जागतिक खाद्यान्न कंपनी ‘डेनन’ने आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेला ब्रँड एप्टीमलचे भारतात सादरीकरण करतानाच आपला पोषक आहार व्यवसाय अधिक मजबूत करण्यासाठी योजनांची नुकतीच घोषणा केली. जगभरातील ४५ देशांमध्ये उत्तम उपस्थिती दर्शविणाऱ्या एप्टीमल या उत्पादनाला बालकांच्या आहाराच्या गरजा लक्षात घेऊनच विकसित केले गेले आहे.

या उत्पादनात काही खास पोषक घटक असे आहेत की, जे बालकांच्या मेंदू आणि डोळ्यांच्या विकासासाठी साहाय्यभूत ठरतात. बालकांमधील रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्यासाठीदेखील या पोषक घटकांची फारच आवश्यकता असते.

डेनन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रॉड्रिगो लिमा या संबंधात म्हणाले की, कंपनीच्या आहारविषयक धोरणाला मजबूत करण्यासाठीच यंदाच्या वर्षांत भारतात अनेक नवीन उत्पादने सादर करण्याची आपली आक्रमक योजना आहे. एप्टीमलची शृंखला सादर होणे हे असेच एक ऐतिहासिक पाऊल आहे.

कारण प्रथमच बालकांच्या आरोग्यासाठी जागतिक स्तरावरील उत्पादनांची शृंखला भारतात सादर होत आहे. आपली उत्पादने नावीन्यपूर्ण वैज्ञानिक तत्त्वांवर आणि स्थानिक पोषणासंबंधी आंतरिक आधारावर विविध ग्राहकांच्या पोषणासंबंधी गरजा लक्षात घेऊन त्यांची पूर्तता करण्याच्या अपेक्षेने बनवलेली आहेत, असा त्यांनी दावा केला.

लिमा यांनी पुढे स्पष्ट केले की, आपल्यासाठी ‘मेक इन इंडिया’ धोरण व्यावसायिक वृद्धीच्या रणनीतीच्या केंद्रस्थानी आहे आणि एप्टीमलची निर्मिती भारतात पंजाबस्थित आमच्या जागतिक स्वरूपाच्या प्रकल्पाद्वारे होणार आहे. कंपनीने २०१२ मध्ये वॉखार्टकडून खरेदी केलेल्या या प्रकल्पाच्या अद्ययावतीकरणासाठी १५० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक केलेली आहे.