जाणकार सल्लागारमार्फत दिला जाणारा व्यक्तिगत गुंतवणूकविषयक सल्ला ते आता आलेल्या तंत्रज्ञानाधारित स्वयंचलित उपाययोजना हे संक्रमण ग्राहकांसाठी खूपच सोयीचे व सुलभ झाले आहे. नवनावीन्यता हा सद्य युगाचा मंत्र असून, आगामी काही वर्षे हे असेच नवनवीन काही तरी येत राहिल्याचे पाहणे मोठे रंजक असेल. आजवर बसलेली घडी विस्कटून टाकणाऱ्या या तंत्रज्ञानात्मक फेरबदलांमध्ये गुंतवणूकदारांसाठी असलेल्या पारंपरिक सल्लागार व दलाली पेढय़ा यांचे काय होणार, याचा हा वेध..
वित्तीय सेवा क्षेत्राची घडी पार विस्कटून टाकणारे तंत्रज्ञानात्मक अतिक्रमण सध्या सुरू आहे. होय, काहींसाठी अतिक्रमणच आहे. वस्तुत: सर्व प्रकारच्या वित्तीय सेवा बोटाने एक कळ दाबल्यासरशी उपलब्ध होणे हे अनेकांना त्यांचे काम सोपे व सुलभ करणारे ठरले असल्याने, ग्राहकांच्या दृष्टीने हा स्वागतार्ह बदल आहेच. तर वित्तीय सेवा कंपन्यांना पूर्वीच्या तुलनेत नगण्य खर्च करून, नवनव्या ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल आशा भौगोलिक व संख्यात्मक विस्तार झटपट साधता येणे शक्य बनले आहे. वित्तीय सेवा बाजारपेठेची झपाटय़ाने होत असलेली वाढ याचे द्योतक आहे. शिवाय ही वाढ सर्वव्यापी व सर्वसमावेशक आहे, हे विशेष. एकंदर सेवांवर आणि त्या सर्वदूर पोहोचविण्यावर होणारा खर्च बराच वाचत असल्याने, त्यासाठी आकारला जाणारे शुल्क व खर्चही उत्तरोत्तर कमी होत आहे. साहजिकच अधिकाधिक तळच्या आर्थिक स्तरातील ग्राहकांना तो परवडणारा आणि त्यांच्या सहभागास चालना देणारा ठरत आहे. तंत्रज्ञानाची अशी ग्राहक व सेवा प्रदाते या दोन्ही अंगांसाठी हितकारक भूमिका दिसून येत आहे.
ग्राहक अर्थात गुंतवणूकदारांच्या दृष्टीने परिणामांची अधिक विस्ताराने चर्चा करू या.
सध्या, ग्राहकांचा प्रवेश ते त्यांना निरंतर आवश्यक त्या सेवा वेळच्या वेळी तत्परतेने पुरविण्याचे माध्यम हे तंत्रज्ञानच आहे. सेवा प्रदात्या संस्था (बँक, म्युच्युअल फंड, दलाली पेढी, विमा कंपनी वगैरे) यांच्याशी भौतिक स्वरूपात कसलाही संपर्क न साधता अनेक ग्राहक इच्छित लाभ विनासायास उपभोगत हे त्यामुळेच. म्हणूनच ग्राहकांच्या गरजा खऱ्या अर्थाने जाणून घेऊन, जी वित्तीय सेवा प्रदाता कंपनी तशी सेवा जितक्या सोप्या व सोयीस्कर रूपात पोहोचती करेल, ती आजच्या युगात यश संपादन करेल, असा हा साधा सरळ नियम बनून गेला आहे. हे अगदी नव्या युगाच्या ई-कॉमर्स संकेतस्थळाप्रमाणे आहे. संकेतस्थळावर अनेकविध पर्यायांची सरळमिसळ असलेल्या गुंतवणूक योजना ‘उत्पादन’रूपात ग्राहकांसमोर मांडायच्या आणि ग्राहकांनी घरबसल्या त्यातून एकाची निवड करून खरेदी व्यवहार पूर्ण करावयाचा असा हा मामला आहे. दहा काय अगदी दोन-अडीच वर्षांपूर्वीपर्यंत यापैकी काही एक शक्य नव्हते. घराबाहेरही पडावे न लागता, बँकिंग, गुंतवणूक, विम्याचे संरक्षण सारे काही फोन, लॅपटॉप, टॅबच्या साहाय्याने शक्य होते.
अगदी आवश्यक तो सल्ला अन् मार्गदर्शनही सध्या मोबाइल फोनवरूनच घेतले जाते. वित्तीय सेवा क्षेत्रातील हा एक क्रांतिकारी बदलच सध्या आपण अनुभवत आहोत. गंमत म्हणजे हा बदल अथांग आणि सारखा नवनव्या अंगाने सुरूच असून, याहून पुढे आणखी काय काय घडेल याची आज कल्पनाही करवत नाही.
गुंतवणूक सल्लादेखील दूरस्थ रूपात व संगणकीय ठोकताळ्यांसह (रोबो अ‍ॅडव्हायजरी) दिला जाणे हे धोक्याचे मानायचे काय, असा अनेकांचा असा शंका वजा प्रश्नार्थक सूर आहे. पारंपरिक गुंतवणूक सल्लागार कंपन्या, दलाली पेढय़ांकडे मग काय भूमिका राहणार, अशी यामागे शंका आहे. तंत्रज्ञान ही कोणा विशिष्ट लोकांची मक्तेदारी नाही, हे त्याला उत्तर आहे. सल्लागाराच्या व्यवसायाची अद्ययावत माहिती, तिची निरंतरता आणि ती मिळविण्याचा वेग आणि माहितीच्या अचूकता यावर इतका निर्भर आहे की त्याला त्यासाठी तंत्रज्ञानाचे साहाय्य घेण्याशिवाय गत्यंतर नाही. आपल्या ग्राहकांना त्या आधारे सर्वोत्तम सेवा देऊन, त्यांच्या बांधिलकीला मजबूत करणारा धागा नवतंत्रज्ञानच असेल. शिवाय नव्या पिढीच्या गुंतवणूकदारांची डिजिटल साधनांशी वाढती सलगी पाहता, संलग्न वित्तीय सेवांनी त्यांच्या ग्राहकांमधील वर्तणूक बदल आत्मसात करणे मग क्रमप्राप्तच ठरते. जसे आज शाखानिहाय बँकिंग विस्तार मागे पडत चालला असून, त्याची जागा नेट बँकिंगने सहजी मिळविली आहे. त्याचप्रमाणे समभागाचे भाव व शिफारशी जाणून घेऊन फोनवरून खरेदी वा विक्री उलाढालीची सूचना देण्याचे दिवस कालबाह्य़ झाले असून, मोबाइल ट्रेडिंग अ‍ॅपने ती जागा भरून काढली आहे. बदला नाही तर लुप्त व्हाल, असाच हा निरंतर उत्क्रांत होत जाण्याचा काळ आहे.
हे उत्क्रांत होत जाणे आपल्या विद्यमान व संभाव्य ग्राहकांना भावणारे, पेलवणारे ठरावे, हा पैलू या बदलाच्या प्रक्रियेत कायम केंद्रस्थानी असायला हवा. जसे कोणी पहिल्यांदा संपर्कात आला, तर त्याला खाते उघडून व्यवहार सुरू करायला १५ मिनिटांचा अवधी पुरेसा ठरेल, अशी ‘डू इट युवरसेल्फ (डीआयवाय)’ प्रक्रिया सध्या अनेक वित्तीय सेवा संस्थांनी कार्यान्वित केली आहे. संपूर्ण कागदरहित आणि अल्पतम (मार्गदर्शनाची गरज भासल्यास हेल्पडेस्कशी बोलावे लागणे सोडल्यास) मानवी संपर्काची ही पद्धत नव्या पिढीच्या ग्राहकांसाठी निश्चितच आकर्षणाची बाब ठरते.
वित्तीय सेवा क्षेत्रातील तंत्रज्ञानात्मक फेरबदलांना व आनुषंगिक उत्पादनांना ग्राहकांकडून स्वीकारार्हता हा लाखमोलाचा प्रश्न आहे. अर्थात नव्या पिढीच्या गुंतवणूकदारांना, सोयीस्करता, सोपे रूप आणि केव्हाही, कुठूनही व्यवहार करण्याची मुभा या भावणाऱ्या गोष्टी ठरल्या आहेत. म्युच्युअल फंडाची खरेदी ही एजंटामार्फत आजवर व्हायची, आता या मध्यस्थाला टाळून ती ऑनलाइन होते आणि नेटबँकिंगवर एनईएफटीमार्फत पैसे हस्तांतरित केले जातात. हे दोन वर्षांपूर्वीपर्यंत शक्य होते आणि या नव्या बदलांना सरावलेल्या ग्राहकांच्या दोन वर्षांनंतर यापेक्षा आणखी चांगल्या सेवाबदलाच्या निश्चितच अपेक्षा असतील.
त्यामुळे वित्तीय सेवा प्रदात्यांना कायम दक्ष राहून, चतुरस्र पातळीवर ग्राहकांच्या सेवा अनुभूतीच्या संवर्धनासाठी झटावे लागेल. सेवेतील बदलांना अंत नाही आणि त्यात नवनवे प्रयोग होतच राहणार. जसे एडेल्वाइजने अलीकडेच ‘वेल्थपॅक’ नावाचे एक अतिशय रंजक सेवा-उत्पादन आपल्या ग्राहकांसाठी आणले. व्यक्तिगत आर्थिक व्यवस्थापनाचे हे स्वयंचलित मोबाइल अ‍ॅप आहे. अ‍ॅण्ड्रॉइड कार्यप्रणालीवर चालणाऱ्या या अ‍ॅपद्वारे ग्राहकाच्या मोबाइलवर व्यवहार- उलाढालींची सूचना देणारे अथवा बिलांबाबत सांगणाऱ्या बँक, क्रेडिट कार्ड व अन्य सेवा प्रदात्यांकडून दाखल संदेशांची सुप्तपणे दखल घेतली जाते. या माहितीचे मग त्या ग्राहकाच्या उत्पन्न, खर्च, खात्यातील शिल्लक, भरणा होणे बाकी असलेली देयके यांच्याशी ताळेबंद जुळवून त्यांचा आर्थिक निर्णय काय असावा, याबद्दल मार्गदर्शनाचे काम केले जाते. जवळपास ५०हून अधिक बँका व क्रेडिट कार्ड प्रदात्यांच्या एसएमएस संदेशांच्या उलगडा करण्याचे सुज्ञ अल्गोरिदम्सची घडी या अ‍ॅपमध्ये बसविण्यात आली आहे. ग्राहकाच्या मोबाइल फोनने व्यक्तिगत आर्थिक सल्लागाराची जागा व्यापून घ्यायला झालेली ही तर केवळ सुरुवात आहे.
राहुल जैन 
(लेखक, एडेल्वाइज ब्रोकिंग लिमिटेडच्या रिटेल अ‍ॅडव्हायजरी विभागाचे प्रमुख आहेत.)