कांद्यासह इतर भाज्या आणि खाद्यपदार्थांच्या वेगाने वाढणाऱ्या किंमतींमुळे ऑगस्टमध्ये घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाई दराने चार महिन्यांतील उच्चांकी गाठली. महागाई दरात दुपटीने वाढ होऊन तो ३.२४ टक्क्यांपर्यंत पोहोचला. जुलै २०१७ मध्ये घाऊक महागाई दर १.८८ टक्के आणि २०१६ मध्ये १.०९ टक्के होता. त्यापूर्वी एप्रिलमध्ये घाऊक महागाई दरात तेजी पाहायला मिळाली होती. त्यावेळी महागाईचा दर ३.८५ टक्के होता.

सरकारने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये खाद्यपदार्थांच्या किंमती ५.७५ टक्क्यांनी वाढल्या. जुलैमध्ये खाद्यपदार्थांच्या किंमती २.१५ टक्के होत्या. भाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. ४४.९१ टक्क्यांनी दर वाढले. जुलैमध्ये हाच वृद्धीदर २१.९५ टक्के होता. त्याचवेळी कांद्याचे दरही ८८.४६ टक्क्यांनी वाढले. गेल्या महिन्यात यात ९.५० टक्क्यांची घट झाली होती. जुलैच्या २.१८ टक्क्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये उत्पादित मालाच्या महागाई दरात किरकोळ वाढ नोंदवून तो २.४५ वर स्थिरावला. इंधन आणि वीज क्षेत्रातील दर ९.९९ टक्के झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत तेजीने वाढ होत असल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. त्यामुळे इंधन महागाई दरात वाढ झाली आहे.

उत्पादनात घट झाल्याने वीजदरांमध्ये वाढ झाली आहे. भाज्यांप्रमाणेच डाळ, फळे (७.३५ टक्के), अंडी, मांस आणि मासे (३.९३ टक्के), धान्य ०.२१ टक्के आणि तांदळाच्या महागाई दरात २.७० टक्क्यांची वाढ झाली. घाऊक महागाई दरात वेगाने होत असलेली वाढ हे अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचे संकेत आहेत, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.