आरोग्य विमा घेताना अनेकांचा असा समज असतो की, आरोग्य विमा घेतल्याने कुठल्याही उपचारांचा सर्व खर्च विमा कंपनी देईल. परंतु आरोग्य विमा घेतल्यास २० ते २५ टक्के स्वत: खर्च करायचा असून उर्वरित खर्चाचा मोठा हिस्सा म्हणजे ७० ते ८० टक्के विमा कंपनीकडून दिला जातो. यात पॉलिसी खरेदीपूर्व आजारांचा खर्च मिळण्यास एक ते तीन वर्षांनंतर सुरुवात होते. म्हणून निरोगी असताना आरोग्य विम्याची खरेदी करणे कधीही चांगले.
मुंबईत दादरच्या शिवाजी पार्क भागात राहणारे संदीप देशमुख (४४) व त्यांची पत्नी प्राची (३९) हे दोघेही खासगी नोकरीत आहेत. मुलगा राहुल (१३) दादरमधील शाळेत शिकतो. देशमुख कुटुंबीयांच्या डोक्यावर वाहन कर्ज वगळता अन्य कुठलेही कर्ज नाही. देशमुख कुटुंबीय वित्तीय शिस्तीचे पालन करणारे असल्याने व त्यांनी आपल्या गरजा मर्यादित ठेवल्याने हे कुटुंब मोठय़ा शिलकीची बचत करू शकते. यांच्या बचतीचा मोठा हिस्सा बँकेच्या मुदत ठेवीत असून, वेळोवेळी वेगवेगळ्या म्युच्युअल फंडात गुंतवणुका केल्या आहेत. म्युच्युअल फंडातील गुंतवणुका या प्रामुख्याने एका वेळेला केलेल्या असून प्राची यांची एक एसआयपी ‘एचडीएफसी टॉप २००’ या फंडात सुरूआहे. ही एसआयपी ७२ महिन्यांसाठी त्यांनी केली असून पुढील १० महिन्यांनंतर ती बंद होईल. देशमुख कुटुंबीयांची वित्तीय ध्येये निश्चित करणे व या ध्येयांच्या उपलब्ध बचतीचे नियोजन करणे या दोन अंगाने काही गोष्टी सुचविल्या.
संदीप हे त्यांच्या कुटुंबाचा मुख्य आíथक स्रोत आहेत. घरातील कमावत्या व्यक्तीला विम्याचे पुरेसे छत्र हवेच. म्हणून त्यांना विमा घेण्यासाठी दोन पर्याय सुचविले. पहिला पर्याय ५० लाखांचा १५ वर्षे मुदतीचा एका कंपनीचा विमा घेतल्यास ७,७६८ रुपये (सेवाकर व अन्य उपकर सोडून) वार्षकि हप्ता भरावा लागेल. याच कंपनीचा विमाछत्रात दर वर्षी पाच टक्के वाढ होणारा विमा खरेदी केल्यास ११,२३४ रु. (कर सोडून) वार्षकि हप्ता भरावा लागेल. या प्रकारच्या विम्यात सुरुवातीचे विमाछत्र ५० लाख असेल तर मुदतपूर्तीच्या वेळी विमाछत्र ८२ लाख ५० हजार असेल. अन्य विमा कंपन्यांच्या ५० लाख विमाछत्र असलेल्या व १५ वष्रे मुदतीच्या विम्यासाठी ६,५०० रु. ते ९,२०० रु. दरम्यान वार्षकि हप्ता द्यावा लागेल. संदीप यांनी यापैकी स्थिर विमाछत्र देणाऱ्या योजनेची निवड केली आहे. प्राची यांच्याकडे वेगवेगळ्या पारंपरिक विमा पॉलिसी मिळून २५ लाखांचे विमाछत्र असल्याने त्यांना नवीन विमा खरेदी करण्याचा सल्ला दिलेला नाही.
जीवन विम्यानंतर आरोग्य विम्याचा विचार करताना देशमुख कुटुंबीयांना न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सची मेडिक्लेम २०१२ ही पॉलिसी घेण्यास सुचविले. पाच लाखांचा फॅमिली फ्लोटर प्लॅन सुचविण्यात आला. हे पाच लाख या तिघांनी कुटुंबाअंतर्गत कसे वापरावे यावर बंधन नसलेल्या या पॉलिसीसाठी १७,७०० रु. (सेवाकर व अन्य उपकर सोडून) हप्ता भरावा लागेल.
आरोग्य विमा घेताना अनेकांचा असा समज असतो की, आरोग्य विमा घेतल्याने कुठल्याही उपचारांचा सर्व खर्च विमा कंपनी देईल. परंतु आरोग्य विमा घेतल्यास २० ते २५ टक्के स्वत: खर्च करायचा असून उर्वरित खर्चाचा मोठा हिस्सा म्हणजे ७० ते ८० टक्के विमा कंपनीकडून दिला जातो. यात पॉलिसी खरेदीपूर्व आजारांचा खर्च मिळण्यास एक ते तीन वर्षांनंतर सुरुवात होते. म्हणून निरोगी असताना आरोग्य विम्याची खरेदी करणे कधीही चांगले.
प्राची यांच्या एका मुदत ठेवीची पूर्ती झालेल्या पशाची त्यांना तीन-चार वष्रे गरज नसल्याने या मुदत ठेवीचे तीन हिस्से करून एक हिस्सा एलआयसी नोमुराच्या डय़ुएल अ‍ॅडव्हान्टेज फंड या रोखेकेंद्रित ४२ महिन्यांच्या मुदत बंद योजनेत व उर्वरित दोन हिस्से अनुक्रमे यूटीआय मिडकॅप व एचडीएफसी इक्विटी या दोन गुंतवणुकीस कायम खुल्या असलेल्या योजनांत गुंतविण्याचा सल्ला दिला. या नियोजनास मूर्तरूप येण्यादरम्यानच्या काळात या तीन गुंतवणुका सुचविल्यानुसार झाल्या आहेत.
संदीप व प्राची यांची पीपीएफ खाती असून त्यात दर वर्षी संदीप व प्राची दीड लाख रुपये जमा करीत आहेत. संदीप हे आयकराच्या ३० टक्के करकक्षेत येत आहेत. आयकराच्या कलम ८०सी खाली मिळणाऱ्या दीड लाखांच्या वजावटीसाठी संदीप हे कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (ईपीएफ), जीवन विम्याचा हप्ता व पीपीएफ या साधनांचा वापर करीत आहेत.
या उपर त्यांनी ५० टक्के समभाग विकल्प निवडून ‘एनपीएस’ खाते उघडावे. संदीप यांनी एनपीएसच्या ‘टीयर वन’ खात्यात केलेली तरतूद त्यांना या वर्षी आयकरात आणखी १५ हजारांची सूट मिळवून देईल. ही पुढेही मिळत राहील का, असा प्रश्न प्राची यांनी विचारला. सरकार आयकरदात्याला दिलेली सवलत लगेचच काढून घेत नसल्याने ही सवलत यापुढेही चालू राहील, असे मानावयास हरकत नाही. संदीप यांनी पुढील १४ वर्षांत या खात्यात २० लाख रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट  ठेवल्यास त्यांच्या वयाच्या ६०व्या वर्षांपासून मासिक १८ ते २० हजारांची पेन्शन मिळू शकेल. हे वित्तीय ध्येय साध्य होण्यास संदीप यांना दरवर्षी अंदाजे एक लाख ७५ हजाराची रक्कम या खात्यात जमा करावी लागेल. संदीप यांची रोकडसुलभता पाहता ही रक्कम जमा करणे कठीण नाही. संदीप यांना मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम ही संदीप यांची एनपीएसमध्ये जमा केलेल्या रक्कमेवर मिळणाऱ्या परताव्याचा दर व मुदतपूर्ती वेळी असणाऱ्या वर्षांसन दरावर (Annuity Rate) ठरेल.
संदीप व प्राची यांनी आपली काही बचत म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतविली आहे. गुंतवणूक कुठलीही असली तरी त्या गुंतवणुकीचा सहामाही आढावा घेणे गरजेचे असते. अनेक गुंतवणूकदार एकदा गुंतवणूक केली की त्याचा मागोवा घेत नाहीत. संदीप व प्राची यांच्याकडून असाच प्रमाद घडला. त्यांनी आपल्या गुंतवणुकीचा मागोवा घेतलेला नाही. परिणामी सहा-सात वर्षांनंतरही काही फंडांतील गुंतवणुकीतून फायदा झालेला नाही. त्यांच्या गुंतवणुकीत असलेल्या फंडांपकी रिलायन्स नॅचरल रिसोर्स फंड, ज्या फंडाची एनएव्ही दहा रुपयांहून कमी झाली आहे. या व एचएसबीसी टॅक्स सेव्हर या दोन फंडांतून त्यांनी आपली गुंतवणूक काढून घेणे हिताचे ठरेल.
देशमुख कुटुंबीयांच्या नियोजनासंदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तो असा की, शेअर बाजारात थेट गुंतवणूक करावी किंवा कसे? दादर हे मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असल्याने या भागात नेहमीच कुठले ना कुठले कार्यक्रम होत असतात. संदीप यांचे वास्तव्य या भागात असल्याने अशाच एका शेअर बाजारावरच्या कार्यशाळेला संदीप उपस्थित होते. ही कार्यशाळा घेणारा शेअरगुरू काही वर्षांत काही हजारांचे काही कोटी केल्याचे सांगत असतो. या कार्यशाळेने प्रभावित झालेले संदीप यांना शेअर बाजारात थेट गुंतवणूक करावीशी वाटत आहे. संदीप यांनी हे लक्षात घेणे जरुरीचे आहे की, खरोखर हे गुरुजी सांगत आहेत त्या तंत्राने नफा झाला असता तर या गुरुजींनी शेअर अभ्यासवर्ग घेत बसण्यापेक्षा शेअरच्या व्यवहारातून नफा कमावणे पसंत केले नसते काय? असेच बाजाराशी दीर्घकाळ संबंधित असलेले एक गुरुजी आपल्या कार्यशाळेतील उपस्थितांना स्टेट बँकेचे समभाग विकत घेण्याचा सल्ला देतात. परंतु ते स्वत: मात्र स्टेट बँकेच्या मुदत ठेवींत आपली बचत गुंतवितात. भारतात १९९६ साली ‘डीमॅट’ स्वरूपातील व्यवहारास प्रारंभ झाला. या गुरुजींचे अद्याप डीमॅट खाते नाही, तरीही हे गुरुजी दादर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात शेअर बाजारावर नियमित अभ्यासवर्ग घेत असतात. दुर्दैव हे की, ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ या थाटाच्या शिकवणुकीवर संदीप यांच्यासारखे अर्थनिरक्षर गुंतवणूकदार विश्वास ठेवतात. अशा पोटार्थी शेअर गुरूंपासून सावध राहून आपली बचत बाजारात थेट पद्धतीने न गुंतविता म्युच्युअल फंडांचा धोपट मार्ग अवलंबणे संदीप यांच्या हिताचे असणार आहे. ‘कथनी और करनी में बडम अन्तर होता है’ हाच आजचा अर्थबोध.
shreeyachebaba@gmail.com