भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या वारा प्यायल्यासारखे धावत आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने अलीकडेच ३२,००० ची पातळी ओलांडली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दहा हजाराच्या पातळीला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत आहे. अशा तुफानी तेजीच्या आवेगात सहसा सारं काही गोडगुलाबी दिसायला लागतं. बाजारातली तेजी ही भारतातल्या आर्थिक सुधारणांची पोचपावती आणि देशाच्या सुदृढ आर्थिक भविष्याची नांदी आहे, असंही अनेकांना वाटू शकतं. पण बाजारातले हे मैलाचे दगड साजरे करताना आपल्याला याचं भान ठेवायला हवं की बाजाराच्या या घोडदौडीत जागतिक प्रवाहांचा मोठा हातभार आहे आणि सध्या मूल्यांकनांना जबरदस्त सूजही आलेली आहे. फुगलेली मूल्यांकनं कधी कधी आणखी टरारून फुगू शकतात, हे खरं असलं तरी त्या फुगण्याला मर्यादा असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी यापुढे सावध राहायला हवं.

एखादी कंपनी भविष्यात किती नफा कमावील, याची गुंतवणूकदारांची सामूहिक अपेक्षा कंपनीच्या शेअरच्या बाजारमूल्यात प्रतिबिंबित होत असते. पण ही सामूहिक अपेक्षा आत्यंतिक आशावाद आणि पराकोटीचा निराशावाद यांच्यामधल्या लंबकात फिरत असते. कुठल्याही विशिष्ट वेळी ती त्या लंबकाच्या आवर्तनात नक्की कुठल्या बिंदूवर आहे, ते आपल्याला सांगण्याचं काम मूल्यांकनाचे निर्देशक करत असतात. हे काम करणारा एक सरळसाधा निर्देशक म्हणजे शेअरचा बाजारभाव आणि कंपनीचा प्रतिशेअर नफा यांचं गुणोत्तर. उदाहरणार्थ, समजा, प्रत्येक शेअरमागे एखादी कंपनी दहा रुपये नफा कमावतेय आणि तिचा बाजारभाव आहे १०० रुपये. तर, तिच्यासाठी सध्याचं गुणोत्तर १० झालं. वर्षभरानंतर समजा, नफा २० टक्क्यांनी वाढून १२ रुपये झाला, पण बाजारभाव मात्र दुप्पट झाला. तर त्या कंपनीचं मूल्यांकनाचं गुणोत्तर २०० भागिले १२, म्हणजे जवळपास १७ झालं. या उदाहरणात गुंतवणूकदारांचा कंपनीबद्दलचा आशावाद वाढल्यामुळे शेअरचा बाजारभाव नफ्याच्या वाढीला मागे टाकून बराच पुढे गेलाय.

शेअर बाजाराच्या निर्देशांकांच्या बाबतीत निर्देशांकातील कंपन्यांच्या एकूण भांडवलाच्या बाजारमूल्याला त्यांच्या एकूण नफ्याने भागलं की आपल्याला निर्देशांकाच्या मूल्यांकनाचं गुणोत्तर मिळतं. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकासाठी हे गुणोत्तर सध्या २५च्या आसपास आहे. यापूर्वी एवढं मूल्यांकन २०१०च्या दिवाळीच्या सुमाराला दिसलं होतं. पण ते फक्त काही दिवसच. त्यानंतरच्या वर्षभरात ते जवळपास १७ पर्यंत घसरलं होतं. त्याही मागचा इतिहास पाहिला तर २००८ मधल्या जागतिक आर्थिक संकटापूर्वी मूल्यांकनाचं गुणोत्तर २८ च्या काठाशी जाऊन पोचलं होतं. ते वर्ष संपता संपता मात्र धडाक्याने कोसळून ११च्याही खाली गेलं! ११ ते २८ या लंबकाच्या दोन टोकांच्या जवळपास मधोमध – म्हणजे साडेएकोणीसच्या थोडं वर – या गुणोत्तराची गेल्या १२ वर्षांची सरासरी राहिली आहे. हा इतिहास पाहिला तर सध्याचं मूल्यांकन कमालीचं ताणलेलं आहे, हे निश्चित.

चालू दशकातला आपल्या शेअर बाजाराचा प्रवास पाहिला, तर त्याचे ढोबळमानाने दोन भाग करता येतील. पहिला कालखंड २०१०च्या सुरुवातीपासून ते २०१४च्या शेवटपर्यंतचा. त्या पाच वर्षांमध्ये निफ्टी दरसाल ९.६ टक्क्यांनी वाढला. निफ्टीच्या मूल्यांकन गुणोत्तरात अध्याहृत असलेला कंपन्यांचा नफा त्या कालखंडात दरसाल ११.७ टक्के दराने वाढला. म्हणजे कंपन्यांचा नफा आणि बाजारभाव या दोन्ही गोष्टी तेव्हा साधारण एकमेकांना तोडीस तोड वाढत होत्या. त्यानंतरच्या अडीच वर्षांमध्ये, म्हणजे २०१४च्या शेवटापासून आतापर्यंत मात्र निफ्टी निर्देशांकातल्या कंपन्यांचा नफा जवळपास ‘जैसे थे’ राहिलेला आहे. निफ्टी निर्देशांक म्हणजे एक कंपनी असती, तर तिचा प्रत्येक शेअरमागचा नफा २०१४च्या शेवटी ३९१ रुपये एवढा होता. तो मधल्या काळात ३६५ रुपयांपर्यंत घसरला आणि आता तो पुन्हा वाढून ३९४ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या टप्प्यामध्ये नफ्याचं प्रमाण हे असं कुंथलेलं राहिलं असल्यामुळे निर्देशांकाच्या वाढीचा वेग हा आधीच्या टप्प्यापेक्षा थोडा कमी राहिला असूनही मूल्यांकनाचं गुणोत्तर मात्र झपाटय़ाने वाढलेलं दिसतंय. ही परिस्थिती केवळ निफ्टी या पन्नास कंपन्यांना सामावून घेणाऱ्या निर्देशांकाचीच नाही, तर निफ्टी-५०० या व्यापक निर्देशांकाचीही तीच गत आहे. निफ्टी-५००च्या बाबतीत मूल्यांकनाचं गुणोत्तर आणखी ताणलेलं असून ते सध्या साडेअठ्ठाविसाच्याही पुढे आहे – म्हणजे निफ्टीपेक्षा साडेतीन अंक जास्त! याचा अर्थ तुलनेने छोटय़ा कंपन्यांसाठीही नफ्याचं प्रमाण साचलेलं आणि बाजारभाव मात्र चढलेले असं चित्र आहे. आणि तेही मोठय़ा कंपन्यांपेक्षा जास्त प्रकर्षांने.

काही विश्लेषक असं मानतात की सध्याचा बाजारभाव आणि सध्याचं नफ्याचं प्रमाण यांच्या गुणोत्तराला मूल्यांकनाचं निर्देशक मानणं हे तितकंसं बरोबर नाही. कधी कधी काही तात्कालिक कारणांमुळे नफ्यात मोठे फेरबदल घडतात. पण गुंतवणूकदार हे कंपन्यांच्या भावी नफ्याबद्दलच्या अपेक्षा या फक्त सध्याच्या नफ्याच्या अनुषंगाने नाही तर दीर्घकालीन नफ्याच्या अनुषंगाने जोखत असतात. या दृष्टिकोनानुसार गुणोत्तर मोजताना सध्याचा नफा लक्षात न घेता गेल्या काही वर्षांच्या नफ्याची सरासरी लक्षात घेतली जाते. अशा सुधारित गुणोत्तराला शिलर या अर्थतज्ज्ञाच्या नावाने ओळखलं जातं. शिलर गुणोत्तरानुसारही भारतीय शेअर बाजाराचं सध्याचं मूल्यांकन हे गेल्या पाचेक वर्षांच्या सरासरीपेक्षा वर दिसतं, पण साध्या गुणोत्तराप्रमाणे ते शिखराला टेकलेलं दिसत नाही.

भारताच्या पलीकडे जाऊन इतर बाजारपेठांकडे नजर टाकली तर असं दिसतं की फुगलेलं मूल्यांकन हा केवळ भारतातला मुद्दा नाही. www.yardeni.com या संकेतस्थळावर वेगवेगळ्या बाजारनिर्देशांकांसाठी आगामी वर्षांतील अपेक्षित नफ्याच्या आधारे काढलेलं नफ्याचं गुणोत्तर उपलब्ध आहे. तिथले तक्ते पाहिले तर असं दिसतं की अमेरिकी बाजारपेठेचं मूल्यांकन गेल्या पंधरा वर्षांच्या इतिहासातील शिखरावर आहे. जागतिक शेअर बाजारांच्या एकत्रित निर्देशांकाच्या बाबतीत ते शिखराच्या थोडंसंच अलीकडे आहे. उभरत्या देशांच्या शेअर बाजारांच्या निर्देशांकासाठी आणि बऱ्याचशा युरोपीय बाजारपेठांसाठी सध्याचं मूल्यांकन गेल्या पाच-सहा वर्षांच्या इतिहासातल्या शिखरावर किंवा त्याच्या आसपास आहे. मूल्यांकनांना चढलेला ज्वर हा एका परीने पाहिलं तर जगभर फैलावलेला आहे. जागतिक आर्थिक संकटानंतर मुख्य केंद्रीय बँकांनी अतिसैल मुद्राधोरण राबवून जो आक्रमक मुद्राविस्तार केला त्याचाच हा परिपाक आहे. या वर्षांच्या सुरुवातीपासून विकसित देशांच्या आर्थिक वाढीच्या दरात जरा धुगधुगी जाणवायला लागली आहे, त्याची ऊब घेऊन जागतिक शेअर बाजार आणखी तरारले आहेत. भारतीय शेअर बाजाराच्या अलीकडच्या मुसंडीमध्ये देशातलं राजकीय स्थैर्य आणि जीएसटीसारखी मोठी सुधारणा प्रत्यक्षात येणं यांचीही मदत झाली असली तरी ती मुसंडी व्यापक जागतिक लाटेचा एक आविष्कार आहे. बँकांच्या थकीत कर्जाचा चिघळलेला प्रश्न, प्रकल्पांमधल्या गुंतवणुकीतली लक्षणीय मंदी आणि आर्थिक विकासाचा मंदावलेला दर यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे सरकण्याची ताकद या जागतिक लाटेमुळे आपल्या बाजारामध्ये आली आहे.

शेअर बाजाराचा आगामी कल काय राहील, ही नेहमीच मोठय़ा अनिश्चिततेची बाब असते. पण बाजारातली जोखीम सध्या वाढलेली आहे, एवढं मात्र नक्की. एकीकडे जवळपास साऱ्याच बाजारांमधलं मूल्यांकन ताणलं गेलेलं असताना एखादी आंतरराष्ट्रीय राजकीय दुर्घटना किंवा एखादी मोठी दिवाळखोरी बाजारांची दिशा बदलवण्याचं निमित्त होऊ  शकते. दुसरा धोक्याचा इशारा म्हणजे भारताच्या वाढलेल्या मूल्यांकनामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या काही महिन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात विक्री केली आहे. देशी गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर कायम राखल्यामुळे विदेशी संस्थांच्या विक्रीचा प्रभाव झाकला गेला. दर महिन्याला सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) माध्यमातून ठरावीक रक्कम गुंतवणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांचाही यात मोठा आधार मिळतोय. पण चिंतेची गोष्ट म्हणजे बाजारातून मोठा नफा कमावण्याच्या अपेक्षेने अनेक किरकोळ गुंतवणूकदार बाजारात नव्याने उतरत आहेत, अशा बातम्या आहेत. इतिहासाचा दाखला पाहिला तर असं दिसतं की असे नवखे गुंतवणूकदार अनेकदा बाजार टिपेला पोचता पोचता बाजारात शिरतात. तिसरा धोक्याचा मुद्दा म्हणजे विकसित देशांमधल्या केंद्रीय बँका आपल्या अतिसैल धोरणाला हळूहळू आवर घालण्याच्या मन:स्थितीत येताहेत. ती प्रक्रिया तशी सावकाशपणे होणार असली तरी विकसित देशांमधल्या रोखेबाजारातल्या परताव्याचा दर वर सरकायला लागला की रोखेबाजाराच्या तुलनेत शेअर बाजार आणखीच महाग वाटायला लागतील.

या साऱ्या गोष्टी असं सुचवतात की शेअर बाजार सध्या गुंतवणूकदारांच्या दृष्टीने नाजूक टप्प्यात येऊन ठेपला आहे. एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी आपले गुंतवणुकीचे नियमबद्ध घुटके घेत राहिले पाहिजेत आणि बाजार घसरल्यानंतरही ती सवय कायम राखली पाहिजे, हे खरं. पण एखाद्याला मोठी रक्कम गुंतवायची असेल तर सध्याची वेळ फसवी ठरू शकते. गुंतवणूकगुरू वॉरेन बफे यांनी म्हटलं होतं की बहुसंख्य मंडळी जेव्हा बाजारातून मोठय़ा परताव्याच्या अपेक्षेने लालची बनतात, तेव्हा आपण घाबरायला हवं आणि जेव्हा बाजारावर भीतीचं गारूड असतं तेव्हा आपण लालची बनून खरेदी करायला हवी. त्या न्यायाने सध्याची वेळ ही अगदी घाबरण्याची नाही, तरी सावधपणे पावलं टाकायची निश्चितच आहे.

 

मंगेश सोमण

mangesh_soman@yahoo.com