एसबीआय मॅग्नम मिड कॅप फंड
एस अ‍ॅण्ड पी बीएसई ५०० या निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा नेहमीच ५ टक्के ते ८ टक्के अधिक परतावा आहे म्हणून या फंडाची आज शिफारस केलेली नाही, तर घसरणीच्या काळात अव्वल जोखीम नियंत्रण राखल्याने निर्देशांकापेक्षा कमी घसरण त्याने दाखविली यामुळे शिफारस आहे.

मोदी सरकारने आपला सत्ता सोपान चढल्याचा द्वितीय वर्धापन दिन नुकताच साजरा केला. या निमित्ताने २६ मे २०१४ ते २५ मे २०१६ या काळात सर्वाधिक वाढ झालेल्या १० समभागांची यादी एका अर्थविषयक वार्ताकन करणाऱ्या पाक्षिकाने प्रसिद्ध केली होती. या कालावधीतील सर्वोत्तम परतावा दिलेले हे समभाग मिड कॅप श्रेणीतील होते. वर उल्लेख केलेल्या कालावधीत या समभागांची वृद्धी ८७ ते १३४ टक्क्यांदरम्यान झाली. सप्टेंबर २०१३ ते जून २०१५ हा कालावधी मिड कॅप समभागांसाठी सुगीचा होता. त्याच्या जोडीला जून-जुलै २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत मिड कॅप समभागांची कत्तल झाली.
अर्थव्यवस्थेची संक्रमण अवस्था आता संपत आली असून अर्थव्यवस्था एका दीर्घ मुदतीच्या (३-४ वर्षे) वृद्धीच्या मार्गावर वाटचाल करू लागल्याची चिन्हे दिसत आहेत. ‘बीएसई ५००’ या निर्देशांकातील कंपन्यांचे वित्तीय निकाल मागील आर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीचे आधीच्या वर्षांच्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत उत्साहवर्धक आहेत. तेल व वायू उत्खनन/ शुद्धीकरण व बँका वगळता अन्य कंपन्यांना व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नात ३.८ टक्के ते ५.८ टक्के वाढ झाली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र वगळता बहुतांश उद्योग क्षेत्रातील कंपन्यांनी परिचालन नफ्यात ३.८ टक्के ते ४.१८ टक्के वाढ दर्शविली असून करपूर्व नफ्यातील वाढ २.४ टक्के ते ४.१ टक्के दरम्यान राहिली आहे. येत्या मोसमात सरासरीहून अधिक पावसाची अपेक्षा व सरकारचे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे धोरण पाहता, नफ्यात वाढ होण्याची वाटचाल अशीच पुढे सुरू राहील. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे नोकरदारवर्गाकडून वाढणाऱ्या रोकड सुलभतेमुळे arth06विविध उत्पादनांच्या मागणीत वाढ होईल. या कारणाने आर्थिक वर्ष २०१७-१८च्या अर्थव्यवस्था वाढीच्या वेगाबाबतचे अंदाज सात टक्क्य़ांपेक्षा अधिक असताना पुढील पाच ते सात वर्षांसाठी मिड कॅप गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड आदर्श गुंतवणूक ठरतात.
जुलै २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीतील मिड कॅप निर्देशांकांच्या खराब पाश्र्वभूमीवर एसबीआय मिड कॅप फंडाची कामगिरी उजवी आहे. पडत्या बाजारात जो फंड जोखीम नियंत्रित करून गुंतवणूकदाराच्या भांडवलाच्या सुरक्षिततेला महत्त्व देतो तो फंड तेजीत भरपूर परतावा देणाऱ्या फंडापेक्षा गुंतवणूकदारांच्या फायद्याचा असतो. फंडाचा परतावा नेहमीच एस अ‍ॅण्ड पी बीएसई ५०० या निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा ५ टक्के ते ८ टक्के अधिक आहे म्हणून या फंडाची आज शिफारस केलेली नसून घसरणीच्या काळात अव्वल जोखीम नियंत्रण राखल्याने निर्देशांकापेक्षा कमी घसरण त्याने दाखविल्यामुळे केली आहे. सोहिनी अंदानी या फंडाच्या निधी व्यवस्थापक आहेत. गेली आठ वर्षे त्या एसबीआय म्युच्युअल फंडात असून २०१० पासून त्या या फंडाच्या निधी व्यवस्थापक आहेत. हा फंड मल्टी कॅप प्रकारचा असून गुंतवणुकीसाठी ‘बॉटम अप अप्रोच’ प्रकारचे धोरण अवलंबतो. एकूण निधीच्या ६५-९० टक्के दरम्यान निधी हा मिड कॅप प्रकारच्या समभागात, १०-३५ टक्के निधी स्मॉल कॅप प्रकारच्या समभागात व बाजाराच्या परिस्थितीनुसार २० टक्केपेक्षा कमी निधी लार्ज कॅप प्रकारच्या समभागात गुंतविण्याची मुभा निधी व्यवस्थापकास आहे. या फंडाने बाजारमूल्यानुसार अनुक्रमे १०१ ते ४०० क्रमांकाच्या कंपन्यांची व्याख्या ‘मिड कॅप’ या प्रकारात केली आहे.

arth05मिड कॅप समभाग हे आर्थिक आवर्तन दिशा बदलाच्या दुसऱ्या टप्प्यात गुंतवणूकदारांना फायदा करून देतात. गतिशील झालेल्या अर्थ चक्रामुळे मिड कॅप समभागांची कामगिरी येत्या दोन-तीन वर्षांत लार्ज कॅपपेक्षा अव्वल असेल. गुंतवणूकदरांनी आपल्या गुंतवणुकीचा थोडा हिस्सा मिड कॅप गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडासाठी राखून ठेवावा.
* सोहिनी अंदानी , निधी व्यवस्थापक, एसबीआय म्युच्युअल फंड
फंडाच्या मागील ३६ महिन्यांचा विचार केल्यास जून २०१३ मध्ये फंडाची गुंतवणूक ३९ समभागांत होती. एप्रिल २०१६च्या फंड विवरणानुसार फंडाची गुंतवणूक ५२ समभागांत आहे. गुंतवणूक केलेल्या समभागांची संख्या वाढवून गुंतवणुकीतील जोखमीचे विकेंद्रीकरण करण्याचा फंड व्यवस्थापनाचा प्रयत्न नक्कीच दखल घेण्याजोगा आहे. या ५२ पैकी ११ समभाग मागील ३६ महिन्यांपासून, नऊ समभाग मागील ४८ महिन्यांपासून फंडाच्या गुंतवणुकीत आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्च २०१३ मध्ये आघाडीच्या दहा गुंतवणुकांचे प्रमाण एकूण गुंतवणुकीच्या ५० टक्के होते. मार्च २०१६ मध्ये हेच प्रमाण कमी करून ३५ टक्केवर आणले आहे. हे करीत असतानाच निधी व्यवस्थापकांनी एकूण गुंतवणुकीच्या १ टक्केपेक्षा कमी प्रमाण असलेल्या समभागांची संख्या वाढवत नेली आहे. मार्च १३ मध्ये १ टक्के कमी प्रमाण असलेले सात समभाग होते तर मार्च २०१६ मध्ये या समभागांची संख्या १७ होती. त्यामुळे साहजिकच गुंतवणुकीचे विकेंद्रीकरण झाले आहे. फंडाचा नफा या १ टक्के कमी असलेल्या समभागाकडून येतानाच जोखमीचे अव्वल व्यवस्थापन निधी व्यवस्थापकाकडून होत असल्याचे दिसून येत आहे.
arth07
बँकिंग व वित्तीय सेवा या क्षेत्रात फंडाने सर्वाधिक गुंतवणूक केली असून या क्षेत्रातील चोलामंडलम् इन्व्हेस्टमेंट या कंपनीत फंडाची सर्वाधिक ५.०२ टक्के गुंतवणूक आहे. आरोग्य निगा क्षेत्र दुसऱ्या क्रमांकावर असून स्ट्राईड्स, शासुन या समभागात ४.३२ टक्के गुंतवणूक आहे. गुंतवणुकीच्या तिसऱ्या क्रमांकावर अभियांत्रिकी क्षेत्र आहे. निधी व्यवस्थापकांनी नुकत्याच प्राथमिक खुल्या विक्री केलेल्या अनेक कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक केली असून डॉ. लाल पॅथलॅब, इक्विटास होल्डिंग्ज, थायरोकेअर या गुंतवणुकांनी परताव्याच्या दरास नक्कीच हातभार लावला आहे. मागील तीन वर्षांच्या कालावधीत हा फंड प्रत्येक तिमाहीत पहिल्या तीन क्रमांकांत राहिला आहे. क्रिसिलने या फंडाला ‘सीआरपी-२’ हा दर्जा दिला आहे. एसबीआय मॅग्नम मिड कॅप फंड हा सक्रिय गुंतवणूक व्यवस्थापन असलेला फंड आहे. निधी व्यवस्थापकाचा स्वत:च्या निर्णयक्षमतेवर असलेला विश्वास, एसबीआय म्युच्युअल फंडाचे समभाग संशोधन यामुळे अचूक वेळेला हा फंड समभागांची खरेदी विक्री करू शकला. आकर्षक मूल्यांना उपलब्ध असलेले लार्ज कॅप व अद्याप उत्तम कामगिरीच्या प्रतीक्षेत असणारे मिड व स्मॉल कॅप यांच्या संगमामुळे एसबीअ
ाय मॅग्नम मिड कॅप फंडाचा समावेश आपल्या गुंतवणुकीत असणे गरजेचे वाटते. हा फंड मिड कॅप असल्याने धोका पत्करून गुंतवणूक करून सरासरीहून अधिक परतावा मिळविण्याची अपेक्षा असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड आदर्श ठरावा.

वसंत माधव कुलकर्णी – shreeyachebaba@gmail.com