धार्मिक पूजा, पंडित ते धार्मिक पर्यटनाची सैर घडवून आणणाऱ्या ‘व्हेअर्समायपंडित’ने तिच्या ई-कॉमर्स व्यासपीठाला अल्पावधीत मिळत असलेल्या प्रतिसादाच्या जोरावर २,००० कोटी रुपयांच्या उलाढालीचे लक्ष्य राखले आहे. या टप्प्यानंतर केवळ धार्मिक क्षेत्रासाठी वाहून घेतलेल्या या संकेतस्थळाने भांडवली बाजारातही उतरण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
वित्त, सनदी लेखापाल, आदरातिथ्य आदी व्यवसाय क्षेत्रांत कार्यरत ‘चॉइस समूहा’चे भक्कम पाठबळ मिळालेल्या ‘व्हेअर्समायपंडित’ने सध्या तिचे अस्तित्व असलेल्या निवडक प्रमुख शहरांपासून येत्या तीन महिन्यांत देशातील विविध ३० शहरांमध्ये अस्तित्व निर्माण करण्याचे निश्चित केल्याची माहिती ग्लोबल चॉइस इन्फोसोल्यूशन्स’चे उपाध्यक्ष रोनक अगरवाल यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
‘व्हेअर्समायपंडित.कॉम’च्या संकेतस्थळाच्या माध्यमातून सध्या भारतातील ९० धार्मिक स्थळांविषयीची माहिती उपलब्ध असून ही संख्या ३०० पर्यंत नेण्यात येणार आहे. यामध्ये जगभरातील धार्मिक स्थळांचाही समावेश करण्यात येणार असल्याचे अगरवाल यांनी सांगितले.
‘व्हेअर्समायपंडित.कॉम’वर सध्या विविध ६१५ प्रकारच्या पूजा सांगण्याची सुविधा उपलब्ध असून पूजा आदीशी संबंधित वस्तूंची विक्री करणाऱ्या १०० हून अधिक विक्रेत्यांशी यंदाच्या नोव्हेंबपर्यंत जोडले जाण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. येत्या दोन वर्षांत ही संख्या ५०० होईल, असेही ते म्हणाले.
कंपनीच्या मंचाशी सध्या ५०० पंडित/पुजारी जोडले गेलेले आहेत. पैकी काही तज्ज्ञ पंडित कंपनीच्या सल्लागार मंडळावरही आहेत. मोठय़ा पूजा अथवा विशिष्ट धार्मिक कार्यासाठी अशा पंडितांची फौजच उपलब्ध केली जाते. कंपनीच्या मंचावर वर्षभराच्या कालावधीत ५,००० पंडित येतील, असे अगरवाल म्हणाले.
अधिकतर प्रमाणात असंघटित असलेल्या धार्मिक क्षेत्राशी निगडित बाजारपेठ या माध्यमातून संघटित करण्याचा प्रयत्न असल्याचे नमूद करतानाच या जोरावर येत्या तीन वर्षांत त्यातील ५ टक्के हिस्सा पादाक्रांत करण्याबाबत अगरवाल यांनी विश्वास व्यक्त केला. सध्या ही बाजारपेठ वार्षिक १० टक्क्यांनी वाढत आहे, तर ई-कॉमर्ससारख्या माध्यमाची वाढ ही ४० टक्के वेगाने आहे.
संकेतस्थळाच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध असल्याने अनिवासी भारतीयांकडून होणारी विचारणा अधिक असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. सध्या कंपनीच्या एकूण व्यवसायापैकी १० टक्के हिस्सा हा रशिया, नेदरलॅन्ड, अमेरिका आदी भागांतील ग्राहकांकडून येतो, असे ते म्हणाले.
कोणत्याही एखाद्या छोटय़ा पूजेसाठीदेखील ५० ते ६० वस्तू लागतात. त्यामुळे पूजेसाठी विधी, मुहूर्त सांगतानाच अगदी मंडप आदी सर्व सुविधा या मंचाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा अनोखा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले.