गेल्या काही वर्षांत जे काही चांगले ‘आयपीओ’ आले त्यात शारदा क्रॉपकेमचे नाव घ्यावे लागेल. नावाप्रमाणेच ही कंपनी प्रामुख्याने अ‍ॅग्रोकेमिकल्स व्यवसायात असून त्या खेरीज कंपनी कन्व्हेयर बेल्ट्स, औद्योगिक रसायने आणि बायोसाइड इ. उत्पादनांत आहे. कंपनीच्या अ‍ॅग्रो केमिकल्सच्या पोर्टफोलियोमध्ये फंगिसाइड, हर्बिसाइड, बायोसाइड तसेच इन्सेक्टिसाइड अशा अनेक पीक संरक्षण उत्पादनांचा समावेश होतो. कंपनी आपल्या विविध उत्पादनांचे वितरण अनेक देशांत करीत असून त्या करिता कंपनीने युरोप तसेच लॅटिन अमेरिका येथे कार्यालये उघडली आहेत. या खेरीज मेक्सिको, दक्षिण आफ्रिका आणि कोलंबिया येथे कंपनीने विपणन आणि वितरण व्यवस्थेसाठी स्वत:चे कर्मचारी नेमले आहेत. गेली काही वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी करणाऱ्या या कंपनीने गेल्या पाच वर्षांत विक्रीमध्ये वार्षिक सरासरी ३१ टक्के वाढ तर नफ्यात वार्षिक सरासरी ५३.२३ टक्के वाढ करून दाखविली आहे. जून २०१६ अखेर समाप्त तिमाहीतदेखील कंपनीने २४१.५२ कोटींच्या उलाढालीवर ३२.९१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. यंदा उत्तम पाऊस झाल्याने कृषी रसायने आणि कीटकनाशक कंपन्यांना बरे दिवस येतील अशी अपेक्षा आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे शारदा क्रॉपकेम ही केवळ कीटकनाशक किंवा कृषी रसायनांतील कंपनी नसून तिच्याकडे विविध रासायनिक उत्पादनाचा पोर्टफोलियो आहे. तसेच कंपनीवर कुठलेही कर्ज नाही. त्यामुळे इतर कंपन्यांच्या तुलनेत शारदा क्रॉपकेम उजवी ठरते. सध्या ३२५ रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर तुम्हाला मध्यमकालीन गुंतवणुकीतून चांगला फायदा करून देईल.
arth05

अजय वाळिंबे – stocksandwealth@gmail.com