रिलायन्स रेग्युलर सेव्हिंग्ज फंड बॅलन्स्ड ऑप्शन..
arth04शुक्रवारचे कामकाजाचे सत्र बंद झाले तेव्हा ‘सेन्सेक्स’ २७,८०३ अंकांवर, तर ‘निफ्टी’ ८,५४१ अंकांवर बंद झाले. येत्या गुरुवारी निफ्टीची सौदापूर्ती असल्याने त्या दिवशी निफ्टीची बंद पातळी ही २०१६ मधील सौदापूर्तीची सर्वोच्च पातळी असेल. ही बंद पातळी २०१६ मधले हे शिखर (किंवा शिखराच्या जवळ) असली तरी निर्देशांकांचा या वर्षीचा हा प्रवास सर्वाधिक चढ-उताराचा राहिला आहे. २०१४ मध्ये निर्देशांकांचा प्रवास फक्त वरच्या दिशेला, तर २०१५ मध्ये निर्देशांकांचा प्रवास फक्त खालच्या दिशेने झाला. २०१६ मध्ये आजपर्यंतचा प्रवास पाहिला तर प्रथम खालच्या दिशेला व अर्थसंकल्प लोकसभेत मांडल्यानंतर वरच्या दिशेने झाला. अशा चढ-उताराच्या कालावधीत ‘एनएएव्ही’मधील घट किंवा वाढ ही निर्देशांकाच्या तुलनेत कमी असल्याने मागील पाच वर्षांत जोखीमसंलग्न परताव्याच्या बाबतीत रिलायन्स रेग्युलर सेव्हिंग्ज फंड बॅलन्स्ड ऑप्शन हा फंड बॅलन्स्ड पहिल्या पाच क्रमांकांत राहिला आहे.
arth05
मागील दहा वर्षांचा त्याचा परतावा १४.७२% असल्याने या फंडाची शिफारस करण्यासाठी निवड केली. या फंडाला अस्तित्वात आल्याला मागील महिन्यांत ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या ११ वर्षांत आठ वेळा हा फंड पाच वर्षांच्या परताव्याच्या दराच्या तुलनेत, सात वेळा तीन वर्षांच्या परताव्याच्या दराच्या तुलनेत दोन वेळा एक वर्षांच्या परताव्याच्या दराच्या तुलनेत पहिल्या तीन क्रमांकांत राहिला आहे. हा फंड त्रमासिक लाभांश जाहीर करीत असल्याने, दीर्घकालीन भांडवली नफा व नियमित उत्पन्नासाठी गुंतवणूकदार या फंडाचा विचार करू शकतात. आज जे गुंतवणूकदार आपल्या सेवानिवृत्तीपश्चातच्या उदरनिर्वाहासाठी गुंतवणूक पर्यायांचा विचार करीत असतील त्यांच्यासाठी विमा कंपन्यांच्या पर्यायापेक्षा म्युच्युअल फंडाच्या बॅलन्स्ड फंडांचा पर्याय कैकपटींनी योग्य आहे.
arth06जय पारेख हे समभाग गुंतवणुकीसाठी, तर अमित त्रिपाठी हे रोखे गुंतवणुकीसाठी या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. संजय पारेख यांच्याकडे या फंडाची सूत्रे १ एप्रिल २०१२ रोजी आली. ३१ मार्च २०१२ रोजी फंडाची ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’ २२ रुपये होती. २२ जुलै २०१६ रोजी संजय पारेख व अमित त्रिपाठी यांनी या फंडाची एनएव्ही ४३.१७ रुपयांपर्यंत नेऊन ठेवली आहे. संजय पारेख हे मुंबई विद्यापीठाचे वाणिज्य शाखेचे पदवीधर असून सनदी लेखापाल आहेत. एका नियतकालिकात आर्थिक विश्लेषक म्हणून नोकरीला सुरुवात करणाऱ्या पारेख यांनी या फंड घराण्यात दाखल होण्यापूर्वी प्रभुदास लीलाधर, एएसके इन्व्हेस्टमेंट्स या दलाली पेढय़ांतून व आयसीआयसीआय प्रु.सारख्या म्युच्युअल फंडातून निधी व्यवस्थापक म्हणून अनुभव घेतला आहे. त्यांना गुंतवणूक व्यवस्थापनाचा एकूण २१ वर्षांचा अनुभव आहे.
फंडाच्या निधीपैकी कमाल ७५% गुंतवणूक समभागात, तर उर्वरित गुंतवणूक रोख्यात करणारा फंड आहे. सध्या फंडाने एकूण निधीच्या ७०% गुंतवणूक समभागात केली असून नवीन गुंतवणुकीसाठी परिस्थिती अनुकूल झाल्यास अजून ५% गुंतवणूक नव्याने समभागात करण्याची मुभा निधी व्यवस्थापकास आहे. हा फंड मल्टिकॅप प्रकारचा फंड असला तरी फंडाची गुंतवणूक लार्ज कॅपकेंद्रित राहिली आहे. हा फंड समभागकेंद्रित गुंतवणूक करणे टाळून गुंतवणुकीत वैविध्य आणणारा फंड आहे. फंडाच्या समभाग गुंतवणुकांपैकी ७८% लार्ज कॅप arth07समभाग असून २२% समभाग मिड कॅप प्रकारचे आहेत. निधी व्यवस्थापकांचा भर हा संदर्भ निर्देशांकापेक्षा अधिक परतावा (? – अल्फा) निर्माण करण्यावर राहिला असून परिस्थिती, योग्य उद्योग क्षेत्रांची निवड व या उद्योग क्षेत्रातील भांडवली वृद्धीला वाव असणाऱ्या समभागांना निधी व्यवस्थापकांची पसंती राहिली आहे. सध्या निधी व्यवस्थापकांची संदर्भ निर्देशांकाहून अधिक पसंती ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, औद्योगिक वापराच्या वस्तू व दूरसंचार यांना लाभली असून संदर्भ निर्देशांकाहून कमी गुंतवणूक आरोग्य निगा, माहिती तंत्रज्ञान, जिन्नस (कमॉडिटी), आर्थिक सेवा या क्षेत्रांत आहे. एखाद्या समभागाचे मूल्य व बाजारभाव यांच्यातील फरक डोळसपणे पाहिल्यानंतर खरेदी केल्यामुळे निवडलेल्या समभागांनी फंडाच्या परताव्यात आपला योग्य वाटा उचलला आहे. रोखे गुंतवणूक ही एखाद्या शॉर्ट टर्म फंडाप्रमाणे असून सर्वाधिक गुंतवणूक ‘ट्रिपल ए’ ही सर्वोच्च पत असणाऱ्या रोख्यांतून केलेली असून परतावा वाढविण्यासाठी १५% गुंतवणूक हलकी पत असलेल्या रोख्यांत केली आहे. रोखे गुंतवणुकींपैकी सर्वाधिक गुंतवणूक रिलायन्स पॉवरच्या रोख्यात केली आहे. उचित व्यवहाराला अनुसरून या कंपनीत गुंतवणूक करणे टाळायला हवे होते. रोख्यांची सरासरी मुदत ३.५ वर्षे आहे.

रिलायन्स रेग्युलर सेव्हिंग्ज फंड बॅलन्स्ड ऑप्शन हा फंड लाभांश व भांडवली वृद्धी या पर्यायात उपलब्ध असून मागील ११ वर्षांत फंडाने खणखणीत परतावा दिला आहे. मध्यम जोखीम असलेल्या व दीर्घ भांडवली नफ्याची अपेक्षा असणाऱ्या गुंतवणूकदारांनी सेवानिवृत्तीपश्चातच्या उदरनिर्वाहासाठीचा निधी यासारख्या भविष्यातील आपल्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी या फंडाचा विचार नक्कीच करावा. बहुतेक बॅलन्स्ड फंडातून एक वर्षांपूर्वी रक्कम काढल्यास १% अधिभार द्यावा लागतो.

arth08
या फंडाच्या गुंतवणुकीतील १०% रक्कम एक वर्षांच्या आत काढली तरी ही रक्कम अधिभार मुक्त असते हे या फंडाचे वैशिष्टय़ असल्याने हा फंड सेवानिवृत्तीपश्चात गुंतवणुकीत उजवा ठरतो. शेअर बाजाराचे निर्देशांक वर्षभराच्या उच्चांकावर असल्याने गुंतवणूक करण्यापूर्वी आपला धोका सहन करण्याची क्षमता अजमावणे गरजेचे आहे.

उत्तम चलत सरासरी..
परताव्याची चलत सरासरी हा निकर्ष फंडाची कार्यक्षमता जोखण्यासाठी अव्वल निकष समाजाला जातो. चलत सरासरी म्हणजे एका विशिष्ट एनएव्हीपासून ठरावीक कालखंडानंतर एनएएव्हीचा काढलेला परताव्याचा दर होय. फंडाच्या प्रारंभापासून १ वर्ष, ३ वर्षे, ५ वर्षे या चलत सरासरी अभ्यासल्या असता ५ वर्षांच्या गुंतवणुकीवर सरसरी परतावा १५% हून अधिक राहिला आहे. याचा अर्थ प्रत्येक सरासरी पाच वर्षांनी गुंतवणूक दुप्पट होण्याची क्षमता असलेला हा फंड आहे. फंडाची पाच वर्षांची चलत सरासरी सोबतच्या आलेखात दर्शविली आहे.

वसंत माधव कुलकर्णी – shreeyachebaba@gmail.com
(खुलासा: मागील सोमवारी या सदरात प्रसिद्ध झालेल्या अ‍ॅक्सिस लाँग टर्म इक्विटी फंडाची किमान एसआयपी १००० रुपये असे लिहिले होते. या फंडात किमान ५०० रुपये एसआयपी करता येते याची वाचकांनी नोंद घ्यावी.)