भारतीय अर्थव्यवस्थेलाही हादरे बसतील. रुळावर येत असलेली अर्थव्यवस्था पुन्हा नाजूक अवस्थेत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चलन अवमूल्यनामुळे परकीय अर्थसंस्था भारतातून काही काळापुरत्या भांडवल काढून घेतील. रिझव्‍‌र्ह बँक चलन वावटळीला व विदेशी अर्थसंस्था भारतातून चलन काढून घेत असल्याच्या संकटाला समर्थपणे तोंड देईल. पण ज्या कारणासाठी सरकारचे व डॉक्टरांचे मतभेद होते ते कारण म्हणजे व्याजदर कपात. नवीन गव्हर्नर आले तरी आणखी एक-दीड वर्ष तरी व्याजदर कपातीचा ते विचार करू शकणार नाहीत..
राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ पुन्हा एकदा जागा होऊन विक्रमादित्यास प्रश्न विचारू लागला. ‘‘राजा, ब्रिटनच्या नागरिकांनी युरोपीय समुदायातून वेगळे होण्याच्या दृष्टीने कौल दिला. यातून भारताला कोणत्या संधी उपलब्ध झाल्या आहेत व कोणते धोके संभवतात याबाबत तू तुझे मत सांगावेस. ते तू सांगितले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’’ वेताळ म्हणाला.
‘‘होणार होणार असे गाजत असलेली ब्रिटनमधील सार्वमत चाचणी २३ जून रोजी अखेर झाली. डेव्हिड कॅमेरून यांनी २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडून आल्यास ब्रिटनने युरो समुदायात राहावे किंवा कसे या विषयावर सार्वमत घेण्याचे वचन आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. त्यानुसार हे सार्वमत घेण्यात येऊन ५२ टक्के मतदारांनी वेगळे होण्याच्या बाजूने, तर ४८ टक्के मतदारांनी युरोपीय समुदायात राहण्याच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे ब्रिटन आता युरो समुदायातून बाहेर पडणार हे निश्चित झाले. परंतु स्कॉटलंडने युरो समुदायात राहण्याचा कौल दिल्याने ‘ग्रेट ब्रिटन’ची शकले उडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य मावळत नव्हता त्या ब्रिटनपुढे राजकीयदृष्टय़ा अशी गंभीर पेचाची परिस्थिती झाली आहे,’’ राजा म्हणाला.
‘‘गमतीची गोष्ट अशी की ब्रिटन हा युरो संसदेचा सदस्य देश होता. परंतु युरोपियन आर्थिक समुदायाचा सदस्य नव्हता. त्यामुळे राजकीयदृष्टय़ा ब्रिटन युरो समुदायात जरी असला तरी आपली आर्थिक धोरणे युरो समुदायापेक्षा वेगळी आखण्याचा अधिकार त्याने अबाधित राखला होता.’’
‘‘नजीकच्या काळाचा विचार केल्यास ब्रिटनचे चलन पौंड हे मागील २० वर्षांच्या तळाला गेले असल्याने आपली ब्रिटनला असलेली निर्यात महाग झाली आहे. इथून पुढे पौंडची घसरण दोन ते तीन वर्षे सुरूराहणार असून ब्रिटनची पत ‘एएए’वरून कमी करण्याचा इशारा ‘एस अ‍ॅण्ड पी’ने दिला आहे. आपली निर्यात वाढविण्यासाठी ब्रिटन आपल्या चलनाचे कृत्रिम अवमूल्यन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे घडले तर जगभरात चलन अवमूल्यनाचे पेव फुटेल. प्रत्येक देश मग जगाच्या व्यापारातील आपला वाटा वाढविण्यासाठी आपल्या चलनाचे कृत्रिम अवमूल्यन करेल. सर्वात धोका संभवतो तो म्हणजे चीन वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी त्याचे चलन – युआनचे अवमूल्यन मोठय़ा प्रमाणावर करेल. माझ्या मते जगाला चलन वावटळीचा सर्वाधिक धोका संभवतो. अमेरिकेला व्याजदर वाढ विसरून ‘क्यूई ४’चा विचार करावा लागेल. जगभरात ‘हेलिकॉप्टर मनी’चा पाऊस पडेल..’’
‘‘भारतीय अर्थव्यवस्थेलासुद्धा यामुळे हादरे बसतील. रुळावर येत असलेली अर्थव्यवस्था पुन्हा नाजूक अवस्थेत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चलन अवमूल्यनामुळे परकीय अर्थसंस्था भारतातून काही काळापुरत्या भांडवल काढून घेतील. परंतु डॉक्टर अजून अडीच महिने गव्हर्नरपदी असल्याने रिझव्‍‌र्ह बँक चलन वावटळीला व विदेशी अर्थसंस्था भारतातून चलन काढून घेत असल्याच्या संकटाला समर्थपणे तोंड देईल. ज्या कारणासाठी सरकारचे व डॉक्टरांचे मतभेद होते ते कारण म्हणजे व्याजदर कपात. पण आणखी एक-दीड वर्ष तरी नवीन गव्हर्नर व्याजदर कपातीचा विचार करू शकणार नाहीत. रुपयाचे किती प्रमाणात अवमूल्यन होते ते पाहावे लागेल. पुढील एका वर्षांत ३.५-४.५ टक्के अवमूल्यन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.’’
‘‘ब्रिटन युरो समुदायातून प्रत्यक्ष बाहेर पडण्यास अजून दोन वर्षांचा कालावधी लागेल. सध्या प्रचलित असलेले अनेक कायदे बदलावे लागतील. भारतात ‘फॉरीन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट’च्या माध्यमातून येणारे सर्वाधिक भांडवल ब्रिटनमधून आपल्या देशात येते. जोपर्यंत या कायद्यात सुस्पष्टता येत नाही तोपर्यंत आपल्या देशात नवीन भांडवल येण्यात समस्या निर्माण झाल्या आहेत. आता अन्य सदस्य राष्ट्रे युरोपिय महासंघामधून बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘ब्रेग्झिट’नंतर ‘नेक्झिट’ची चर्चा रंगू लागली आहे,’’ राजाने सविस्तरपणे सांगितले.
‘‘परंतु या गोष्टीच्या मुळाशी आहे ते डेव्हिड कॅमेरून यांनी सत्ता टिकविण्यासाठी सार्वमत घेण्याचे आश्वासन आपल्या वचननाम्यात दिले. हेच टाळले असते तर आज दुसऱ्या महायुद्धानंतर आलेले त्या साम्राज्यावरील सर्वात मोठे संकट टाळता आले असते. परंतु राजकारणी मग भारतातील असो, अमेरिकेतील असो किंवा ब्रिटनमधील. लोककल्याणाच्या नावाखाली त्यांना राजकारणच प्रिय असते ते असे,’’ राजा कारणमीमांसा करताना म्हणाला.
अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

भारतात ‘प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकी’च्या माध्यमातून येणारे सर्वाधिक भांडवल ब्रिटनमधून आपल्या देशात येते. जोपर्यंत विलग झालेल्या ब्रिटनच्या कायद्यात सुस्पष्टता येत नाही तोपर्यंत आपल्या देशात नवीन भांडवल येण्यात समस्या निर्माण झाल्या आहेत.

पुंगीवाला – gajrachipungi @gmail.com