२५० सीसी क्षमतेची ‘फेझर २५’ दाखल

सरलेल्या २०१६ सालचा उत्तरार्ध निश्चलनीकरणाने, त्यानंतर एप्रिलपासून लागू झालेला बीएस-४ पर्यावरणीय मानदंड आणि जुलैपासून अंमलबजावणी सुरू झालेली वस्तू व सेवा कर प्रणाली या विक्रीच्या दृष्टीने खडतर कालावधीला मागे टाकून, आर्थिक वर्षांच्या उत्तरार्धात विक्रीच्या अंगाने चांगल्या कामगिरीची अपेक्षा दुचाकी निर्मितीतील जपानी नाममुद्रा यामाहाने व्यक्त केली आहे. चालू वर्षांत विक्रीत साधारण १५ टक्के वाढीची कंपनीची अपेक्षा आहे.

यामाहाने सध्याच्या लोकप्रिय प्रवाहानुसार, २५० सीसी अशा दमदार इंजिन क्षमतेतील आपली दुसरी मोटारसायकल फेझर २५ चे सोमवारी मुंबईत समारंभपूर्वक अनावरण केले. लांबच्या पल्ल्याच्या प्रवासासाठी उपयुक्त ‘टूरर’ श्रेणीतील या दुचाकीत बाइकस्वाराच्या मागे बसणाऱ्या सहप्रवाशाला आरामदायी अनुभवासाठी विशेष आसन-रचना करण्यात आली आहे. मुंबईतील शोरूममध्ये फेझर २५ ची किंमत १.२८ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे, असे यामाहा मोटर इंडियाचे विक्री व विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष रॉय कुरियन यांनी सांगितले.

सर्वच दुचाकी निर्मात्यांसाठी आर्थिक वर्षांचा पूर्वार्ध अवघड गेला असून, उत्तरार्धात चांगल्या पाऊसपाण्याच्या कारणाने विशेषत: ग्रामीण व निमशहरी भागातून मागणी वाढणे अपेक्षित आहे, असे कुरियन यांनी सांगितले. गत वर्षांत यामाहाने एकूण ७.५० लाख दुचाकींची भारतीय बाजारपेठेत विक्री केली. चालू वर्षांत या विक्रीने ९ लाखांचा टप्पा गाठणे अपेक्षित असून, यात स्कूटर्सच्या विक्रीतील वाढ ही १५ टक्क्य़ांच्या घरातील असेल, असे कुरियन यांनी स्पष्ट केले.

बाजारपेठेचा कल पाहता, पुन्हा स्कूटर्सकडे ग्राहकांचा कल वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. यामाहाच्या विक्रीतही स्कूटर्सचा वाटा ५५ टक्के तर बाइकचा वाटा ४५ टक्के असा आहे.