मागील लेखात गुंतवणुकीविषयी आपण पाहिले. आज आपण आपल्या आयुष्याच्या दुसऱ्या डावाबद्दल – निवृत्तिपश्चात जीवनाबद्दल चर्चा करू.

निवृत्ती ही आपल्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. आजकालच्या विभक्त कुटुंबपद्धतीमध्ये वार्धक्यातील आर्थिक व सामजिक सुरक्षितता, वाढलेले वैद्यकीय खर्च या बाबींमुळे निवृत्ती व्यवस्थापनाचा (रिटायर्डमेंट प्लांनिंग) विचार करणे जरुरीचे आहे.

mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक

काही जणांना नुसत्या निवृत्तीच्या विचारानेसुद्धा अस्वस्थ आणि असुरक्षित वाटते. आर्थिक नियोजनकाराकडे सल्ला घेणारे लोक बऱ्याचदा हे माहिती करून घेण्यासाठी येतात की, ते केव्हा व कधी निवृत्ती घेऊ  शकतील. आपले निवृत्तीनंतर खर्च कसे भागणार? त्यासाठी पेन्शनसारखी एक ठरावीक रक्कम मिळेल असे नियोजन आपण कसे करावे?

यापूर्वीच्या लेखांमधून वाचकांकडून निवृत्ती नियोजनासंदर्भात बऱ्याच शंका व प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची सविस्तर उत्तरे पाहण्यासाठी निवृत्ती व्यवस्थापनाला आपण दोन प्रकारे बघू.

अ. अशा व्यक्तींसाठी जे निवृत्त झालेले आहेत (वय ५५-६० वर्षे व अधिक)

आ.  तरुण व मध्यमवयीन व्यक्ती ज्यांच्याकडे अजून निवृत्त होण्यास व त्यासाठीची जुळवाजुळव करण्यास काही कालावधी आहे.

आजच्या लेखात आपण वरील दिल्याप्रमाणे पहिल्या वर्गातील व्यक्तींसाठीचे निवृत्ती व्यवस्थापन पाहू. जे निवृत्त झालेले आहेत (वय ५५-६० व अधिक) अशा व्यक्तींच्या आर्थिक व्यवस्थापनाकडे वळताना सर्वात मोठी द्विधा ही असते की ज्या प्रकारे तुम्ही आज आपले जीवन व्यतीत करीत आहात, किमान तसे राहणीमान तुम्ही निवृत्तीनंतरही व्यतीत करू इच्छिता. परंतु, नुकत्याच निवृत्ती घेतलेल्या व्यक्ती हे त्यांना मिळालेली एक मोठी रक्कम (जसे ग्रॅच्युईटी, पीएफ इत्यादी मधून मिळालेले मोठी रक्कम) ही साधारणपणे खाली दिलेल्या प्रकारे खर्च करून मोकळे होतात.

१. बऱ्याच वर्षांपासूनच्या इच्छा-आकांक्षा जसे गावाला मोठे घर बांधणे / सोन्याच्या दागिन्यांची खरेदी / इतर किरकोळ खरेदी जी एरवी केली जात नव्हती

२. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी खर्च

३. जास्त व्याजाच्या लोभामुळे अनधिकृत गुंतवणूक योजनामध्ये मोठी रक्कम गुंतवणूक करणे

४. मुलांच्या लग्नासाठी अवास्तव खर्च इत्यादी

काही वाचकांना प्रश्न पडेल, इतके वर्ष मेहनत करून निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम आम्ही इतके वर्ष दाबून ठेवलेल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वापरली तर त्यात गैर काय? नक्कीच काही गैर नाही. परंतु आपल्याला हेही लक्षात ठेवले पाहिजे की, हीच आपली संपत्ती आपल्याला आपण हयात असेपर्यंत मिळकत देण्याचे साधन आहे. त्यामुळे भावनेच्या भरात होणारे खर्च आपण कमी करून सरत्या वयानुसार येणाऱ्या वैद्यकीय खर्चाचा विचार करायला हवा. आज जितकी मासिक घरखर्चाची रक्कम आपणास आवश्यक आहे किमान तेवढी रक्कम निवृत्तीनंतरही आपल्याला दरमहा मिळत राहावी याची तरतूद केली गेली पाहिजे. आजकालच्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे व शैक्षणिक दर्जा वाढल्यामुळे अनेक चांगल्या नोकरीच्या संधींमुळे मुलांना घरापासून लांब राहावे लागते, त्यामुळे घरातली जबाबदारी व खर्च यांचा भार आपल्यावर तसाच असतो. त्यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक व्यवस्थापन करताना आपल्या इच्छा-आकांक्षा जरूर पूर्ण कराव्यात, पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या बाबी जरूर ध्यानात घ्याव्यात. (चौकट पाहावी)

जर तुम्ही निवृत्ती नियोजन हे योग्य प्रकारे केले असेल तर, तुमच्या ३०-४० वर्षांच्या कठीण परिश्रमानंतर, या मेहनतीचे पैसे तुमच्यासाठी निवृत्तीनंतर एक सुवर्णकाळ घेऊन येऊ शकतात. त्यामुळे निवृत्ती नियोजन हे वरील नमूद केलेल्या गोष्टींचा सारासारविचार करून योग्य सल्ला देणाऱ्या अर्थनियोजकाच्या साहाय्यानेच करावे. तरुण व मध्यमवयीन व्यक्ती, ज्यांच्याकडे निवृत्त होण्यास अजून काही कालावधी आहे, अशा व्यक्तींसाठीचे निवृत्ती व्यवस्थापन आपण पुढील लेखात पाहू.

निवृत्ती नियोजनांत महत्त्वाचे काय?

१ वैद्यकीय खर्चाची जुळवणूक : आपण नोकरीत असताना काही कंपन्यांमध्ये तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचादेखील आरोग्य विमा असतो. परंतु नोकरीनंतरही अशा पॉलिसी चालू ठेवता येतीलच असे नाही. त्यामुळे काहीही आजार नसताना एक आरोग्य  विमा घेऊन ठेवणे हे केव्हाही चांगले. वैद्यकीय खर्च हा मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. योग्य आरोग्य विमा असल्यास काही वैद्यकीय खर्च उद्भवला तरीदेखील त्याची भरपाई विमा कंपनी देऊ शकते, जेणेकरून आपल्या आर्थिक नियोजनास धक्का पोहोचत नाही.

२ मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज : मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पूर्वीपासूनच तरतूद केली असल्यास चिंतेचे कारण नाही. पण तसे नसल्यास व तुमच्या सेवानिवृत्तीच्या वेळी मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मोठा खर्च येणार असेल तर शक्यतो कमीत कमी जमा पुंजी वापरून आणि शैक्षणिक कर्ज घेता येण्यासारखे असेल तर त्यामार्फत त्याची तरतूद करावी. याचे कारण असे की तुमच्या निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम ही तुम्हाला तुमच्या हयातीत स्वावलंबनाचा आधार असेल व शैक्षणिक कर्जामुळे मुलांनाही त्यांच्या आर्थिक जबाबदारीची जाणीव होईल.

३ अनावश्यक खर्च आवर्जून टाळावे : निवृत्तीनंतर अचानक मोठी रक्कम मिळाल्यानंतर अचानक खर्चही उद्भवतात व अनवधानाने काही अनावश्यक खर्चही भावनेच्या भरात आपण करून बसतो. महिलांच्या बाबतीत विशेषकरून सोने खरेदी, घरातील लग्न कार्य निघाल्यास अवास्तव खर्च. हौसेमौजेसाठी, आनंदासाठी नक्कीच खर्च करावा, परंतु अचानक मोठी रक्कम मिळाल्यामुळे असे पाहण्यात आले आहे की असे खर्च अवास्तव होतात, ते कटाक्षाने टाळावे.

४ निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्यावी, ती म्हणजे ही गुंतवणूक जास्तीत जास्त सुरक्षित ठिकाणी असेल, परतावा (रिटर्न्‍स) थोडे कमी असेल तरीही चालेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवृत्तीनंतर आपल्याला आरोग्य विम्याव्यातिरिक्त कुठल्याही विम्याची साधारणपणे गरज भासत नाही. तसेच खाजगी कंपन्यांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन (पेन्शन) नसल्यामुळे या गुंतवणुकीतून एक ठरावीक रक्कम तुम्हाला पगाराप्रमाणे दरमहा मिळावी अशा प्रकारचे गुंतवणुकीचे पर्याय अर्थ नियोजकाच्या सल्ल्याने तुम्हाला उपलब्ध होतील. अर्थ नियोजक असे गुंतवणुकीचे पर्याय सुचविताना तुमचे कर नियोजनही लक्षात घेतात.

५ योग्य व अधिकृत सल्लागार निवडणे: अचानक मोठी रक्कम सेवानिवृत्तीनंतर मिळाल्यामुळे योग्य ठिकाणी गुंतवणुकीसाठी जो अर्थ नियोजक तुमच्या भविष्यातील गरजा समजून त्याप्रमाणे योग्य तो सल्ला देईल अशाच अधिकृत सल्लागाराचाच सल्ला घेऊनच ही गुंतवणूक करावी. जास्त परतावा देणाऱ्या अनधिकृत योजनांना बळी पडू नये.

६ वारसा हक्काचे नियोजन: संपूर्ण अर्थ नियोजनात वारसा हक्क हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु फक्त निवृत्ती नियोजन जरी करायचे असेल तरी त्याबरोबरच वारसा हक्काचे नियोजन करणे क्रमपात्र आहे. कारण आपल्या पश्चात आपला वारसा हक्क ज्याला आपण देऊ  इच्छितो, त्यांनाच योग्य त्या प्रमाणातील वारसदार म्हणून आपल्या गुंतवणुकीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जसे बँकेतील खात्यात, डीमॅट खात्यामध्ये, मुदत खात्यामध्ये (एफडी), म्युच्युअल फंडामध्ये वारसदार (नॉमिनी) म्हणून नमूद केलेले असावे. हे करूनसुद्धा आपली जमा पुंजी ही आपल्या पश्चात आपल्या जिवलगांना बिनदिक्कत मिळावी यासाठी वारसापत्र (मृत्युपत्र) करणेही अतिशय गरजेचे आहे.

किरण हाके – kiranhake@fingenie.co.in

लेखक हे ‘सीएफपी’ पात्रताधारक अर्थ नियोजनकार आणि ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.