प्रसंगी व्याजदर वाढवून महागाईला वेसण घालणारे या अर्थाने ‘इन्फ्लेशन हॉक’ अशी ओळख मिळविणारे रिझव्‍‌र्ह बँकेचे मावळते व माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि दुव्बुरी सुब्बाराव.
राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला. ‘राजा मागील मंगळवारी जाहीर झालेले किरकोळ किमतींवर आधारित जून महिन्याचे महागाईचे आकडे (सीपीआय) उद्योग जगताच्या काळजाचे थरकाप उडविणारे आहेत. महागाई वाढीचे नक्की कारण काय व महागाईवर काबू मिळविता येईल काय या प्रश्नाचे उत्तर तू सांगितले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’ वेताळाने राजाला सांगितले.
‘तुझे म्हणणे खरे आहे’, राजा म्हणाला. ‘सीपीआयचे आकडे नक्कीच थरकाप उडवणारे आहेत. मार्च महिन्यात महागाईचा दर ४.८३% होता जून महिन्यात या दरात वाढ होऊन हा दर ५.७७% झाला आहे. तीन महिन्यांत महागाईचा दर ०.९४ % वाढला आहे. मागील तीन वर्षांतील ही वाढ सर्वात वेगाने झालेली वाढ आहे. या वाढीला निर्देशांकातील अन्नधान्य, भाजीपाला हे कारणीभूत आहेत. कृषी क्षेत्रातील फळे, डाळी व सेवा क्षेत्रात शिक्षण व आरोग्यनिगा तर उत्पादन क्षेत्रात साखरेच्या किमती वेगाने वाढल्या. जून महिन्यात भाज्यांच्या किमतीत १७% वाढ झाली. ही वाढ सप्टेंबर २०१५ नंतरची एका महिन्यातील सर्वाधिक वाढ आहे. मार्च २०१३ ते नोव्हेंबर २०१३ या कालावधीत महागाईच्या किमतीत सर्वाधिक ३८% वाढ झाली होती. घरभाडय़ात ५.१२ % वाढ झाली तर तेल व वायू संलग्न इंधन व वीजनिर्मितीच्या किमतीत १०.२३% घट झाली. हे तुला जरी अनपेक्षित असले तरी एप्रिल महिन्यात घेतलेल्या पतधोरण आढाव्यात रिझव्‍‌र्ह बँकेने महागाई वाढण्याचा धोका स्पष्टपणे अधोरेखित केला होता. गमतीची गोष्ट अशी की डॉक्टरांची ओळख ‘इन्फ्लेशन हॉक’ अशी आहे. प्रसंगी व्याजदर वाढवून महागाईला वेसण घालणारा असा त्याचा अर्थ होतो. राजन यांनी दुसऱ्यादा रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नरपद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि इथे महागाईनेदेखील डोके वर काढले.
दुव्वुरी सुब्बाराव यांच्या काळात रिझव्‍‌र्ह बँकेने आपली धोरणे ठोक किमतीवर आधारित (डब्ल्यूपीआय) निर्देशांकावर न ठेवता किरकोळ किमतींवर आधारित निर्देशांकावर आखण्याचे निश्चित केले याचा परिणाम डब्ल्यूपीआयखाली येऊनसुद्धा व्याजदरात कपात करण्यास उशीर झाला. या वाढीचा परिणाम नजीकच्या काळात होणार आहे. रिझव्‍‌र्ह बँकेत नवीन गव्हर्नरांची नेमणूक होईल. महागाई हा अर्थव्यवस्थेला शाप असल्याने कोणाचीही नेमणूक झाली तरी नवीन गव्हर्नर व्याजदर कपात करणार नाहीत. जगभरात चलन अवमूल्यनाचे वारे घोंगावत असताना व्याजदरात कपात करणे धाडसाचे ठरेल. नवीन पीक ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये बाजारात आल्यावर वाढणारी महागाई निवळण्याची आशा असल्याने यापुढील व्याजदर कपात फेब्रुवारी २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या आढाव्याआधी शक्य नाही तेव्हा व्याजदर कपातीची फेब्रुवारीपर्यंत वाट पाहायला हवी, राजा म्हणाला.
अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.
पुंगीवाला gajrachipungi @gmail.com