वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेली पॉवर मेक प्रोजेक्ट्स ही पायाभूत सुविधा पुरवणारी कंपनी इंजिनीयरिंग आणि बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट २०१५ मध्ये खुल्या भागविक्रीद्वारे (आयपीओ) ६३० रुपये अधिमूल्याने आपल्या समभागांची (३८ पट अधिक भरणा होऊन) यशस्वी विक्री करून पॉवर मेक प्रोजेक्ट्स मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध झाली. सूचिबद्ध झाल्यापासून कंपनीची शेअर बाजारातील कामगिरी तितकीशी चांगली झालेली नाही. त्यामुळे ज्यामुळे गुंतवणूकदारांना हा शेअर आयपीओद्वारे मिळाला त्यांचे तर नुकसानच झाले असेल. मात्र सध्या ४५० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटतो.

७,५०० हून अधिक कर्मचारी असणारी पॉवर मेक आज भारतातील पायाभूत क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे. कंपंनीकडे आजच्या घडीला चार लाख मेट्रिक टन क्षमता असलेल्या क्रेन्स तसेच इतर यंत्रसामग्री आहे. भारतात तसेच परदेशात सुमारे ५० साइट्स असलेल्या या कंपनीकडे अनेक मोठे प्रकल्प असून त्यांत प्रामुख्याने मोठे ऊर्जा प्रकल्प, सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर, थर्मल पॉवर, गॅस टर्बाइन, हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट्स वगैरे अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. प्रकल्प उभारणीखेरीज कंपनी अशा मोठय़ा प्रकल्पांचे देखभाल दुरुस्तीचे कामदेखील हाती घेते. कंपनीच्या ग्राहकांच्या मांदियाळीत एनटीपीसी, बीएचईएल, रिलायन्स, अडानी, लॅन्को, एल अँड टी, स्टरलाइट, सीमेन्स, जीएमआर, टाटा पॉवर, इंडियन ऑइल, अल्स्टोम अशा अनेक दिग्गजांचा समावेश आहे. केवळ १४.७१ कोटी रुपये भागभांडवल असलेल्या या कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांत १,३६२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ७४.२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला होता. पायाभूत क्षेत्राला दिलेल्या प्राधान्यामुळे येत्या दोन वर्षांत कंपनीकडून भरीव कामगिरी अपेक्षित आहे. मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पॉवर मेक प्रोजेक्ट्सचा जरूर विचार करावा.
arth07

अजय वाळिंबे stocksandwealth@gmail.com