एक गुंतवणूक सल्लागार या नात्याने कित्येक वेळा गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीच्या संदर्भात माझ्याकडे सल्ला मागायला येतात, त्यांची गुंतवणूक पडताळून पहिली असता माझ्या लक्षात येते की ही गुंतवणूक नसून बचत आहे.

मला अनेकदा माझ्या अशिलांकडून एक शंका नेहमीच विचारली जाते. ‘‘सध्या बाजाराचे निर्देशांक वरच्या पातळीवर असताना आम्ही गुंतविलेल्या म्युच्युअल फंडाची किंमत म्हणजेच मूल्यांकन वाढलेले आहे. अशा परिस्थितीत आम्ही बाहेर पडून बाजार निर्देशांक पुन्हा खाली जाईपर्यंत आम्ही काही काळ गुंतवणूक करणे थांबवावे किंवा कसे?’’

अशा सर्व लोकांना मी असा सल्ला देऊ इच्छितो की, बाजार खाली जाईल या भीतीपोटी गुंतवणूक करणे थांबवू नका, किंबहुना तुमच्याकडे अतिरिक्त पैसे असल्यास अधिक गुंतवणूक करण्यास ही अतिशय योग्य वेळ आहे. जर तुम्ही १०-१५ वर्षांंच्या कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचे निश्चित केलेलेच आहे. तसे असल्यास अल्प कालावधीसाठी बाजारपेठेत येणाऱ्या  तेजी-मंदीवर विसंबून आपल्या वित्तीय ध्येयांपासून विचलित होण्याचे कारणच काय? अशा प्रकारे अकस्मात आलेल्या तेजी-मंदीमुळे तुम्हाला गुंतवणुकीवर दीर्घ काळ अधिक लाभ मिळण्याची निश्चित शक्यता असते.

कित्येक जण हे गुंतवणूक करीत नसून बचत करतात असे वर म्हटले आहे. तुमच्या मनात असा प्रश्न निर्माण होणे अत्यंत स्वाभाविक आहे की, गुंतवणूक आणि बचत यामध्ये फरक काय आहे.  गुंतवणूक आणि बचत यात लोक नेहमीच गल्लत करतात. कित्येक लोक या दोन्ही शब्दांचा समानार्थी शब्द म्हणून वापर करतात. परंतु हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे की ‘गुंतवणूक’ आणि ‘बचत’ हे शब्द परस्पर संलग्न असले तरीही पूर्णपणे वेगळे आहेत.

बचत म्हणजे खर्च होणाऱ्या उत्पन्नाचा असा एक भाग जो ग्राहक आपल्या आवश्यकतांवर खर्च न करता साठवून ठेवतात. सर्वसामान्य माणसाच्या भाषेत सांगायचे झाल्यास वेगवेगळे खर्च केल्यानंतर जे अतिरिक्त धन आपल्याकडे राहते त्याला बचत म्हणतात. याचे समीकरण मांडायचे झाल्यास ; उत्पन्न वजा खर्च म्हणजे बचत . गुंतवणूक एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपण फायदा मिळविण्यासाठी पैसे गुंतवतो. बचत आणि गुंतवणूक या शब्दांच्या उपरोक्त व्याख्यांचा परामर्श घेता आपण असे म्हणू शकतो की, बचत हा परिणाम असून गुंतवणूक ही एक क्रिया/कृती आहे. बचत आणि गुंतवणूक हे प्रकार अधिक स्पष्टपणे समजावून घेण्यासाठी आपण त्यांच्या वैशिष्टय़ांचा आता सखोल अभ्यास करूया;

* बचत ही अशी एक कृती आहे ज्यामध्ये आपण पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवतो ज्यामुळे नजीकच्या काळात ते पैसे आपण वापरू शकतो. गुंतवणुकीमध्ये आपण अशा आशेने पैसे गुंतवणुकीच्या साधनात ठेवतो की ज्यामुळे भविष्यात त्यापासून आपल्याला आर्थिक लाभ होऊ  शकेल.

* बचत ही सर्वसामान्यपणे अल्पकालीन प्रक्रिया असून गुंतवणूक ही नेहमीच दीर्घकालीन कृती असते.

* बचतीमध्ये जोखीम साधारणत: नसतेच पण त्यापासून मिळणारा मोबदला अतिशय अल्प असतो, परंतु गुंतवणुकीमध्ये जोखीम असते आणि मिळणारा मोबदलाही अधिक असतो.

* बचत ही सवय असून गुंतवणूक ही नियमित प्रक्रिया आहे.

* बचतीचा परमर्श घ्यावा लागत नाही परंतु गुंतवणुकीमध्ये जोखीम असल्यामुळे ठरावीक कालावधीनंतर गुंतवणुकीचा परामर्श घ्यावा लागतो.

* बचत करताना आपण पैसे सुरक्षित ठेवतो ज्याचा आपल्याला अडचणीच्या काळात उपयोग करता येतो परंतु गुंतवणुकीमध्ये दीर्घ काळासाठी संपत्ती निर्माण करता यावी म्हणून आपण नियमित पैसे वाढविण्याचा प्रयत्न करतो.

* बचतीचे पैसे पैसे कधीही परत मिळत असल्यामुळे त्वरित उपलब्ध होतात आणि ते लागेल तेव्हा खर्च करता येतात. परंतु गुंतवणूक विकायचे ठरवल्यास ती विकून तिची किंमत तुमच्या बचत खात्यात जमा होण्यासाठी काही अवधी जावा लागतो.

* बचत आयुष्यात कधीही करता येते किंबहुना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात बचत करणे आवश्यक आहे. गुंतवणुकीचा प्रारंभ सर्वसामान्यपणे तरुण वयात केला जातो.

* बचत नेहमी बचत खाते,परावर्तीत ठेव,बँकेतील मुदत ठेव अशा प्रकारच्या साधनांत केली जाते परंतु गुंतवणूक ही मालमत्ता,समभाग,मुच्युअल फंड,वस्तू बाजारपेठ इत्यादी साधनांमध्ये करण्यात येते.

गुंतवणुकीच्या माध्यमातून आपल्याला मोठा फायदा मिळत असला तरीही आपली अल्प,मध्यम आणि दीर्घ मुदतीची ध्येय प्राप्त करण्यासाठी ‘बचत’ आणि ‘गुंतवणूक’ दोघांचीही आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका आहे याचा विसर पडता कामा नये. थोडक्यात, आपल्या वित्तीय ध्येयानुसार प्रत्येकाने बचत आणि गुंतवणुकीचे महत्त्व जाणून घेऊन त्यानुसार कृती करायला हवी. आपल्या उत्पन्नाच्या किती प्रमाणात बचत किंवा गुंतवणूक करावी हे जाणून घेऊन त्यानंतर कृती करावी. बचतीसाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता नसते. गुंतवणुकीसाठी तज्ज्ञ गुंतवणूक सल्लागाराचीही मदत घेणे आवश्यक आहे.

लेखक गुंतवणूक सल्लागार असून त्यांच्याशी contactsuyogk@gmail.com या मेल वर संपर्क साधता येईल.