arth08
चार्ल्स डाऊ (डावीकडे) आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार एडवर्ड जोन्स

अमेरिकी शेअर बाजारातील जगद्विख्यात डाऊ जोन्स या निर्देशांकाला २६ मे २०१६ रोजी १२० वर्षे पूर्ण होत आहेत. कसा होता हा प्रवास, हे समजून घेऊ..
गेली १२० वर्षे अखंडपणे या निर्देशांकाची ‘टिक टिक’ चालू आहे. या संपूर्ण काळात अनेक इतिहास रचले गेले, प्रचंड उलथापालथ घडली. जागतिक स्तरावर अनेक आर्थिक संकटे आली. डाऊ जोन्स या सगळ्या घडामोडींचा साक्षीदार राहिला. तरीही डाऊ जोन्स जगातील दीर्घकाळ चालू असलेला ऐतिहासिक निर्देशांक नाही. तो मान डाऊ जोन्स दळणवळण सरासरी निर्देशांकाला जातो. डाऊ जोन्स निर्देशांक येण्याच्या १२ वर्षांपूर्वी म्हणजेच १८९६ पूर्वी, चार्ल्स डाऊ जे वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तसंस्थेचे संस्थापक होते आणि त्यांचे सहकारी एडवर्ड जोन्स यांनी शेअर बाजारभावातील चढ आणि उतार यांचे निरीक्षण आणि संशोधन करण्यासाठी सर्वप्रथम १८८४ साली रेलरोड निर्देशांकाला सुरुवात केली. रेलरोड ही त्या काळात अमेरिकेतील सगळ्यात बलाढय़ कंपनी होती. म्हणून त्या कंपनीच्या उलाढालीची सरासरी हा अर्थव्यवस्थेची सशक्तता मोजण्यासाठी केला जायचा. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर हे चित्र बदलले. या कालावधीत रेल्वे मागे पडून रस्ते आणि हवाई दळणवळण यांनी प्रगती केली. मग या निर्देशांकाचे १९७० साली ‘डाऊ जोन्स दळणवळण निर्देशांक’ असे नव्याने नामकरण करण्यात आले.
डाऊ निर्देशांक फक्त १२ कंपन्यांच्या सहभागाने सुरू झाला होता. त्या १२ कंपन्यांमधील एकमेव फक्त जनरल इलेक्ट्रिकचा सहभाग आज कायम आहे. आजही ती डाऊ ३० या निर्देशांकात कायमस्वरूपी ठाण मांडून आहे. या संपूर्ण १२० वर्षांच्या कालखंडात अपवादानेच ती निर्देशांकाबाहेर गेली. म्हणजे १८९८ ला बाहेर, परत १८९९ ला आत, १९०१ ला परत बाहेर आणि १९०७ ला जनरल इलेक्ट्रिक निर्देशांकात परतली. कंपनीच्या आत-बाहेर जाण्याची कारणे अनेक असू शकतात. निर्देशांकाचा समतोल साधण्यासाठी ते आवश्यक असते.
डाऊ जोन्सची आतापर्यंतची वाटचाल सरासरी काढूनच झाली असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही. सुरुवातीला चार्ल्स डाऊ हे सर्व समभागाच्या किमतीची बेरीज करून त्याला एकूण सूचिबद्ध कंपन्यांच्या संख्येने भागत असत. पण पुढेपुढे शेअरविभाजन आणि लाभांश यामुळे समभागाचा भाव कमी होत असे त्यामुळे यातील क्लिष्टता वाढत गेली. १९१६ साली डाऊ निर्देशांक १२ वरून २० नोंदणीकृत कंपन्यांचा झाला तेव्हा जनरल इलेक्ट्रिक कंपनीचे समभाग मूल्य ४ पटीने वाढले. समभागाचे विभाजन झाले तेव्हा १:४ या गुणोत्तरानुसार त्याचे सरासरी मूल्यदेखील वाढले. त्यामुळे १९२८ साली डाऊ जोन्स हा निर्देशांक २० वरून ३० नोंदणीकृत कंपन्यांचा झाला. आणि विभाजकाचा जन्म झाला. तेव्हा ही पद्धत बदलून विभाजनापूर्वी डाऊ समान पातळीवर राहण्यासाठी प्रत्येक वेळी विभाजनात एक विभाजक जुळवून त्या समभागाचे मूल्यांकन सुनिश्चित केले गेले. कालांतराने विभाजक समभाग विभाजनात विलीन होत असे. गेल्या काही वर्षांत शेअर विभाजनाचा विभाजक आटत आहे. २७ मे १९८६ रोजी विभाजकाची एकच्या खाली घसरण झाली ती अजूनही आहे तिथेच आहे जिथे एकपेक्षा कमी संख्येने भागून विभाजक एक गुणक होते. आज डाऊवरील ३० समभागांचे गुणक मूल्य २६०० डॉलर आहे तर डाऊचे मूल्य १८०००च्या खाली चढ-उतार होत आहे.
आज जगातील सगळ्या निर्देशांकांचे भारांकन हे त्यावर नोंदणीकृत कंपनीच्या भागभांडवलावर ठरते, परंतु डाऊ जोन्स निर्देशांक त्यातील नोंदणीकृत कंपनीच्या समभाग मूल्यावर आधारित आहे. जेवढे कंपनीच्या समभागाचे मूल्य जास्त तेवढा डाऊ जोन्स जास्त वधारतो किंवा खाली येतो. उदाहरणार्थ डाऊ जोन्सवर आज ३एम या कंपनीचा शेअर सगळ्यात महाग म्हणजे १६५ डॉलर होता, त्यामुळे त्याचा परिणाम डाऊ जोन्सचे मूल्य वधारण्यावर होतो. त्या उलट सिस्को कंपनीच्या शेअर्सचा भाव २७.९७ डॉलर हा निर्देशांकातील सगळ्यात स्वस्त होता, परंतु त्याचा परिणाम डाऊ जोन्सवर पडत नाही.
वर्षांतील १२० पैकी ७८ वेळा हा निर्देशांक वधारला आहे. यावरून निर्देशांकाचे वर जाण्याचे उजवे प्रमाण स्पष्ट होते; परंतु डाऊ जोन्सने पहिल्याच वर्षांत प्रचंड मोठी आपटी खाल्ली होती. ऑगस्ट १८९६ साली पहिल्या ४०.९४ या सरासरीवरून तो तब्बल ३०टक्के म्हणजेच २८.४८ या सरासरीवर घसरला होता. त्या वेळी अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचे वारे वाहत होते, विल्यम मॅकिन्ले विरुद्ध विल्यम जेनिंग अशी लढत सुरू होती. या कालावधीत डाऊ जोन्सनी बाजारातील गुंतवणूकदारांना प्रचंड निराश केले आणि हाच आजपर्यंतचा डाऊ जोन्स निर्देशांकाचा ऐतिहासिक नीचांक ठरला आहे. ऑगस्ट १८९६ साली लावलेली उच्च पातळी तोडायला निर्देशांकाला ८ जुलै १९३२ या दिवसाची वाट पाहावी लागली. त्या दिवशी हा निर्देशांक ०.७% वधारून ४१.२२ वर बंद झाला. तब्बल ३६ वर्षे लागली आणि गुंतवणूकदारांनी जल्लोष केला. परत ही पातळी डाऊ जोन्सने मागे वळून बघितली नाही. डाऊने सर्वोच्च ३४७२ अंकाची चाल २०१३ मध्ये, तर ४४८८ अंक ही सर्वाधिक घसरगुंडी २००८ साली नोंदविली आहे. तर टक्केवारीनुसार १९३१ साली ५२.७ टक्क्यांची वार्षिक घसरगुंडी आणि १९३३ साली ६६.७% ची वार्षिक उसळी हे सर्वोच्च वध-घटीचे प्रमाण आहे. २९ सप्टेंबर २००८ हा या निर्देशांकासाठी काळा दिवस. या दिवशी ७७७.६८ अंकाची घसरण तर १३ ऑक्टोबर २००८ या एका दिवशी ९३६.४२ अंकांनी निर्देशांकात वाढ झाली.
डाऊ जोन्स ३० निर्देशांकात कंपन्यांच्या सहभागाच्या प्रक्रियेवर अनेक कंपन्यांची नाराजी आहे. काहींना ही पद्धत मान्य नाही. उदाहरणार्थ अ‍ॅपल कंपनीच्या स्टीव्ह जॉब्स यांनी एकदा डाऊ जोन्सच्या कार्यालयात फोन करून विचारले की, ‘माझी कंपनी निर्देशांकात का समाविष्ट केली नाही.’ त्यावर कार्यालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने त्यांना सांगितले की, ‘तुमच्या कंपनीच्या शेअरचा भाव हा अत्यंत कमी कालावधीत खूप मोठय़ा प्रमाणात वाढला (६०० डॉलर/शेअर). जर तिला समाविष्ट केले असते तर निर्देशांकाच्या मूल्यात खूप मोठी वाढ झाली असती आणि अ‍ॅपलच्या शेअरने सर्वावर कुरघोडी केली असती, म्हणून आम्ही तिला समाविष्ट केले नाही.’ स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनानंतर अ‍ॅपलचा शेअर विभागला गेला आणि नंतर निर्देशांकात त्याने जागा मिळविली; परंतु जॉब्स यांच्या हयातीत ते घडले नाही. हेच या निर्देशांकाचे द्योतक आहे जी नियमावली परंपरेनुसार चालत आली आहे त्यात बदल करण्याची गरज त्यांना वाटत नाही. आज १२० वर्षांनंतरही त्याच नियमावलीनुसार निर्देशांकांत समभाग समाविष्ट केले जातात, इतकी चोख व्यवस्था डाऊ आणि जोन्स यांनी करून ठेवली आहे. यावरून स्पष्ट झाले असेल की डाऊ जोन्स हा अमेरिकेतील गुंतवणूकदारांचाच नाही तर जगातील गुंतवणूकदारांचा मानाचा निर्देशांक आहे.
मिलिंद म. अंध्रुटकर – milind1126@gmail.com
(लेखक शेअर बाजार विश्लेषक आणि गुंतवणूक सल्लागार)