राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला. ‘राजा, चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीचे निकाल अभ्यासल्यानंतर गुंतवणुकीसाठी चार कंपन्यांची नावे तू वाचकांना सांगणार आहेस. आधी वचन दिल्याप्रमाणे या क्रमातील तू निवडलेली तिसरी कंपनी वाचकांना आज सांग. ही कंपनी तू सांगितली नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’ वेताळाने राजाला सांगितले.
‘थोर गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांच्या Buy investments as you would buy groceries, not perfumes!l हे वाक्य तुला ठाऊक आहेच. किराणा खरेदी करताना माणूस अतिशय चिकित्सक असतो पण अत्तर खरेदी करताना फारशी चिकित्सा करीत नाही. गुंतवणुकीसाठी शेअर निवडताना चिकित्सक असायला हवे. शेअरची चिकित्सा स्वत: करायला हवी. प्रत्यक्षात आपण शेअर खरेदी अत्तरांसारखी म्हणजे भावनावश होऊन करतो असे बफे साहेबांचे म्हणणे आहे,’ राजा म्हणाला. ‘हे बघ. आज जी कंपनी सुचवत आहे तिचा लोगो रोज तू पाहतोस. परंतु ही कंपनी बाजारात सूचिबद्ध आहे हेसुद्धा तुझ्यासकट अनेकांना ठाऊक नसेल. मोटारीच्या समोरच्या काचेवर हा लोगो दृष्टीस पडतो. शेअर खरेदी-विक्री करणाऱ्या किती लोकांनी हा लोगो पाहून या कंपनीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असा प्रश्न विचारला तर ९९ टक्के गुंतवणूकदारांचे उत्तर केला नाही असेच असेल. आजची कंपनी असाही इंडिया ग्लास ही कंपनी जपानी बहुराष्ट्रीय मित्सुबिशी समूहातील असाही या जागतिक काच निर्मात्या कंपनीची भारतातील उपकंपनी आहे. जपानच्या सुझुकीने भारतात मारुती उद्योगातील एक भागीदार म्हणून भारतात प्रवेश केला तेव्हा आजची ही कंपनी भारतात मारुतीच्या वाहनांसाठी काचा तयार करण्यासाठी स्थापन झाली. भारतात ही कंपनी प्रामुख्याने वाहनांसाठी (विंड स्क्रीन), सौर ऊर्जेसाठी वापरल्या जाणाऱ्या पॅनेलमध्ये (सोलर ग्लास) वापरण्यासाठी व इमारतींच्या दर्शनी भागात वापरल्या जाणाऱ्या काचांचे उत्पादन करते. या कंपनीचा काच तयार करण्याचा मुख्य कारखाना (मदर प्लांट) आपल्या महाराष्ट्रात पनवेलजवळच्या तळोजा औद्योगिक वसाहतीत आहे. पुणे, फरिदाबाद, चेन्नई यासारख्या वेगवेगळे वाहन उत्पादक असलेल्या ठिकाणी या कंपनीचे जुळणी कारखाने आहेत. वाहनांसाठीच्या काचेच्या विक्रीत या कंपनीचा ७७ टक्के बाजार हिस्सा आहे. मारुती, टोयोटा, निस्सान, होंडा या जपानी वाहन उत्पादकांची व व्होल्वो, फोर्ड, फियाट, मर्सिडीज, स्कोडा या बहुराष्ट्रीय वाहन उत्पादकांची असाही इंडिया ही ‘डेडिकेटेड सप्लायर’ आहे. या वाहन उत्पादकांचे प्रत्येक वाहन हे असाही इंडियाच्याचे विंड शिल्ड लावून कारखान्याबाहेर येते,’ राजाने माहिती दिली.
‘इमारतीसाठी वापरल्या जाणाऱ्या काचेच्या बाजारपेठेत कंपनीचा बाजार हिस्सा ६५ टक्के आहे. कंपनीच्या विक्रीपैकी ६५ टक्के विक्री ही वाहनांसाठीच्या काचेच्या विक्रीतून तर ३२ टक्के ही इमारतीच्या वापराच्या काचेच्या विक्रीतून होते. मागील वर्षांपासून कंपनीने कमी प्रतीचे ‘फ्लोट ग्लास’ उत्पादन बंद केले असून ही क्षमता इमारतींसाठी वापरायच्या मूल्यवर्धित काचांच्या उत्पादनासाठी वापरात आणण्यावर भर दिला आहे. ग्राहकाने मागणी नोंदविल्यापासून काचेचा पुरवठा करण्याचा कालावधी कमी झाल्यामुळे कंपनीची नजीकची स्पर्धक असलेल्या सांत गोबान (फ्रेंच उच्चार) व स्थानिक व असंघटित क्षेत्रातील काच उत्पादक जे प्रामुख्याने ‘रिप्लेसमेंट मार्केट’मध्ये कार्यरत असलेल्यांकडून व्यावसाय खेचून घेणे असाही इंडियाला शक्य होणार आहे.’
‘सतत तेराव्या महिन्यात विकल्या गेलेल्या वाहनांच्या संख्येत वाढ नोंदवणाऱ्या प्रवासी वाहन उत्पादकांच्या उत्साहदायी आकडेवारीची ही कंपनी थेट लाभार्थी आहे. भविष्यात सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर या वाहन विक्रीतील विस्ताराला आणखी बहर येईल. भारतात निवासी बांधकाम क्षेत्रात मंदी असली तरी व्यापारी वापरासाठी असलेल्या बांधकाम क्षेत्राची वाटचाल निराशाजनक नक्कीच नाही. त्यामुळे असाही इंडियाची उत्पादने प्रामुख्याने व्यावसायिक वापरांसाठी असलेल्या संकु लात वापरात असल्याने बांधकाम क्षेत्रातील मंदीचा फटका या कंपनीला बसलेला नाही. आगामी दोन वर्षांचा विचार केल्यास विक्री नफा व प्रति समभाग मिळकत – ‘ईपीएस’ अनुक्रमे १२ टक्के, १८ टक्के व २० टक्क्यांनी वाढणे अपेक्षित आहे. मिड कॅप शेअर्सचे मूल्यांकन त्यांच्या विक्रीतील व नफ्याच्या वाढीवरून करायचे असल्याने २०१७ च्या उत्सर्जनावर आधारित ‘पी/ई’ आठ पट तर २०१८ च्या उत्सर्जनावर आधारित ‘पी/ई’ सात पट असल्याने अन्य मिड कॅप शेअर्सच्या तुलनेत हा शेअर नक्कीच महाग नाही,’ राजा म्हणाला. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.
पुंगीवाला – gajrachipungi @gmail.com