आजपर्यंत प्रत्येक येणाऱ्या नव्या रेल्वेमंत्र्यांनी राष्ट्रीय महत्त्वापेक्षा आपल्या मतदारसंघाला केंद्रस्थानी ठेवून रेल्वे अर्थसंकल्पाची मांडणी केली. माजी मंत्र्यांच्या मतदारसंघ अथवा राज्यात निघालेले रेल्वेचे कारखाने याचे उत्तम उदाहरण आहेत. ही प्रथा मोडीत काढावी रेल्वे अर्थसंकल्प वेगळा न असणे हे राष्ट्रीय हिताचे आहे. सरकारने ‘नॅशनल रेल्वे प्लॅन २०३०’ मंजूर केला. रेल्वेशी निगडित अनेक सुधारणा हाती घेतल्या असून रेल्वेशी संबंधित कंपन्या याच्या लाभार्थी असणार आहेत.

राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला. ‘राजा, चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांनंतर तू अभ्यासलेल्या चार कंपन्यापैकी चौथी कंपनी कोणती हे जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. ही कंपनी तू सांगितली नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’ वेताळाने राजाला सांगितले.
‘या आधीच्या चार कंपन्यांची उत्पादने रोजच्या वापरातील नसलेल्या म्हणूनच गुंतवणूक या दृष्टीने गुंतवणूकदारांनी विचार न केलेल्या या कंपन्या होत्या. परंतु आजची कंपनी तशी परिचित नाममुद्रेची या कंपनीची उत्पादने सहज दृष्टीला पडणारी आहेत. वरुणराजाने या वर्षी कृपा केल्याने संथ झालेली ग्रामीण अर्थव्यवस्था यंदा उभारी घेईल अशी चिन्हे असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर निर्भर असणाऱ्या कंपन्या या वर्षी चांगला नफा कमावतील, असा कयास असल्याने मी एस्कॉर्ट्स या कंपनीची निवड केली आहे. या कंपनीच्या उत्पादनांची चार भागांत विभागणी केली असून ट्रॅक्टर, बांधकाम यंत्रसामग्री, रेल्वेसाठी विशेष उत्पादने आणि दुचाकी वाहने व दुचाक्यांसाठी पूरक उत्पादने हे चार गट आहेत. कमी होणारे व्याज दर व उत्तम पाऊस यामुळे ट्रॅक्टर व दुचाकी वाहने तर सरकारचे पायाभूत सुविधा व रस्ते बांधणीला प्रोत्साहन देण्याचे धोरण असल्याने बांधकाम यंत्रसामग्री, तसेच रेल्वे सुधारणा हा सरकारचा सर्वोच्च प्राथमिकतेचा विषय असल्याने हा विभाग या वर्षी मागील पाच वर्षांतील सर्वात अव्वल कामगिरी करणे अपेक्षित आहे,’ राजाने सांगितले.
‘मागील वर्षी पावसाने पाठ फिरविल्याने व व्याज दरसुद्धा चढे असल्याने ट्रॅक्टरची विक्रीची संख्या वाढत नव्हती. पाऊस व कमी व्याज दराच्या जोडीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिकविषयक उपसमितीने १ जूनपासून अन्नधान्यांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी दिल्याने ट्रॅक्टरचे ग्राहक जे प्रामुख्याने शेतकरी असतात. त्यांच्या हातात शिल्लक असलेल्या चार पैशांत वाढ झाल्यामुळे ट्रॅक्टर विक्री या वर्षी जोम पकडेल अशी आशा वाटते. तू टीव्हीच्या पडद्यावर समभागांबद्दल बोलताना ‘व्हॉल्यूम ग्रोथ’ हा शब्द अनेकदा ऐकला असशील. मिड कॅपमध्ये ‘व्हॉल्यूम ग्रोथ’ ‘क्वांटम जम्प’ अशा शब्दांचे प्रयोग ही मंडळी नेहमीच करीत असतात. या वर्षी या दोन्ही गोष्टी एस्कॉर्ट्सच्या बाबतीत दिसून येतील. जून २०१६ मध्ये संपलेल्या तिमाहीत २०१५ मधील जून तिमाहीपेक्षा सकारात्मक बदल झालेले असून हे बदल असेच सुरू राहतील. जिन्नसांच्या किमती घटल्याने, पर्यायाने कच्चा मालाच्या किमती घटल्याने नफा वाढला असून आता उत्पादित संख्याही (व्हॉल्यूम ग्रोथ) वाढल्याने कंपनीची नफाक्षमता लक्षणीय वाढेल. ट्रॅक्टरची विक्री दोन अंकी वाढ नोंदविणे अपेक्षित आहे. एस्कॉर्ट्स ७५ ते ११० अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरची युरोपमध्ये निर्यात करीत असून हॉलंडमध्ये फार्माट्रॅक्ट या नावाने एस्कॉर्ट्सची एक उपकंपनी कार्यरत आहे. ही कंपनी युरोपमधील देशातील विक्री व सेवा यांचे व्यवस्थापन पाहते,’ राजा म्हणाला.
‘अरे ‘नमों’च्या अजेंडय़ावर रेल्वे सुधारणेला किती महत्त्व आहे ते तू ‘मन की बात’मधून ऐकले असशील. रेल्वेत १०० टक्के परकीय गुंतवणुकीला सरकारने मंजुरी दिली ती जलदगतीने माल वाहतूक व आरामदायी रेल्वे प्रवास असावा या भूमिकेतून. सध्या गतिमान रेल्वे गाडीची चाचणी सुरू असून या गाडीचा वेग वाढविण्यासाठी रेल्वेचे जाळे मजबूत करण्यावर ‘नमो’ ठाम आहेत. देशाची प्रगती वेगाने साधायची असेल तर रेल्वे व रस्ते यांत सुधारणा घडणे गरजेचे असल्याचे ‘नमों’चे मत आहे. सरकारने ‘नॅशनल रेल्वे प्लान २०३०’ मंजूर केला असून आजपर्यंत प्रत्येक येणाऱ्या नव्या रेल्वे मंत्र्यांनी राष्ट्रीय महत्त्वापेक्षा आपल्या मतदारसंघाला केंद्रस्थानी ठेवून रेल्वे अर्थसंकल्पाची मांडणी केली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे घनीखान चौधरींच्या मालदा मतदारसंघात, जाफर शरीफ यांच्या बंगळुरू व सोनिया गांधी यांच्या मतदारसंघात असलेले रेल्वेचे कारखाने निघाले. ही प्रथा मोडीत काढावी रेल्वे अर्थसंकल्प वेगळा न असणे हे राष्ट्रीय हिताचे आहे. अशा अनेक सुधारणा रेल्वेत होत असून रेल्वेशी संबंधित कंपन्या याच्या लाभार्थी असणार आहेत. या सर्व गोष्टींमुळे मागील वर्षभरात जवळजवळ दुप्पट झालेला हा शेअर पुढील दोन वर्षांत सध्याच्या पातळीवरून वाढल्याने दोन आकडय़ांत परतावा देईल अशी आशा वाटते,’ राजा विश्वासाने म्हणाला. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.
पुंगीवाला gajrachipungi @gmail.com