‘सेबी’ अध्यक्ष सिन्हा यांची स्पष्टोक्ती

जोवर प्रत्यक्ष बाजारात समाधानकारक उपलब्धता आणि तरलतेची स्थिती दिसून येत नाही, तोवर भारताच्या वस्तू वायदा बाजारात कोणत्याही नव्या वस्तूंच्या व्यवहारांना मज्जाव कायम राहील, असे प्रतिपादन वस्तू वायदा बाजाराचे नियंत्रणही नव्याने हाती आलेल्या ‘सेबी’चे अध्यक्ष यू के सिन्हा यांनी गुरुवारी येथे केले.

वस्तू (कमॉडिटी) बाजारातील जोखीम व्यवस्थापनाच्या आकृतिबंधाचे गंभीरपणे अवलोकन आपल्याकडून सुरू असून, ते पूर्ण व्हायला आणखी काही महिने लागतील, असे सिन्हा यांनी स्पष्ट केले. विशेषत: शेतातून उत्पादित अनेक जिनसांच्या भावातील आकस्मिक चढ-उताराची स्थिती आव्हानात्मक असून, किमती वाढल्या तरी त्याचा उत्पादक शेतकऱ्यांना लाभ पोहचत नसल्यावर बोट ठेवून, सिन्हा यांनी भारतात किंमत संशोधन ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याचे सांगितले.

खरेदी-विक्री बाजारपेठ ही राज्य सरकारच्या नियंत्रणात चालते आणि बाजारप्रणीत वस्तूच्या किंमत संशोधनात जीवनावश्यक वस्तू कायद्याचाच मुख्यत्वे अडसर असल्याचे भासत आहे, असे त्यांनी सांगितले.

कोणत्या पिकाचे उत्पादन किती, प्रत्यक्ष बाजारात साठा किती, ही किमतीच्या दृष्टीने संवेदनशील माहितीही आपल्याकडे वेळेत उपलब्ध नसणे, हे देखील चांगले लक्षण नसल्याचे सिन्हा यांनी सांगितले. ‘थॉमसन रॉयटर्स रिस्क समिट’ या परिषदेच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अशा स्थितीत वायदा बाजारात नव्या वस्तूंच्या व्यवहारांना मंजुरी देताना अतीव काळजी आवश्यकच ठरते. विशेषत: कृषी-जिनसांची बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्धता आहे याची खातरजमा करावीच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. भांडवली बाजाराप्रमाणे कमॉडिटी बाजारातही देखरेख आणि जोखीम व्यवस्थापनाची ठोस चौकट आखण्याची प्रक्रिया सुरू असून, ती पूर्ण होण्याला काही महिने जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.