शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांच्या संचालक मंडळात एक पद महिलेला राखण्याच्या नियमाची पूर्तता न करणाऱ्या २६० कंपन्यांना राष्ट्रीय शेअर बाजार – एनएसई ने नोटीस पाठविली आहे. पैकी १४५ कंपन्यांचे मंचावरील व्यवहार ठप्पच आहे.
देशातील सर्वात जुन्या मुंबई शेअर बाजाराने गेल्याच आठवडय़ात ५३०हून कंपन्यांना याबाबतची नोटीस पाठविली होती. राष्ट्रीय शेअर बाजारानेही अशीच नोटीस तिच्या व्यासपीठावरील २६० कंपन्यांना पाठविल्याचे बुधवारी स्पष्ट केले.
सूचिबद्ध कंपन्यांच्या संचालक मंडळावर किमान एका महिला संचालकाची नियुक्ती करणे बाजार नियामक सेबीने बंधनकारक केले आहे. एप्रिल २०१५ पासून याची अंमलबजावणी लागू झाली आहे. अन्यथा त्यांच्यावर दंडाची तरतूदही आहे.
बाजाराने बजावलेल्या नोटिशीपैकी केवळ ११५ कंपन्यांमध्येच सध्या मंचावर व्यवहार सुरू आहेत, तर नोटीस पाठविलेल्या अन्य १४५ कंपन्यांचे व्यवहार ठप्पच आहेत. बाजाराने या कंपन्यांची नावे मात्र जारी केली नाहीत.
संचालक मंडळावर एका महिला संचालकाची नियुक्ती न केल्यास दंड तसेच कारवाईची तरतूद सेबीने फेब्रुवारी २०१४ मध्ये केली. याची पूर्तता ऑक्टोबर २०१४ पर्यंत करणे आवश्यक होते. ही मुभा नंतर एप्रिल २०१५ पर्यंत देण्यात आली.
राष्ट्रीय शेअर बाजारात एकूण १,७५० कंपन्या सूचिबद्ध आहेत. नियमाची अंमलबजावणी न करणाऱ्या कंपन्यांना ५०,००० रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. एप्रिल ते जून दरम्यान ही सूचना लागू न करणाऱ्या कंपन्यांना उपरोक्त रक्कम भरणे आवश्यक आहे, तर जुलै ते सप्टेंबर दरम्यान ५०,००० रुपयांसह अतिरिक्त प्रति दिन १,००० रुपये दंड भरणे बंधनकारक आहे. यानंतरही महिला संचालकपद न भरल्यास कंपन्यांना १.४२ लाख व प्रत्येक दिवशी ५,००० अशी रक्कम भरावी लागेल. ३० सप्टेंबर २०१५ नंतर मात्र महिला संचालक नसलेल्या कंपन्यांवर कारवाई होऊ शकते