच करण्याचा मनोदयही यावेळी व्यक्त केला.
कंपनीच्या सिरिज ५ मधील नवी कार क्रीडापटू व कंपनीचा राजदूत सचिन तेंडुलकर याच्या उपस्थितीत सादर केली. यावेळी कंपनीचे भारतातील अध्यक्ष फिलिप वोन सार हे उपस्थित होते. कंपनीच्या वाहनांना लागणाऱ्या २,८०० प्रमुख सुटय़ा भागांपैकी ५० टक्के भाग हे भारतातच तयार केलेले असतील, असेही ते म्हणाले. भारतातील कंपनीतील गुंतवणूक सध्याच्या ३.९ अब्ज डॉलरवरून ४.९ अब्ज डॉलर करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
कंपनीचा चेन्नई येथील प्रकल्प २००७ मध्ये सुरू झाला होता. येथे सध्या सिरिज १,३, ५, ७ तसेच एक्स१, एक्स३, एक्स५ श्रेणीतील कार तयार केल्या जातात. कंपनीची देशभरात विविध ४० विक्री दालने आहेत. कंपनीत ५५० कर्मचारी आहेत.

मा(स्टर ब्लास्टर), खासदार..
क्रिकेट विश्वातील ताईत राहिलेला व राज्यसभेत खासदारकी भूषविणाऱ्या सचिन तेंडुलकरने गुरुवारी बीएमडब्ल्यूच्या कार प्रकल्पात थेट पाना चालविला. जर्मन बनावटीच्या कार निर्मात्या कंपनीचा राजदूत असलेल्या सचिनच्या उपस्थितीत कंपनीनेही ‘मेक इन इंडिया’चे बिगुल वाजविले.

sachin_bmw2