मनोरंजन उद्यानांच्या व्यवसायात असलेल्या वंडरेला हॉलिडेज् लि. ही कंपनी व्यवसाय विस्तार म्हणून हैदराबाद आणि कोची येथे नवीन उद्याने सुरू करीत असून, त्यासाठी आवश्यक भांडवल प्रारंभिक भागविक्रीच्या माध्यमातून उभारत आहे. या सुमारे १८० कोटी उभारणाऱ्या भागविक्रीला सोमवारपासून सुरुवात झाली असून, बुधवार २३ एप्रिलपर्यंत सुरू राहणाऱ्या या भागविक्रीत सहभागी होण्याचा सल्ला बहुतांश दलाल पेढय़ांनी आपल्या गुंतवणूकदार ग्राहकांना दिला आहे.
‘व्ही गार्ड’ या नाममुद्रेच्या विद्युत उपकरणांचे निर्माते असलेले चित्तिलापिल्ली कुटुंबीय वंडरेला हॉलिडेज्चे प्रवर्तक आहेत. प्रवर्तकांचा एकूण भागभांडवलातील सध्या ९५.४८ टक्के वाटा असून, उर्वरित ४.५२ टक्के वाटा कंपनीचे कर्मचारी व प्रवर्तक समूहातील अन्य कंपन्यांचा आहे. सध्या सुरू असलेल्या भागविक्रीपश्चात त्यात अनुक्रमे ७१.० टक्केआणि ३.४ टक्के अशी घट होईल. मनोरंजन उद्यानाच्या व्यवसायात खेळांच्या स्वचलित उपकरणांमध्ये अत्युच्च सुरक्षा आणि एकूण परिसराची स्वच्छता हे घटक महत्त्वाचे ठरतात आणि या परिमाणात ही दक्षिण भारतातील अव्वल मनोरंजन व्यवस्थापक कंपनी गणली जाते. म्हणूनच शाळांच्या सहलींसाठी कंपनीच्या पार्क्‍सची हमखास निवड केली जाते. परिणामी २००९ ते २०१३ या दरम्यान कंपनीचे उत्पन्न वार्षिक सरासरी २२.९ टक्केदराने वाढत आले आहे.