ग्राहक नोंदणी, ग्राहकांना कॅशबॅक, आक्रमक जाहिराती, मूल्यांकन, फंडांकडून भांडवल-उभारणी यांच्याभोवती इंटरनेटवर उद्योग करणाऱ्यांच्या दुनियेतली उद्दिष्टं सहसा फिरत असतात. उद्योगातून नफा कमवणं, हे त्यांच्या उद्दिष्टांच्या परिघावरही सहसा धूसरच असतं.

भारतात इंटरनेट, वाय-फाय आणि स्मार्ट फोन यांचा प्रसार जसजसा वाढतोय, त्याबरोबरच ई-कॉमर्सची बाजारपेठ वेगाने उधळतेय. फॉरेस्टर या संशोधन संस्थेच्या अहवालानुसार भारताच्या ऑनलाइन बाजारपेठेतली विक्री २०१६ मध्ये सोळा अब्ज डॉलर (सुमारे एक लाख कोटी रुपये) होती, ती येत्या पाच वर्षांमध्ये चौपट होऊन चौसष्ट अब्ज डॉलर होण्याचा अंदाज आहे. चीनला ही अलिबाबाची गुहा भारतापेक्षा थोडी लवकर सापडली, त्यामुळे चीनमध्ये ऑनलाइन बाजारपेठेतली विक्री आताच ६८० अब्ज डॉलर आहे.

इंटरनेटवर व्यापार करणाऱ्यांचं, म्हणजेच एका परीने नव्या ‘नेटीव’ व्यापाऱ्यांचं जग, हे पारंपरिक उद्योगधंद्यांच्या जगापेक्षा खूप वेगळ्या धाटणीत आकारलंय. एकीकडे या जगातलं यश हे नवीन कल्पनांवर आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी गरजांसाठी नावीन्यपूर्ण तोड काढण्यावर अवलंबून आहे. इथे दाखल होणारी मंडळी नवनिर्मितीच्या ऊर्मीतून आणि आवेगपूर्ण जोशाने येत असतात – अनेकदा थेट कॉलेजांमधून किंवा कधी सुरक्षित नोकरीच्या चाकोरी तोडूनही! पण त्याचबरोबर कल्पनेला यशोशिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी सहसा सरस्वतीचे उपासक असणाऱ्या या नवउद्योजकांना प्रचंड धडपड करावी लागते, ती कल्पना ग्राहकांइतकीच लक्ष्मीपुत्रांच्या गळी उतरवण्यासाठी झटावं लागतं. विक्री, नफा-तोटा, उद्योगाचं मूल्यांकन, व्यावसायिक यश यांचे परंपरागत जगातले ठोकताळे या जगात अनेकदा उफराटे होतात. इथे शिखराकडच्या प्रवासाचा वेग मोठा असला तरी अपघातांची आणि बळींची संख्याही मोठी आहे. एकूणच या जगातल्या घडामोडी पारंपरिक उद्योगधंद्यांच्या जगाच्या तुलनेत प्रचंड वेगाने घडताना दिसतात.

या जगाचा असा आलेख मांडण्याचं निमित्त म्हणजे नेटीव व्यापाऱ्यांमधल्या बडय़ा नावांबद्दलच्या काही अलीकडच्या बातम्या. पहिली बातमी आहे ती फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन आणि स्नॅपडील या भारतात आंतरजालाद्वारे किरकोळ विक्री करणाऱ्या तीन मुख्य कंपन्यांच्या आर्थिक आकडेवारीची. गेल्या वर्षी त्यांनी नोंदवलेला एकत्रित तोटा होता तब्बल ११,७५४ कोटी रुपये! त्यापूर्वीच्या वर्षांतला, म्हणजे २०१४-१५ मधला तोटा होता ६,०३१ कोटी रुपये. दुसरी बातमी म्हणजे गेल्या तीन वर्षांमध्ये फ्लिपकार्टच्या मूल्यांकनात झालेले नाटय़मय बदल. डिसेंबर २०१३ ते जून २०१५ या दीड वर्षांत फ्लिपकार्टचं मूल्यांकन सहापट वाढलं आणि त्याचबरोबर कंपनीचं वलयही; पण साडेपंधरा अब्ज डॉलरचं शिखर गाठल्यानंतर पुढच्या दीड वर्षांत फ्लिपकार्टचं मूल्य पाचेक अब्ज डॉलपर्यंत घसरलं! फ्लिपकार्टव्यतिरिक्त इतरही काही इंटरनेट उद्योगांचं मूल्यांकन गेल्या वर्षभरात बऱ्यापैकी छाटलं गेलं आहे. तिसरी बातमी आहे स्नॅपडीलसमोरच्या आर्थिक अडचणींची. तिथल्या तीस टक्के कर्मचाऱ्यांना नारळ मिळेल, अशी वदंता आहे. या बातम्यांमध्ये एक सांधलेलं सूत्र आहे.

बहुतेक नेटीव उद्योग तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकांची घरबसल्या सोय भागवण्यावर, तसंच पुरवठादार आणि ग्राहक यांना तंत्रज्ञानाद्वारे थेट जोडण्यावर आधारित असतात. सहसा हे उद्योग वेगवेगळ्या पुरवठादारांचे पर्याय पुरवणारा बाजार या तत्त्वावर उभारलेले असतात आणि पारंपरिक उद्योग-जगतात कमिशन खाणाऱ्या मध्यस्थांची फळी दूर (किंवा निदान कमी) करतात. तसंच पुरवठादार आणि ग्राहक यांची जोड तंत्रज्ञानावर आधारित असल्याने ती जास्त कार्यक्षम बनते.  नेटीव उद्योग अधिक कार्यक्षम, अधिक ग्राहकसन्मुख आणि ग्राहक-पुरवठादार अशा दोघांचंही भलं साधणारे असतात, ही त्यांची बलस्थानं असतात.

पण त्याच वेळी या उद्योगांचे काही पैलू जीवघेण्या स्पर्धेला आमंत्रण देतात. पहिली गोष्ट म्हणजे या उद्योगांच्या प्रारूपामध्ये सहसा नव्या प्रवेशोत्सुकांना रोखणारी तटबंदी फार कच्ची असते. त्यामुळे नवीन कल्पना बाजारात आली की, थोडाफार वेगळा तडका टाकून बाकी मूळ कल्पनेची नक्कल करणारेही उगवतात. दुसरी गोष्ट म्हणजे या उद्योगांचा भविष्यकाळात नफा किती असेल, याबद्दलची अनिश्चितता, कारण कल्पना नवीन असते. ती किती ग्राहक स्वीकारतील आणि कंपनीकडे नोंदणी करतील, त्यांच्यापैकी किती जण किती प्रमाणात खरेदी करतील आणि यातून शेवटी किती नफा होईल, तो कधी होईल, या गोष्टी विविध गृहीतकांवर अवलंबून असतात. ऐतिहासिक ठोकताळे नसल्यामुळे जशी ज्याची गृहीतकं, तसं त्याचं मूल्यांकन. पारंपरिक उद्योगांच्या मूल्यांकनावरनंही वाद होतात; पण नेटीव उद्योगांच्या मूल्यांकनात त्यापेक्षा जास्त अनिश्चितता आणि सापेक्षता असते. सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असतं, असं म्हणतात. नेटीव उद्योगांच्या मूल्यांकनाबद्दल ही गोष्ट तंतोतंत खरी आहे.

तिसरी गोष्ट म्हणजे, पारंपरिक जगात बऱ्याच कंपन्या बाजारपेठेची भौगोलिक विभागणी करून आपापल्या मुलखांमध्ये सुखेनैव नांदतात, तसं नेटीव उद्योगांच्या जगात सहसा शक्य होत नाही. ‘जो जिता वही सिकंदर’ असा इथला अलिखित कायदा आहे. त्यामुळे एका बाजारपेठेचं स्वयंवर जिंकायला चार कंपन्या पुढे आल्या असतील, तर त्यातल्या एकाच्याच गळ्यात वरमाला पडणार आणि ती इतर तिघांना पाणी पाजल्यावरच पडणार, या मानसिकतेतून नेटीव व्यापारी स्पर्धेत उतरतात. चौथी गोष्ट म्हणजे, भौगोलिक मर्यादा पार करणं आणि उद्योगाच्या कक्षा विस्तारणं हे पारंपरिक जगातल्या व्यापाऱ्यांपेक्षा नेटीव व्यापाऱ्यांना थोडं जास्त सोपं असतं. ग्राहकांची संख्या एका टप्प्याच्या पलीकडे पोहोचली, की त्या संख्येच्या पायावर नवे इमले रचणं तुलनेने सोपं जाऊन नेटीव उद्योग पुढे चक्रवाताच्या वेगाने वाढतात, असं मानलं जातं. त्यामुळे ग्राहकसंख्येच्या त्या जादूई टप्प्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचणं हे नेटीव उद्योगांचं पहिलं लक्ष्य असतं.

या सगळ्या पैलूंमुळे नेटीव व्यापाऱ्यांची उद्दिष्टं ही पारंपरिक जगापेक्षा निराळी असतात. सुरुवातीच्या काळात आपली कल्पना वेगाने ग्राहकांच्या जादूई संख्येपर्यंत पोहोचावी, यासाठी लागणारी प्रारंभिक तयारी, कराव्या लागणाऱ्या जाहिराती आणि ग्राहकांना जाळ्यात ओढण्यासाठी द्यायच्या सवलती, या सगळ्यासाठी गुंतवणूक लागते. बेभरवशाच्या नव्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करणारे फंडही निराळ्या प्रकारचे असतात. दहा नव्या कंपन्यांमध्ये भांडवल गुंतवलं तर नऊ  कंपन्यांमध्ये त्यावर परतावा येणार नाही, पण एका कंपनीचं मूल्यांकन वाढून त्यातला परतावा आपल्या संपूर्ण गुंतवणुकीवर मोबदला देईल, अशा मानसिकतेतून हे फंड गुंतवणूक करतात. अशा एखाद्या फंडाच्या गळी आपली कल्पना उतरवणं हे पहिलं उद्दिष्ट. ते पार केलं की नेटीव नवउद्योजकांचा प्रवास सुरू होतो. त्यानंतर इतरांची स्पर्धा कापून ग्राहक मटकावण्यासाठी आणखी सवलती द्याव्या लागतात, आपला सेवा-पुरवठय़ाचा पाया विस्तारावा लागतो. त्यासाठी काही महिन्यांनी आणखी भांडवल लागणार असतं, ते उभारण्यासाठी कंपनीचं मूल्यांकन वाढवावं लागतं. या टप्प्यावर नफा अजून कोसो मैल दूर असतो. मग मूल्यांकन वाढवण्यासाठी विक्री वाढतेय हे सिद्ध करावं लागतं. किमानपक्षी ग्राहक-नोंदणी तरी मोठय़ा प्रमाणावर झाली आहे, म्हणून कंपनीला उज्ज्वल भवितव्य आहे, असं सिद्ध करावं लागतं. त्यासाठी क्लृप्त्या लढवल्या जातात, पुन्हा सवलती द्याव्या लागतात. अशा प्रकारे ग्राहक नोंदणी, ग्राहकांना कॅशबॅक, आक्रमक जाहिराती, मूल्यांकन, फंडांकडून भांडवल-उभारणी यांच्याभोवतीच या दुनियेतली उद्दिष्टं फिरत असतात. उद्योगातून नफा कमवणं, हे त्यांच्या उद्दिष्टांच्या परिघावरही सहसा धूसरच असतं.

पुढे एखादी कंपनी आधीचे टप्पे पार करून मग नफ्याचा वगैरे विचार करू लागते; पण तोपर्यंत एखादा नवा स्पर्धक ग्राहकांना वश करण्यासाठी सवलतींचा वर्षांव करत असेल, तर मग आधीच्या कंपनीलाही आपले आधी जोडलेले ग्राहक राखण्यासाठी सवलतींची बरोबरी करावी लागते. म्हणजे नफ्याचा विचार आणखी काही काळ पुढे! या प्रक्रियेत तोटा सहन करण्याच्या सवयीला नेटीव उद्योगांच्या जगात नाव आहे – कॅश बर्न! म्हणजे फंडांनी गुंतवलेलं भांडवल अक्षरश: जाळत या कंपन्या ग्राहकांची आराधना करत असतात. ग्राहक मंडळीही कोण किती सूट देतंय ते पाहून आपली निष्ठा फिरवत या वाहत्या गंगेत हात धुऊन घेत असतात.

काही सन्माननीय अपवाद वगळता, नेटीव व्यापाऱ्यांच्या जगात बहुसंख्येनं दिसणारं चित्र हे असं आहे. अशा पाश्र्वभूमीवर त्यांना होणारा तोटा आणि बंद पडणाऱ्या कंपन्या यात काही आश्चर्याची बाब नाही. काही नवउद्योजक आपल्या उद्योगाचं मूल्यांकन वाढवून मग स्पर्धकांना भरघोस किमतीला उद्योग विकून बाहेर पडतात आणि नव्या कल्पनांसह नवा डाव मांडायला सज्ज होतात. या जगात अशा गच्छंतीला डागही मानलं जात नाही; किंबहुना प्रत्येक बाजारपेठेत शेवटी एक किंवा दोनच कंपन्या शिल्लक राहणार, हे स्पर्धेत आकांताने झगडणाऱ्या मंडळींनाही कुठे तरी ठाऊक असतं. कधी कधी केवळ मूल्यांकन वाढवून आपला वाटा भरभक्कम किमतीला विकून बाहेर पडायचं, एवढय़ाच मर्यादित उद्देशावर डोळा असलेली मंडळीही यात असतात. निर्मिती, संहार आणि पुनर्निर्मिती यांना तुलनेनं सहजपणे स्वीकारणारं हे जग आहे.

गेली काही र्वष पारंपरिक उद्योगधंद्यांच्या जगात आलेलं साचलेपण आणि जगातल्या मुख्य केंद्रीय बँकांनी वित्तीय बाजारांमध्ये ओतलेला प्रचंड पैसा या पाश्र्वभूमीवर नेटीव व्यापाऱ्यांच्या मायापुरीत गुंतवणूकदारांनी सढळ हस्ते थैल्या खोलल्या होत्या. त्यातून – आणि या उद्योगांच्या प्रारूपाच्या अंगभूत पैलूंमुळे – फुगलेली मूल्यांकनं, नफाक्षमतेकडे दुर्लक्ष आणि पैसा जाळून ग्राहकांच्या पाठी धावायची संस्कृती फोफावली. अलीकडच्या काळात मात्र काही गुंतवणूकदार तरी नफ्याची अपेक्षा करू लागले आहेत. अमेरिकेत फेडरल रिझव्‍‌र्ह बँक आता वेगळा राग आळवायला लागली आहे. जागतिक वित्तीय बाजारांची परिस्थिती जशी बदलेल, तसं या संस्कृतीलाही बदलावं लागेल. हे बदल काय वेगाने आणि किती विध्वंसक प्रकारे होतात आणि नेटीव उद्योगांची खरी बलस्थानं त्या बदलातून तावून-सुलाखून निघून कायम राहतात का, हा या कहाणीचा पुढचा अध्याय असेल.

 

मंगेश सोमण

mangesh_soman@yahoo.com