अन्नधान्य स्वस्त झाल्याने सप्टेंबरमध्ये दर २.६ टक्के

सणवाराला उतरत्या महागाईने तमाम ग्राहक, खरेदीदारांना दिलासा दिला आहे. गेल्या महिन्यातील किरकोळ महागाई दरापाठोपाठ घाऊक महागाई दरातही उतार बघायला मिळाला आहे. प्रामुख्याने अन्नधान्यांच्या किंमती स्वस्त झाल्याने सप्टेंबरमध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर २.६० टक्क्य़ांवर स्थिरावला आहे.

यापूर्वीच्या महिन्यात, ऑगस्टमध्ये महागाई दर ३.२४ टक्के असा चार महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर होता. तर वर्षभरापूर्वी, सप्टेंबर २०१६ मध्ये तो १.३६ टक्के नोंदला गेला होता. सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यातील अन्नधान्याचा महागाई दर मासिक तुलनेत निम्म्याहून अधिक प्रमाणात रोडावत २.०४ टक्क्य़ांवर विसावला आहे. ऑगस्टमध्ये अन्नधान्याच्या महागाईचा दर ५.७५ टक्के होता.

अन्नधान्याच्या गटात यंदा भाज्यांचे दर घसरून १५.४८ टक्के झाले आहे. तर कांदे अद्यापही ७९.७८ टक्क्य़ांपर्यंत महाग आहेत. अंडी, मटण, मासे यांचे दर ५.४७ टक्क्य़ांवर पोहोचले आहेत. निर्मिती वस्तूंचा महागाई दर २.७२ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. तर इंधन व ऊर्जा महागाई दर गेल्या दोन महिन्यांपासून वरच्या स्तरावर कायम आहे. डाळींचे दर २४.२६ टक्क्य़ांपर्यंत घसरले आहेत. त्याचबरोबर बटाटे व गहू अनुक्रमे ४६.५२ व १.७१ टक्क्य़ांपर्यंत आले आहेत.

गेल्याच आठवडय़ात सप्टेंबरमधील किरकोळ महागाई दरदेखील ३.२८ टक्के असा कमी झाल्याचे स्पष्ट झाले. तर ऑगस्टमधील ४.३ टक्के हा औद्योगिक उत्पादन दर गेल्या नऊ महिन्यातील किमान स्तरावर आल्याचे अर्थव्यवस्थेकरिता सकारात्मक वृत्त आले होते. संथ अर्थव्यवस्था असूनही वाढत्या महागाईमुळे रिझव्‍‌र्ह बँकेने प्रमुख दरांमध्ये कोणतेही बदल केले नव्हते. तर चालू वित्त वर्षांसाठीचा विकासाचा दर ६.७ टक्के गृहित धरला होता. तर महागाई दर समाधानकारक अशा ४ टक्क्य़ांपेक्षा अधिक असेल, असे नमूद केले होते.