आपण पैशासाठी काम करतो तेव्हा नव्हे तर जेव्हा पैसा आपल्यासाठी काम करतो तेव्हा आपण आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र होतो. आणि हे गुंतवणुकीतून शक्य होते. आर्थिक वृद्धीसाठी गुंतवणूक ही कुणाही व्यक्तीसाठी सर्वात महत्त्वाची सवय असते..

डिसेंबर महिना संपेल. पुढे नवीन वर्ष सुरू होईल आणि प्रथेप्रमाणे अनेकजण काही ना काही नववर्षांचे संकल्प करतील. आर्थिक बाबतीतही अशा प्रकारचे नवीन संकल्प केले जातील. आर्थिक बाबतीत केला जाणारा सर्वात महत्वाचा संकल्प असतो तो म्हणजे गुंतवणुकीचा. आर्थिक बाबतीतील वृद्धीसाठी गुंतवणूक ही सर्वात महत्त्वाची सवय असते. गुंतवणूक ही येणाऱ्या दिवसांसाठी, महिन्यांसाठी, वर्षांसाठी, निवृत्तीसाठी, स्वत:साठी कुटुंबासाठी नाही तर पुढच्या पिढय़ांसाठी व समाजासाठीही एक सर्वात महत्वाची गोष्ट असते. या पाश्र्वभूमीवर आपण आज गुंतवणुकीचे व्यक्तिमत्व या विषयी पाहू. या वर्गात मोडणाऱ्या आर्थिक व्यक्तिमत्वाच्या बाबतीत बचत व गुंतवणूक या गोष्टी त्यांच्या प्राथमिकता असतात. यांचे आर्थिक समीकरण =

कमाई – (बचत + गुंतवणूक ) = खर्च

असे  असते. खर्च करताना हे लोक गरज (need)आणि मागणी (demand) याबद्दल  खूप जागरूक असतात. आपण पैशासाठी काम करतो तेव्हा नव्हे तर जेव्हा पैसा आपल्यासाठी काम करतो तेव्हा आपण आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र होतो. आणि हे गुंतवणुकीतून शक्य होते हे यांना पक्के समजलेले असते.

या प्रकारच्या आर्थिक व्यक्तिमत्त्वात मोडणाऱ्यांची स्वभाववैशिष्टय़े पुढीलप्रमाणे:

* बचत तर हे करतातच पण त्या बचतीतील मोठा भाग गुंतवणुकीसाठी वापरतात.

*  खूप पैसे साठल्यावर एकदम  गुंतवणूक करू असा विचार ना करता काटेकोर व शिस्तबद्ध पद्धतीने सतत गुंतवणूक करत असतात.

*  बचत व गुंतवणूक ही त्यांची सतत चाललेली क्रिया असते.

* उत्पन्न, खर्च, बचत व गुंतवणूक या प्रत्येक गोष्टींच्या नोंदी व त्यासंबंधी पावत्या व्यवस्थित ठेवतात.

*  कर्जाचे हप्ते बिलाच्या तारखा याबाबत खूप काटेकोर असतात.

* वर्तमानात बचत करून भविष्यसाठी गुंतवणूक करतात

* यांना वैयक्तिक व कौटुंबिक आर्थिक जबाबदारीची जाणीव असते

* अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक ध्येय ठरवून नियोजन करतात.

* आणीबाणीच्या काळासाठी नियोजन करतात

* मौजमजेपासून निवृत्तीपर्यंतचे ते नियोजन करतात

* आर्थिक बाबतीत जागरूक लोक यांचा मित्र परिवार असतो

* नवनवीन आर्थिक गुंतवणूक पर्यायांच्या ते शोधात असतात

*  गरजेनुसार स्वत:चे व घरच्यांचे विमे काढलेले असतात

*  सतत स्वत:चे आर्थिक ज्ञान वाढवत असतात

* आर्थिक दृष्टीने स्वतंत्र होण्यसाठी प्रयत्नशील असतात

* खर्चाच्या बाबतीत अतिशय चौकस व चिकित्सक असतात

* भूतकाळातला अनुभव वर्तमानातील संधी आणि भविष्यकाळातील फायदे यामध्ये ते नेहेमी सांगड घालत असतात व आर्थिक निर्णय घेत असतात

* यांचा दृष्टीकोनच बचतीचा बनलेला असतो

* मोठा फायदा मिळावा म्हणून गुंतवणूक करताना नुकसान होऊ  शकण्याचा हे धोका पत्करतात

*  हे लोक आपल्या पैशांचा जीवनात आनंदही घेत असतात.

 

या आर्थिक व्यक्तिमत्त्वाच्या लोकांना येणाऱ्या अडचणी आणि घ्यावयाची काळजी:

* कधी कधी जास्त हव्यासापोटी हे लोक जोखमीची गुंतवणूक करू शकतात

* एकाच प्रकारच्या गुंतवणुकीच्या पद्धतीत अडकलेले असू शकतात

* अर्धवट माहितीवर घाईघाईत निर्णय घेऊ  शकतात

* अति उत्साहात चुकीचे गुंतवणूक निर्णय घेऊ  शकतात

* एखाद्याच्या गुंतवणुकीचे निर्णयाचे अंधानुकरण करू शकतात

* कधी कधी आपण बरोबर निर्णय घेतो या गर्विष्टपणामुळे चुकीचे निर्णय घेऊ  शकतात

* कधी कधी निर्णायक वेळी भीती आणि रागातून चुकीचे निर्णय घेऊ शकतात

* चुकीच्या मोठय़ा निर्णयामुळे निष्क्रियता येऊ  शकते

* भावनेच्या भरात गुंतवणुकीचे निर्णय घेऊ शकतात जे माहितीच्या आधारावर नसतात.

कोणती काळजी घ्याल?

* जग आणि तंत्रज्ञान झपाटय़ाने बदलत असते त्यामुळे नवीन गोष्टी आत्मसात करत राहिले पाहिजे

*नवीन गुंतवणुकीचे पर्याय त्याचे फायदे तोटे याबद्दल विश्वसनीय माध्यमांतून सखोल अभ्यास, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे

* बरोबर किंवा चुकीच्या निर्णयांचे विश्लेषण करता आले पाहिजे व या अनुभवाचा भविष्यातील निर्णयासाठी उपयोग करता आला पाहिजे.

या मागील मनोवैज्ञानिक कारणे :

* यांना पैशासाठी काम करताना पैसा पण आपल्यासाठी काम करत असतो हे कळलेले असते

* स्वत:च्या जबाबदाऱ्यांची खूप चांगली जाणीव झालेली असते

* आर्थिक बाबींबरोबर येणारी सुरक्षितता व संपन्नता याची चांगली जाण असते

* पैशाबद्दलचा आत्मविश्वास आलेला असतो

* आर्थिक संपन्नता व त्याचे फायदे याविषयी यांना आकर्षण असते व आनंद ही भावना त्याच्याशी जोडली गेलेली असते

* आर्थिक दूरदृष्टी असते.