भारतीय औषधी कंपन्या आता खऱ्या अर्थाने बहुराष्ट्रीय कंपन्या झाल्या असतानाही गेली दोन वर्षे या क्षेत्रातील बहुतांशी कंपन्यांना तशी untitled-8वाईटच गेली. म्हणजे त्यांची आर्थिक कामगिरी चांगली असूनही अशी परिस्थिती ओढवण्याचे मुख्य कारण म्हणजे यूएस एफडीए ही अमेरिकेची नियामक यंत्रणा होय. सन फार्मा, ल्युपिन, इप्का, कॅडिला किंवा वोक्हार्ट अशा अनेक भारतीय कंपन्यांना गेल्या वर्षभरात यूएस एफडीएकडून त्यांच्या नियमांचे उल्लंघन केल्यासंबंधी नोटिसा आलेल्या आहेत. ज्या औषधी कंपन्या आपली उत्पादने अमेरिकेत विकतात किंवा त्याचे विपणन करतात अशा सर्व कंपन्यांना अमेरिकेतील एफडीए नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. वर उल्लेखलेल्या सर्वच कंपन्या आपल्या गुणवत्तेच्या जोरावर केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही आपले स्थान राखून आहेत. आतापर्यंत डिव्हीज लॅबॉरेटरीज यूएस एफडीएच्या ताब्यातून वाचली होती. मात्र डिसेंबर  महिन्यात या कंपनीच्या विशाखापट्टणम येथील कारखान्याला यूएस एफडीएची नोटीस (फॉर्म ४८३) मिळाली असून त्यामुळे कंपनीचा शेअर जवळपास ३० टक्के खाली आला आहे. विशाखापट्टणममधील युनिट २ येथून होणाऱ्या उत्पादनांचा कंपनीच्या उलाढालीत सर्वात मोठा म्हणजे जवळपास ६५ टक्के वाटा आहे. मात्र यामध्ये अमेरिकेचा वाटा केवळ १५-२०% इतकाच आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्षभरापूर्वी याच उत्पादन केंद्राचे परीक्षण केले असता त्यात काहीही वावगे आढळले नव्हते. डिव्हीज लॅबॉरेटरीज या सर्व प्रक्रियेतून कुठल्याही दोषारोपाशिवाय सहीसलामत बाहेर पडेल याची खात्री कंपनी व्यवस्थापनाला आहे. शेअर बाजारातील एक महत्त्वाचा नियम म्हणजे जितका धोका जास्त तितका नफा जास्त. कुठलेही कर्ज नसलेल्या या कंपनीने डिसेंबर २०१६ साठी संपणाऱ्या तिमाहीसाठी ९७३.४४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २६८.३२ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो ९ टक्के अधिक आहे. सध्या ७५० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर मध्यम कालावधीतच तुम्हाला भरपूर फायदा करून देऊ  शकतो.

सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.