arth03कोरल लॅबॉरेटरीज लिमिटेड ही १९९७ मध्ये स्थापन झालेली एक छोटी फार्मा कंपनी. डेहारादून, दमण आणि वसई या तीन ठिकाणी कंपनीचे कारखाने असून कंपनी अँटिबायोटिक, विटॅमिन, प्रोटीनपूरक औषधी, कफ सिरप, नॅजल स्प्रे, आय आणि इयर ड्रॉप, अ‍ॅण्टी बॅक्टेरिया, अँटासिड, कॅल्शियम, मधुमेह इ. अनेक (सुमारे ४००) उत्पादने तसेच १२ डोसेज फॉम्र्स बनवते. नित्यपयोगी लागणाऱ्या औषधांची वाढती गरज आणि बाजारपेठ पाहता कंपनीकडून उत्तम कमगिरीची अपेक्षा आहे.

गेल्या आर्थिक वर्षांत सुमारे ७७ कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या या कंपनीकडून यंदा सुमारे ९०, तर पुढील आर्थिक वर्षांत १०० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. कंपनीच्या उलाढालीत ५० टक्के वाटा निर्यातीचा आहे. यंदा पहिल्या तिमाहीत कंपनीने १७.८५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २.९५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे.

कोरल लॅबॉरेटरीजने गेली पाच वर्षे उत्तम आर्थिक कामगिरी करून नक्त नफ्यात सातत्याने २४ टक्क्यांहून जास्त वाढ दाखवली आहे. काहीही कर्ज नसलेल्या या छोटय़ा कंपनीचे भवितव्य म्हणूनच उज्ज्वल वाटते. कंपनीचे भरणा झालेले भागभांडवल केवळ ३.५७ कोटी रुपये असून त्यापैकी जवळपास ७२ टक्के प्रवर्तकांकडे असल्याने शेअरची द्रवणीयता मात्र कमी आहे, हे लक्षात घेऊन मगच खरेदीचे धोरण ठरवावे. तसेच पोर्टफोलियोमध्ये मायक्रो आणि स्मॉल कॅप शेअर्समधील गुंतवणूक १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावी.
arrh01

अजय वाळिंबे stocksandwealth@gmail.com