’ प्रश्न : माझ्या आईचे २०१५-१६ या आर्थिक वर्षांचे उत्पन्न २,७०,००० रुपये इतके आहे. तिला कलम ८७ अ नुसार करसवलत मिळू शकेल का?
– भूषण गुरव, नाशिक
उत्तर : आर्थिक वर्ष २०१५-१६ (म्हणजेच कर निर्धारण वर्ष २०१६-१७ साठी) कलम ८७ अ नुसार कमाल मर्यादा २,००० रुपये इतकी आहे. आपली आई ज्येष्ठ नागरिक नाही असे गृहीत धरल्यास २,७०,००० रुपये उत्पन्नावर २,००० रुपये इतका कर देय आहे. करपात्र उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे कलम ८७ अ नुसार २,००० रुपयांची करवजावट मिळेल आणि म्हणजे त्यांना काहीच कर भरावा लागणार नाही. पुढील वर्षांसाठी कलम ८७ अ ची मर्यादा ५,००० रुपये इतकी करण्यात आली आहे.

’ प्रश्न : माझ्या पत्नीने १९९१ मध्ये एक निवासी जमीन (भूखंड) ६५,००० रुपयांना विकत घेतला होता. आता ती आम्ही या वर्षी म्हणजे २०१६-१७ या आर्थिक वर्षांत ४५ लाख रुपयांना विकण्याचा विचार करीत आहोत. आम्ही नवीन जागा विकत घेऊ इच्छित नाही. हे पैसे आम्हाला रोख्यात गुंतवायचे आहेत. ते कधी आणि किती गुंतवावे? हे माझ्या पत्नीच्या २०१६-१७ या आर्थिक वर्षांच्या विवरणपत्रात दाखवावे लागेल का?
– राजाराम धानुमली, ईमेलद्वारे
उत्तर : निवासी जमीन (भूखंड) विक्रीवर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असेल. हा दीर्घ मुदतीचा नफा खालीलप्रमाणे :
विक्री किंमत : ४५,००,००० रुपये
खरेदी किंमत : ६५,००० रुपये
महागाई निर्देशांकानुसार खरेदी मूल्य :
१९९१-९२ सालचा महागाई निर्देशांक = १९९
२०१६-१७ सालचा महागाई निर्देशांक = ११२५
महागाई निर्देशांकानुसार खरेदी मूल्य : ६५,०००७ ११२५/१९९ = ३,६७,४२६ रु.
दीर्घ मुदतीचा भांडवली नफा : ४१,३२,५३८ रुपये
या भांडवली नफ्यावर कर वाचविण्यासाठी भांडवली नफ्याएवढी रक्कम ‘कलम ५४ ईसी’नुसार रोख्यात सहा महिन्यांच्या आत गुंतवावी लागेल. हा व्यवहार आपल्याला विवरणपत्रात दाखवावा लागेल.

’ प्रश्न : मी मे २०१६ मध्ये एक निर्माणाधीन घर विकत घेतले. यासाठी बिल्डरला काही पैसे दिले, बाकीचे पैसे त्याला वेळोवेळी द्यावयाचे आहेत. घराचा ताबा मला दोन वर्षांनंतर मिळणार आहे. मी माझे राहते घर, जे मी मे २००९ मध्ये विकत घेतले होते, ते विकण्याचा विचार करीत आहे. वरील निर्माणाधीन घर विकत घेतल्याने मला राहत्या घराच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यास मदत होईल का? मी नवीन घर खरेदीचे काही पैसे राहत्या घर विक्रीतून न देता माझ्या बचतीतून दिले तर चालतील का?
– प्रियांका म्हात्रे, ईमेलद्वारे
उत्तर : प्राप्तिकर कायदा कलम ५४ नुसार घर विक्रीतून होणाऱ्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावरील करसवलत घ्यावयाची असेल तर घर विक्री केल्याच्या एक वर्षांपूर्वी किंवा विक्री केल्यानंतर दोन वर्षांच्या आत (बांधले तर ३ वर्षे) नवीन घरामध्ये भांडवली नफ्याएवढी गुंतवणूक करावी लागते. या काळामध्ये नवीन घराचा ताबा मिळणे आवश्यक असते. या नवीन घरासाठी पैसे आपण आपल्या बचतीतून देऊ शकता. ही गुंतवणूक निर्माणाधीन घरात केली असल्यामुळे त्या घराचा ताबा कधी मिळतो ते महत्त्वाचे आहे. नुसते घर बुक केले आणि ताबा वरील काळात घेतला नाही तर कलम ५४ नुसार करसवलत मिळू शकणार नाही. नवीन घराचा ताबा आपल्याला दोन वर्षांत मिळणार आहे. त्यामुळे कलम ५४ प्रमाणे अटीची पूर्तता होते. आपण राहत्या घराची विक्री केल्यानंतर भांडवली नफ्याएवढी गुंतवणूक नवीन घरामध्ये झाली नसेल तर ते पैसे आपल्याला भांडवली खात्यात (कॅपिटल गेन अकाऊंट स्कीम, १९८८) ठेवावे लागतील आणि या खात्यातून नवीन घराचे बाकीचे पैसे द्यावे लागतील. हे खाते त्या वर्षीचे विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी, म्हणजे हा व्यवहार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये झाला तर आपल्याला ३१ जुलै २०१८ पूर्वी उघडावे लागेल.

’ प्रश्न : मी एका खासगी कंपनीत नोकरी करतो. याशिवाय मी शेअर्स खरेदी आणि विक्रीचे व्यवहार करतो. आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये मला शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांच्या शेअर विक्रीतून एकूण २१,००० रुपयांचा तोटा झाला. यामध्ये ४५,००० रुपयांचा दीर्घ मुदतीचा तोटा आणि २४,००० रुपयांचा अल्प मुदतीचा नफा याचा समावेश आहे. या व्यवहारावर मला कर भरावा लागेल का?
– संकेत जाधव, ईमेलद्वारे
उत्तर : प्राप्तिकर कायद्यानुसार लघू मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी आणि दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी वेगळ्या तरतुदी आहेत. शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या शेअरच्या विक्रीवर (ज्यावर शेअर उलाढाल कर (एसटीटी) भरलेला आहे) जर दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला तर तो कलम १० (३८) प्रमाणे करमुक्त आहे. हा नफा करमुक्त असल्यामुळे दीर्घ मुदतीचा भांडवली तोटय़ाचा फायदा कर वाचविण्यासाठी घेता येत नाही. उदाहरणार्थ, तो इतर भांडवली नफ्याच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही किंवा पुढील वर्षी कॅरी फॉरवर्डदेखील करता येत नाही. त्यामुळे त्याची वजावट आपल्याला लघू मुदतीच्या भांडवली नफ्यातून घेता येणार नाही. लघू मुदतीच्या भांडवली नफ्यावर आपल्याला कर भरावा लागेल.

’ प्रश्न : मी पगारदार नोकर आहे. माझे उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. मी माझे पैसे माझ्या पत्नीच्या नावाने बँकेच्या मुदत ठेवीत गुंतविले आहेत. आणि त्यावर तिला मागील वर्षी १,२५,००० रुपये इतके व्याज मिळाले. तर माझ्या पत्नीला विवरणपत्र भरावे लागेल का?
– सौरभ देशमुख
उत्तर : कलम ६४ नुसार पत्नीच्या किंवा पतीच्या नावाने योग्य मोबदल्याशिवाय हस्तांतरित केलेल्या मालमत्तेवर मिळालेले उत्पन्न, मालमत्ता हस्तांतर करणाऱ्याच्या उत्पन्नात मिसळले जाते. यानुसार आपण पत्नीच्या नावाने केलेल्या मुदत ठेवींवर मिळालेले व्याज आपल्या उत्पन्नात गणले जाईल आणि त्यानुसार आपल्याला कर भरावा लागेल. पत्नीला इतर दुसरे उत्पन्न नसल्यास विवरणपत्र भरणे गरजेचे नाही.

’ प्रश्न : मला माझ्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकूण दीड लाख रुपयांची रोख भेट मिळाली. भेट देणाऱ्यांमध्ये माझ्या मित्रांचा आणि नातेवाईकांचा समावेश आहे. ही रक्कम मला विवरणपत्रात दाखवावी लागेल का? यावर मला कर भरावा लागेल का?
– संदीप काळे
उत्तर : प्राप्तिकर कायद्यानुसार ५०,००० रुपयांपर्यंत मिळालेल्या भेटी करमुक्त आहेत. यामध्ये ठरावीक नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटींचा समावेश नाही. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या दीड लाख रुपयांच्या भेटींमध्ये ठरावीक नातेवाईकांच्या भेटी किती आणि इतरांच्या किती ते काढावे लागेल. यामध्ये नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटीच्या व्यतिरिक्त भेटींची रक्कम ५०,००० पेक्षा जास्त असेल तर ती रक्कम आपल्या करपात्र उत्पन्नात जोडली जाते. उदा. (अ) दीड लाख रुपयांपैकी ९०,००० रुपयांच्या भेटी ठरावीक नातेवाईकांकडून मिळाल्या असतील आणि ६०,००० रुपयांच्या भेटी इतरांकडून मिळाल्या असतील तर ६०,००० रुपये करपात्र उत्पन्नात गणले जातील. हे उत्पन्न ‘इतर उत्पन्नात’ दाखवून आपल्या विहित कर दराप्रमाणे (स्लॅब) कर भरावा लागेल. उदा. (ब) दीड लाख रुपयांपैकी १,१०,००० रुपयांच्या भेटी ठरावीक नातेवाईकांकडून मिळाल्या असतील आणि ४०,००० रुपयांच्या भेटी इतरांकडून मिळाल्या असतील तर इतरांकडून मिळालेल्या भेटी ५०,००० रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे हे करपात्र उत्पन्न गणले जाणार नाही.

’ प्रश्न : मी ज्येष्ठ नागरिक आहे. माझ्या उत्पन्नामध्ये निवृत्तिवेतन, घरभाडे, मुदत ठेवींवरील व्याज यांचा समावेश आहे. या उत्पन्नावर उद्गम कर (टीडीएस) कापला जातो. परंतु याशिवाय मला २२,००० रुपयांपर्यंत कर भरावा लागतो. हा कर मी कधी भरावा, जेणेकरून मला व्याज कमीत कमी भरावे लागेल?
– सदानंद सावंत
उत्तर : निवासी भारतीय करदात्यांसाठी ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये धंदा किंवा व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश नाही अशांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होत नाहीत. त्यामुळे आपला देय कर हा विवरणपत्र भरण्यापूर्वी (कोणतेही व्याज न भरता) जमा करता येतो.

’ प्रश्न : मी दोन वर्षांपूर्वी २०१४ मध्ये माझे घर विकून नवीन घरात पैसे गुंतविले. त्यामुळे मला झालेल्या १२ लाख रुपयांच्या भांडवली नफ्यावर मी कर भरला नाही. परंतु काही कारणास्तव मला दोन वर्षांपूर्वी घेतलेले नवीन घर विकावयाचे आहे. हे घर मी २३ लाख रुपयांना २०१४ मध्ये विकत घेतले होते. आता या घराचे मला ३० लाख रुपये इतके मिळतील. या विक्री व्यवहारावर मला कर भरावा लागेल का?
– किरण परब
उत्तर : आपण दोन वर्षांपूर्वी कलम ५४ नुसार वजावट घेतली होती. या कलमानुसार नवीन घर विकत घेतल्याच्या तारखेपासून तीन वर्षांपूर्वी विक्री किंवा हस्तांतरित केले तर ही वजावट मिळत नाही. नवीन घराच्या विक्रीचा भांडवली नफा काढताना पूर्वी कलम ५४ नुसार घेतलेली वजावट खरेदी किमतीतून वजा करावी लागते. आपल्याला होणारा भांडवली नफा हा खालीलप्रमाणे :
नवीन घराची विक्री किंमत =
३०,००,००० रुपये
नवीन घराची खरेदी किंमत =
२३,००,००० रुपये
वजा : कलम ५४ नुसार २०१४ मध्ये घेतलेली वजावट : १२,००,०००रुपये
भांडवली नफ्यासाठी खरेदी किंमत :
(२३,००,००० – १२,००,००० रुपये) = ११,००,००० रुपये
लघू मुदतीचा भांडवली नफा :
१९,००,००० रुपये
हा नफा आपल्या उत्पन्नामध्ये गणला जाऊन त्यावर आपल्याला उत्पन्नाच्या विहित कर दराप्रमाणे (स्लॅब) कर भरावा लागेल.
प्रवीण देशपांडे
* लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार असून, वाचक त्यांना pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर आपले प्रश्न पाठवू शकतील.