काही वर्षांपूर्वी असं म्हटलं जायचं की, भारतीय शेअरबाजार विदेशी गुंतवणूक संस्थांच्या तालावर नाचतो. अलीकडच्या काळात मात्र ते चित्र बरंच बदललं आहे. जागतिक घडामोडींमुळे विदेशी गुंतवणुकीचे वारे फिरण्याच्या अलीकडच्या काही घटनांमध्ये भारतीय बाजार मात्र आपली पडझड एका मर्यादेत रोखू शकला, कारण त्या घटनांमध्येही देशी गुंतवणूक संस्थांनी- खासकरून म्युच्युअल फंडांनी- खरेदी जारी ठेवली होती. विदेशी गुंतवणुकीचे वारे विरोधात वाहत असताना ठामपणे उभं राहण्याएवढी ताकद आणि आकारमान देशातल्या म्युच्युअल फंडांमध्ये येण्यात महत्त्वाची भूमिका आहे ती सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या योजनांची.

या योजनांमध्ये गुंतवणूकदार एक ठरावीक रक्कम दर महिन्याच्या ठरावीक तारखेला म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवतो. बाजार तेजीत असो किंवा मंदीत, त्या ठरावीक तारखेला ठरलेली रक्कम गुंतवायची शिस्त एसआयपीमध्ये असते. जेव्हा बाजार खालावतो, तेव्हा तेवढय़ाच रकमेत जास्त युनिटांची खरेदी होते. वर्षांनुवर्षे ही बांधिलकी आणि शिस्त पाळली की त्याची गोमटी फळं मिळतात, खासकरून जेव्हा बाजार नरमीत होता, त्या काळातल्या गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळतो, हे इतिहाससिद्ध तत्त्व बऱ्याच गुंतवणूकदारांना अलीकडच्या वर्षांमध्ये पटू लागलं आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये एसआयपीतली गुंतवणूक चौपट होऊन आता दरमहा सव्वाचार हजार कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे. ही गुंतवणूक इतर गुंतवणूक-प्रवाहांसारखी चंचल नाही. त्याच्या बळावर देशी गुंतवणूक संस्थांच्या बाजारातल्या सहभागालाही एक स्थैर्य आलं आहे.

शेअर बाजारांची वाटचाल नेहमी दोन पावलं मागे, चार पावलं पुढे अशा चक्रातून होत असते. बाजारातली गुंतवणूक एका झटक्यात केली तर परताव्याचं प्रमाण गुंतवणुकीच्या वेळी बाजाराची स्थिती काय होती, त्याप्रमाणे खूप वर-खाली होतं. उदाहरणार्थ, कुणी मार्च २००९ मध्ये पाच वर्षांसाठी गुंतवणूक केली असती आणि ती बाजार निर्देशांकाच्या प्रमाणात वाढली असती, तर त्याची गुंतवणूक जवळपास अडीचपट झाली असती; पण तेच जर कुणी जानेवारी २००८ मध्ये गुंतवणूक केली असती तर पाच वर्षांअखेर त्याचं पाच टक्के मुद्दल कमी झालं असतं! एका झटक्यात गुंतवणूक करण्याऐवजी ती एसआयपीच्या तत्त्वाने घुटक्याघुटक्यांत केली तर परताव्यातली ही अनिश्चितता बऱ्याच प्रमाणात कमी होते.

गेल्या वर्षी ‘मिंट’ या वर्तमानपत्राने हेक्झगोन वेल्थ नावाच्या एका संस्थेबरोबर म्युच्युअल फंडांच्या प्रातिनिधिक समभागाधारित योजनांमधल्या एसआयपींचा एक अभ्यास केला होता. जानेवारी २००० पासूनच्या सर्व महिन्यांमध्ये या योजनांमध्ये कुणी एसआयपीच्या घुटक्यांच्या पद्धतीने गुंतवणूक केली असती तर काय परतावा मिळाला असता, याची त्यांनी आकडेमोड केली. आपण फक्त बाजार-निर्देशांकाला अनुसरून काढलेले निष्कर्ष पाहू या. त्यानुसार, पाच वर्षांच्या एसआयपींमध्ये मुदलात खोट येण्याचं, म्हणजे उणे परताव्याचं प्रमाण अवघं दोन टक्के होतं. बारा टक्के वेळा दरसाल ० ते ६ टक्के परतावा होता, चाळीस टक्के वेळा ६ ते १५ टक्के परतावा होता, तर ४६ टक्के वेळा दरसाल १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा होता. ६ टक्क्यांचं महत्त्व असं की, त्यापेक्षा जास्त परतावा असेल तर तो सर्वसाधारण महागाईच्या दरापेक्षा जास्त असतो. म्हणजे, महागाईने गुंतवणुकीच्या मुदलाचं खरं मूल्य कमी होणं टळतं आणि १५ टक्क्यांचं महत्त्व असं की, तो परताव्याचा दर करोत्तर पातळीवर बँकांमधल्या मुदत ठेवींच्या जवळपास दुप्पट आहे. जसजसा एसआयपीचा कालावधी वाढत जातो, तसतशी एसआयपीच्या परताव्यातली अनिश्चितताही कमी होत जाते. दहा वर्षे मुदतीच्या कुठल्याही एसआयपींमध्ये उणे परतावा किंवा ६ टक्क्यांच्या खालचा परतावा नव्हता. ६४ टक्के वेळा परतावा ६ ते १५ टक्क्यांच्या टापूत होता, तर ३६ टक्के वेळा तो १५ टक्क्यांपेक्षाही जास्त होता.

एसआयपीच्या आकर्षकपणाची तीन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना समभागांच्या निवडीचं अवघड काम करावं लागत नाही. अन्यथा, थेट समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना कुठले समभाग निवडायचे, त्यातून कधी बाहेर पडायचं, हे ठरवण्यासाठी अभ्यास लागतो आणि बाजारावर सतत लक्ष ठेवावं लागतं. त्यात जोखीमही जास्त असते. म्युच्युअल फंडाचे भाग किंवा युनिट हे अपूर्णाकातही खरेदी करता येतात. त्यामुळे दरमहा समान गुंतवणूक करण्याचं तत्त्व त्यात काटेकोरपणे पाळता येतं. दुसरी गोष्ट म्हणजे, या गुंतवणूक तत्त्वात उत्पन्नाच्या आणि गुंतवणुकीच्या कालावधीची सांगड घातली जाते. नोकरदार मंडळींना दरमहा पगार मिळतो. त्यातून करायची गुंतवणूकही दरमहा असणं त्यांना सोयीचं पडतं; पण या दोन्हींपेक्षाही महत्त्वाची खुबी अशी की, या पद्धतीत गुंतवणूकदाराचं वर्तन नियमबद्ध आणि म्हणूनच भावनारहित असतं! वित्तीय बाजारांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी भय आणि हाव या माणसाच्या दोन मूलभूत भावना सगळ्यात धोकादायक असतात. बाजारांमधले मोठे चढउतारही अनेकदा या दोन भावनांच्या खेळातून आकाराला येत असतात. जेव्हा बाजार मंदीच्या फेऱ्यात असतो, तेव्हा तो आणखी खाली आला की मग गुंतवणूक करू, अशी हाव मनात ठेवून अनेक गुंतवणूकदार काठावर राहतात. बाजारातून कधी बाहेर पडायचं याचा निर्णय घेतानाही काही मंडळी चढत्या बाजारात मनात हाव बाळगून थांबून राहतात किंवा मग बाजारात थोडी घसरण दिसली की घाबरून आपली पुंजी विकण्यासाठी घाई करतात. आजपर्यंतचा बहुतेकांचा अनुभव असा आहे की, बाजाराचा आगामी कल काय असेल, याचे ठोकताळे बांधून त्यानुसार गुंतवणुकीचे निर्णय घेणारे गुंतवणूकदार भय आणि हाव यांच्या आवर्तनात सापडून चुकीचे निर्णय घेतात. जे आपल्या भावनांवर काबू ठेवू शकतात, तेच साधारणपणे बाजारातले यशस्वी खेळाडू असतात. एसआयपीचे घुटके घेणाऱ्यांची गुंतवणूक प्रक्रिया पूर्णपणे एका साध्या नियमाने बांधलेली असल्यामुळे ते या भावना-जंजाळापासून दूर राहतात.

एसआयपीची पद्धत दीर्घकालीन (साधारणत: पाच वर्षांच्या पलीकडे) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तशी रामबाण असली तरी काही मुद्दे शिल्लक राहतात. एक म्हणजे, नोकरदार मंडळींव्यतिरिक्त बाकीच्यांचं उत्पन्न असं दरमहा ठरलेलं नसतं. त्यांच्या बचतक्षमतेत चढउतार होत असतात. नोकरदारांनाही बोनस किंवा काही वेगळं मोठं उत्पन्न आलं, तर त्यातून करायची गुंतवणूक एसआयपीच्या तत्त्वानुसार करता येण्यासारखी नसते. अशा वेळी एका झटक्यात मोठी गुंतवणूक समभागाधारित म्युच्युअल फंडात करावी काय? याबद्दल एक सल्ला असा दिला जातो की, अशी मोठी रक्कम एखाद्या मुदलात खोट येण्याचा धोका नसलेल्या लिक्विड फंडात किंवा शॉर्ट टर्म बॉण्ड फंडात गुंतवून मग ती एसआयपीसारखीच टप्प्याटप्प्याने समभागाधारित योजनेकडे वळवावी; पण हा सल्ला अनियमित, छोटय़ा बचतींसाठी कामाचा नाही. शिवाय, मोठी रक्कम समभागाधारित योजनेकडे वळवायला एक-दोन वर्षे लागली आणि त्या काळात बाजाराची साधारण दिशा चढती असेल, तर परताव्यावर विपरीत परिणाम होतो. दुसरा मुद्दा असा की, एसआयपीच्या गुंतवणुकीची प्रक्रिया नियमबद्ध असली तरी ती गुंतवणूक काढून घेताना भावनांचा खेळ कसा टाळायचा? यावर सल्लागार असं सांगतात की, गुंतवणूक सुरू करतानाच त्यांची सांगड काही उद्दिष्टांशी घालावी. उदाहरणार्थ, मुलांच्या शिक्षणासाठी दहा वर्षांनंतर १२ लाखांची पुंजी जमा करणं हे जर उद्दिष्ट असेल आणि त्यासाठी सुरू केलेल्या एसआयपीचं मूल्य आठव्या वर्षांतच बारा लाखांपर्यंत पोचलं तर ती गुंतवणूक काढून घेऊन ती रक्कम मुदत ठेवीत किंवा गैर-जोखमीच्या फंड योजनेत वळवावी. हा सल्ला तसा योग्य असला तरी अनेकदा गुंतवणूकदारांना आपली उद्दिष्टं आणि त्यासाठी तरतूद करायच्या रकमेचे अंदाज एवढय़ा नेमकेपणाने करता येत नाहीत.

वर नमूद केलेल्या सल्ल्यांच्या जोडीने एसआयपी पद्धतीला पूरक आणि भावनांना अटकाव घालणारे असे काही इतर नियमही गुंतवणूकदार वापरू शकतात. वय वाढत गेलं की हळूहळू समभागाधारित फंडातली अमुक टक्के गुंतवणूक काढून घेऊन ती गैर-जोखमीच्या साधनांमध्ये कशी वळवावी याचं आधीच बनवलेलं कोष्टक हा कुणाचा नियम ठरू शकतो. कुणी असा नियम करू शकतो की, बाजार निर्देशांकाची किंमत आणि कंपन्यांचं उत्पन्न यांच्यातलं गुणोत्तर जर गेल्या पाच वर्षांमधील सरासरीच्या वर दहा टक्क्यांपर्यंत असेल तर बाजाराचं मूल्यांकन ठीकठाक आहे, असं समजून दीर्घकालीन बचतीसाठी उपलब्ध होणारी छोटीमोठी रक्कम समभागाधारित योजनांमध्ये गुंतवायची आणि जेव्हा मूल्यांकन याच्या पलीकडे जाईल, तेव्हा तुलनेने कमी जोखमीच्या बॅलन्स्ड फंडात गुंतवायची. असे नियम हे गुंतवणूकदाराचं वय, जोखीम घेण्याची क्षमता आणि आवड, बाजाराशी संबंधित आकडेवारीचा मागोवा ठेवण्याची क्षमता अशा वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असू शकतात.

एसआयपीचा गेल्या काही वर्षांमधील प्रसार स्वागतार्ह आहेच. त्याच्या जोडीने असे काही नियम बसवणं, ते सलगपणे आणि काटेकोरपणे वापरणं आणि त्यातून गुंतवणुकीच्या निर्णयांमधली भावनांची भूमिका कमीत कमी राखणं या गोष्टी दीर्घकालीन गुंतवणूकदार करायला लागले तर शेअर बाजारातली गुंतवणूक ही परंपरागत समजुतीप्रमाणे जोखमीची बाब न राहता सर्वसामान्यांच्या समृद्धीचा राजमार्ग बनेल.

मंगेश सोमण

mangesh_soman@yahoo.com