आज युरोप, अमेरिकेसारख्या देशांत आर्थिक मानसिकता (बिहेव्येरल फायनान्स) या विषयावर खूप संशोधन चालू आहे. पुष्कळ मानसोपचारतज्ज्ञ यावर काम करीत आहेत. जुगारी प्रवृत्ती हा मानसिक रोग समजला जातो. त्यावर औषधोपचार करता येतात. जोखीम घेणे ही प्रवृत्ती असते. त्यातही प्रकार असतात. म्हणजे युद्धात भाग घेणारा शूर जवान गुंतवणुकीच्या बाबतीत जोखीम न घेणारा असू शकतो. जोखीम घेण्याची वृत्ती हा खूपदा वडिलोपार्जित येणाऱ्या स्वभावांचा/संस्कारांचा भाग असू शकतो. उदा. मराठी माणसाचा कल व्यवसायापेक्षा नोकरीकडे असतो. जोखीम घेण्याची वृत्ती अभ्यासाने बदलू शकते. तसेच तुमच्याजवळ पैसा असेल तर जोखीम घेण्याची वृत्ती येईलच असे नाही. डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट यांसारखे उच्चविद्याविभूषित पैसा असूनही शेअर बाजारात गुंतवणूक नको म्हणतात. याउलट धीरुभाईंना हातात शिक्षण, पैसा नसतानाही मोठा उद्योग उभारण्याची ऊर्मी होती.

माझ्या मागील लेखावर खूप प्रतिक्रिया आल्या. प्रत्येकाला आपल्या स्वभावाचे प्रतिबिंब त्यात दिसले. प्रत्येकाने हा विषय जास्त सविस्तर मांडण्यास सुचविले आहे. आपल्या गुंतवणुका भीती आणि हव्यास या हिंदोळ्यावर हेलकावे घेत असतात. बाजारात तेजी आली की बाजार अजून वर जाईल, अजून जाईल असे वाटत राहते. म्हणून नफा रोखीकरण (प्रॉफिट बुकिंग) केले जात नाही. उलट अजून खरेदी केली जाते. बाजार खाली गेला की, अजून खाली जाईल याची वाट बघण्यात वेळ निघून जातो.

कार्ल रिचर्ड्स यांनी यासाठी सुंदर रेखाटन दाखविले आहे.

arth02बाजार वर जाऊ  लागला, की आपण आशावादी होतो, अजून वर जाणार म्हणून खरेदी करू लागतो आणि खाली जाऊ  लागल्यावर आता आपले मुद्दल पूर्ण बुडणार या भीतीने शेअर्स विकू लागतो. ब्रेग्झिटच्या दिवशी सर्व टीव्ही वाहिन्यांवर चर्चा इतक्या भयंकर होत्या की, आता सर्व संपले. जणू काही जगबुडीच होणार! लेहमन ब्रदर्सप्रमाणे (२००८) मोठी मंदी येणार! परंतु मुंबई शेअर बाजार १४० वर्षे जुना आहे. दोन जागतिक महायुद्धे बघून ताठ उभा आहे. (हा विश्वास देण्यासाठी मुंबई बाजाराची इमारत टोलेजंग आहे.) या ठिकाणी आर्थिक नियोजनकाराची मदत होते. हात धरून किनाऱ्यावर आणण्यास मदत होते. बाजाराचा निर्देशांक २९,००० झाल्यावर प्रत्येक अशिलाचा फोन येतो- ‘आता इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक वाढवू या का?’

या ठिकाणी टेक्निकल अ‍ॅनालिसिसचा अभ्यास कामी येतो. बाजार वर जाण्याची शक्यता काय आहे? किंवा खाली गेल्यास जाऊन-जाऊन किती जाऊ  शकतो याचा साधारण (ढोबळेपणे) अंदाज बांधता येतो.

भारतात टेक्निकल अ‍ॅनालिसिसचा वापर रोजच्या रोज (डे ट्रेडिंग) व्यवहारांसाठी करण्याची वृत्ती आहे. याकडे लोक मजा किंवा मनोरंजन या नजरेने पाहतात. दलाल स्ट्रीट आणि वानखेडे स्टेडियममध्ये खूप अंतर (फरक) आहे. आज तुम्हास ज्या ठिकाणी नंबर घेऊन रांगेत बसून राहावे लागते (उदा. डॉक्टरचा दवाखाना). अशा ठिकाणी मनोरंजन म्हणून दूरदर्शन संच चालू असतो. त्यावर हमखास सीएनबीसी किंवा झी-बिझनेस वाहिनी चालू असते. गुंतवणूक हा विवेकी, अभ्यास करून, मन लावून करण्याचाच ‘व्यवसाय’ आहे.

कार्ल रिचर्ड्स यांनी यासाठी दुसरे रेखाटन दिले आहे.

सिनेमा-नाटकाच्या तिकिटाची किंमत, कोणत्याही खेळाच्या सामन्याच्या तिकिटाची रक्कम किंवा तत्सम कोणत्याही मनोरंजनाच्या साधनांची (पुस्तक/गाण्याची सीडी) किंमत व डे ट्रेडिंगसाठी गुंतवण्याची रक्कम यात खूप फरक आहे. गुंतवणूक आणि मनोरंजन यातील गल्लत कायमच चुकीच्या निर्णयात रूपांतरित होते. हा चुकीचा निर्णय अतिशय महागात पडणारा असतो. डे ट्रेडिंग हीसुद्धा एक प्रकारची नशा आहे. ती रोज सकाळी ९ ते दुपारी साडेतीनपर्यंत राहते. नंतर उतरते. वेळ जाण्याचे साधन म्हणूनही लोक डे ट्रेडिंगकडे वळतात.

माझ्या परिचयात शनिवार, रविवार शेअर बाजार बंद असतो म्हणून बेचैन होणारे लोक आहेत. पुष्कळ ई-मेल असेही येतात की, माझ्या पत्नीने नुकतीच स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे, तर तिला डे ट्रेडिंगसाठी तुम्ही मार्गदर्शन कराल का? मग मी त्यांना सांगतो, ‘आर्थिक नियोजनकार होण्याआधी, २५ वर्षे मी शेअर दलाल म्हणून काम केले आहे. आजपर्यंत डे ट्रेडिंग करून आमच्या पेढीतून रोज फायद्याचा चेक घेऊन जाणारा अजून तरी नाही. डे ट्रेडिंग करून एकाला फायदा झाला, तर दुसऱ्याला नुकसान होणारच. शेवटी सर्व गोळाबेरीज शून्य (झिरो सम गेम) होणारा हा खेळ आहे.’

arth01चंद्रशेखर सरकार कोसळले त्या दिवशी एचडीएफसी बँकेचा १० रु. किमतीचा शेअर फक्त ३० रुपयास होता. आज तो शेअर दोन रुपये दर्शनी मूल्याचा झाला, पण किंमत हजारच्या वर गेली आहे. १९९८च्या लीजिंग फायनान्स कंपन्यांच्या मंदीमध्ये श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स कंपनीचा १० रु. दर्शनी मूल्याचा शेअर आठ रुपयांना मिळत होता. त्यानंतर काही वर्षे तो २० रुपयांच्या आतच होता. आज तो १३०० रुपयांवर आहे. येस बँकेचा शेअर २००५-२००६ च्या सुमारास ६२ रुपयाला मिळत होता. २००८ च्या तेजीत २५० पर्यत जाऊन मंदीत पुन्हा ४५ रुपयांपर्यंत खाली आला होता. आज तो १२०० रुपयांच्या जवळपास आहे. या सर्व कंपन्यांनी आजपर्यंत दिलेला लाभांश याहून वेगळाच आहे.

माणूस ज्या समाजात राहतो, त्यानुसार त्याच्या निर्णयप्रक्रियेत फरक पडतो. गुंतवणूक निर्णयांवरसुद्धा याचा परिणाम होतो. आपले सर्व मित्रमंडळ एखादा शेअर घेत आहे, म्हणून आपणही तो घेतो. हर्ड मेंटॅलिटी! समूहाने घेतलेले निर्णय बरोबरच असणार हे आपण गृहीत धरतो. समूहाच्या निर्णयात सुरक्षिततेची भावना असते, जी मेंढय़ांच्या कळपातसुद्धा आढळते आणि समजा निर्णय चुकलाच तर माझ्याबरोबर माझ्यासारखे कळपात अजूनही असतात. (टिप्सनुसार गुंतवणूक करणे हा यातलाच प्रकार आहे.) असे निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते.

गुंतवणुकीच्या या भावनात्मक बाबीतून बाहेर येण्यासाठी उपाय काय?

मालमत्ता विभागणी (अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन) आणि वैविध्यपूर्ण गुंतवणूक (डायव्हरसिफिकेशन) हे याचे उत्तर होय.

आपल्या जोखीम क्षमतेचा अंदाज घेऊन आपली गुंतवणूक तरल (रोकडसुलभ) अशा कर्जरोखे, बँक ठेवी, शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने/चांदी, स्थावर मालमत्ता यांत विभागून गुंतवणे. तसेच प्रत्येक प्रकारात गुंतवणूक करताना वेगवेगळ्या क्षेत्रांत (सेक्टर्समध्ये) करणे. उदा. बँक ठेवी एकाच बँकेत न ठेवता, सरकारी, सहकारी व खासगी बँकांत विभागून ठेवणे. शेअर्स निवडताना वेगवेगळ्या सेक्टर्समधील निवडणे. म्युच्युअल फंड गुंतवणूकही लार्ज कॅप, मिड कॅप स्वरूपात विभागणे इत्यादी.

बहुतेक वाचक विजय केडियांच्या दहा नियमांनी प्रभावित झाले. त्यांचा एकच प्रश्न, असे शेअर्स आम्ही कसे निवडावे? हा प्रश्न म्हणजे अभ्यासाचे पुस्तक न वाचता गाईड वाचण्यासारखे आहे; पण तरीसुद्धा परीक्षा जवळ आल्यावर प्राध्यापक महत्त्वाचे टॉपिक्स सांगतात तसे सांगतो. भारतात पुढील दहा-पंधरा वर्षे ज्या सेक्टरला नुकसान होण्याची शक्यता नाही असे क्षेत्र निवडा. उदा. बँकिंग, फार्मा, ऑटो इ. त्या क्षेत्रातल्या चांगल्या कंपन्या निवडा, त्यांचे व्यवस्थापन चांगले आहे का हे तपासा व असे शेअर्स निवडा.

समजा, आज सरकारतर्फे  पायाभूत सुविधा क्षेत्रावर भर दिला जात आहे. नवीन रस्तेबांधणी, पुलांसाठी सिमेंट लागणार – त्या क्षेत्रातील चांगले व्यवस्थापन असलेल्या कंपन्या निवडा. बाजार खाली गेल्यास असे शेअर्स कमी भावास मिळत असतील, तर अजून घ्या. चंद्रशेखर सरकार कोसळले त्या दिवशी एचडीएफसी बँकेचा १० रु. किमतीचा शेअर फक्त ३० रुपयास होता. आज तो शेअर दोन रुपये दर्शनी मूल्याचा झाला, पण किंमत हजारच्या वर गेली आहे. १९९८च्या लीजिंग फायनान्स कंपन्यांच्या मंदीमध्ये श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स कंपनीचा १० रु. दर्शनी मूल्याचा शेअर आठ रुपयांना मिळत होता. त्यानंतर काही वर्षे तो २० रुपयांच्या आतच होता. आज तो १३०० रुपयांवर आहे. येस बँकेचा शेअर २००५-२००६ च्या सुमारास ६२ रुपयाला मिळत होता. २००८ च्या तेजीत २५० पर्यत जाऊन मंदीत पुन्हा ४५ रुपयांपर्यंत खाली आला होता. आज तो १२०० रुपयांच्या जवळपास आहे. या सर्व कंपन्यांनी आजपर्यंत दिलेला लाभांश याहून वेगळाच आहे. इतक्या फायद्यासाठी आपल्या निणर्यावर ठाम विश्वास हवा, प्रचंड धीर हवा. मग अशी उभरती चांगल्या व्यवस्थापनाची कंपनी/बँक मी शोधली आहे. तुम्हीपण प्रयत्न करा.

आपण आपल्या नोकरीधंद्यात मग्न असतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनात दिवस कसा संपतो समजत नाही. त्यात आपल्या व्यवसायाबाबत अद्ययावत ज्ञान बाळगण्यासाठी अभ्यास करावा लागतो. मग हे फंडामेंटल अ‍ॅनालिसिस आणि टेक्निकल अ‍ॅनालिसिसचा अभ्यास चार-पाच वर्षे कोण करणार? आणि वैविध्यपूर्ण मालमत्ता विभागणी कोण करणार? त्याची नियमित देखरेख, तपासणी कोण करणार? याला सोपा उपाय!

ऐसा सल्लागारा शरण जावे जो आपले हित पाहे..

तुमचा आर्थिक नियोजनकार जर तुमची मानसिकता समजून घेणारा असेल तर सोन्याहून पिवळे! गुंतवणूक करणे ही एक मानसिकता आहे. कौशल्याचा भाग थोडा कमीच. आपल्या आर्थिक नियोजनकाराच्या संपर्कात राहा; त्याच्याशी अर्धवार्षिक/ वार्षिक बैठकांमध्ये चर्चा करा; तुमचे मुद्दे स्पष्टपणे विचारा. आपल्या मुलांना आर्थिक चर्चामध्ये सहभागी करून घ्या. आपल्याला पैशाचे ‘मूल्य’ काय हे समजावून घ्या. तुम्हाला समजले तर तुमच्या मुलांना समजेल.

आपल्या गुंतवणुका उद्दिष्टाभिमुख ठेवा. बाजार खाली जाईल किंवा वर जाईल. आपली उद्दिष्टे साध्य होणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे.

सायमन सिनेक या विचारवंताचे एक पुस्तक आहे ‘स्टार्ट विथ व्हाय?’ त्याच्या अनुषंगाने विचार करत, आपण ही गुंतवणूक नक्की का करतो आहोत- हा प्रश्न स्वत:लाच विचारा. त्या ‘व्हाय’चे उत्तर मिळेपर्यंत एक अल्पविराम घ्या. माझ्याकडे आर्थिक नियोजनासाठी बहुतेक वेळा पती-पत्नी दोघेही येतात. एक महिला नेहमी एकटीच येत असे. असेच एकदा तिला विचारले, ‘पैशाचे तुमच्या दृष्टीने महत्त्व काय?’ ती पटकन म्हणाली, ‘स्वातंत्र्य’. स्वातंत्र्य म्हणजे काय? विचारल्यावर ती रडायला लागली. तिला लवकर घटस्फोट घ्यायचा होता. त्या ‘व्हाय?’चा संपूर्ण रोखच त्यानंतर बदलून गेला. गुंतवणूक करणे ही एक कार्यपद्धती बनवा. का (व्हाय?) या प्रश्नाचे उत्तर आल्यावर कसे (हाऊ?) हा प्रश्न विचारा. गुंतवणुका सोप्या ठेवा. उदा. शेअर खरेदी करून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा म्युच्युअल फंडांचा नफा थोडा कमी असेल, पण जोखीमही कमी असेल.

सध्या पुढारलेल्या राष्ट्रांत रोबो सल्लागार आहेत. म्हणजे सर्व व्यवहार संगणकावर, तुमच्या प्रश्नांना उत्तरेसुद्धा संगणक देणार. यामध्ये सल्लागाराची फी फारच थोडी आकारली जाते. कारण प्रत्येक गोष्टीचे फॉरमॅट बनवलेले असते. भारतातसुद्धा ही प्रथा हळूहळू येऊ  लागली आहे; परंतु आपल्या ग्राहकाच्या अंतरंगात शिरून, त्याच्या भावना जाणून घेण्याची कुवत फक्त माणसातच असते. अशी सहसंवेदना जाणणारा आर्थिक नियोजनकार असेल तर आपली आर्थिक उद्दिष्टे नक्कीच साकार होतील.

जयंत विद्वांस – Sebiregisteredadvisor@gmail.com

(लेखक ‘सीएफपी’ पात्रताधारक आर्थिक नियोजनकार व सेबीद्वारा नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)