* प्रश्न: माझे मुंबईत घर आहे जे मी २००० साली विकत घेतले आहे. मी पुण्यात अजून एक घर २०११ साली विकत घेतले आहे. या पुण्याच्या घरावर मी गृह कर्ज घेतले आहे. मुंबईचे घर विकून पुण्याच्या घराचे गृह कर्ज परत फेडले तर मला भांडवली नफ्यावर भराव्या लागणाऱ्या करावर सूट मिळू शकेल काय?
– राजेंद्र राऊत, मुंबई

उत्तर :
मुंबईचे घर विकले तर आपल्याला होणाऱ्या दीर्घ मुदतीच्या नफ्यावर आपल्याला कर भरावयाचा नसेल तर नवीन घरात गुंतवणूक करावी लागेल किंवा रोख्यांमध्ये गुंतवणूक करावी लागेल; परंतु या पैशातून आपण गृह कर्ज फेडले तर भांडवली नफ्यावर कर भरावा लागेल.

* प्रश्न:
मी बाजार समिती येथे अडत्या आहे. आम्हाला खरेदी/विक्रीवर दोन टक्के कमिशन मिळते. आयकर विवरणपत्र कशा प्रकारे दाखल करावे? आयकर कायद्याच्या तरतुदीप्रमाणे एकूण खरेदी-विक्रीच्या आठ टक्के नफा दाखविणे बंधनकारक आहे का? वरील प्रमाणे न दाखविल्यास आयकर कायद्याप्रमाणे सनदी लेखापालाकडून ऑडिट करावे लागेल का?
– जयंत, ईमेलद्वारे

उत्तर :
प्राप्तिकर ‘कलम ४४ एडी’प्रमाणे काही पात्र करदात्यांना पात्र धंद्यातून होणाऱ्या एकूण विक्रीवर ८ टक्के इतका नफा दाखवून, या कलमाप्रमाणे विवरणपत्र भरल्यास, प्राप्तिकर कायद्यातील काही तरतुदींचे पालन माफ केले जाते. जसे त्यांना लेखे ठेवणे बंधनकारक नाही, त्याचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक नाही. हे कलम फक्त निवासी भारतीय वैयक्तिक, हिंदू अविभक्त कुटुंब आणि भागीदारी संस्था यांना आणि ज्यांच्या उत्पन्नात धंद्याच्या उत्पन्नाचा समावेश आहे त्यांनाच लागू होते. पात्र धंद्यामध्ये व्यवसाय, कमिशन, दलालीचा धंदा, एजन्सी व्यवसाय किंवा मालवाहतुकीचा व्यवसाय यांचा समावेश नाही. म्हणजेच हे धंदे करणाऱ्यांना कलम ४४ एडी लागू होत नाही. या कलमांतर्गत काही अटी आहेत. ठळक अटी अशा- (अ) करदात्यांच्या धंद्याची वार्षिक उलाढाल १ कोटी रुपयांपेक्षा (आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून ही मर्यादा २ कोटी रुपये करण्यात आली आहे) कमी असावी (ब) नफा हा उलाढालीच्या ८ टक्के किंवा जास्त असावा (क) या नफ्यातून कोणत्याही खर्चाची किंवा घसाऱ्याची वजावट मिळत नसावी (ड) भागीदारी संस्था असेल तर भागीदारांना दिल्या जाणाऱ्या वेतन आणि व्याजाची वजावट या ८ टक्के नफ्यातून घेता येते (ही वजावट आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून रद्द करण्यात आली आहे).
जर अशा पात्र करदात्यांचे पात्र धंद्यातून वार्षिक उलाढालीच्या ८ टक्क्यांपेक्षा कमी नफा असेल तर लेखे ठेवणे आणि त्याचे सनदी लेखाकाराकडून परीक्षण करून घेणे बंधनकारक आहे. आपण अडत्याचा व्यवसाय करता, त्यामुळे हे कलम आपल्याला लागू होत नाही.

* प्रश्न: मी माझ्या मुलीच्या नावाने काही पैसे मुदत ठेवींमध्ये गुंतविले होते. या गुंतवणुकीवर तिला २८,००० रुपये वार्षिक व्याज मिळते. आता ती २० वर्षांची आहे. तिला विवरणपत्र भरावे लागेल का? हे उत्पन्न माझ्या उत्पन्नात मिसळले जाईल काय?
शंकर गुंजे, ईमेलद्वारे

उत्तर :
आता मुलगी सजाण झाली आहे. त्यामुळे हे उत्पन्न आपल्या उत्पन्नात मिसळले जाणार नाही हे उत्पन्न तिचेच समजले जाईल. तिचे उत्पन्न कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा म्हणजेच २,५०,००० रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे विवरणपत्र भरणे बंधनकारक नाही. या उत्पन्नावर बँकेने उद्गम कर (टीडीएस) कापला असेल तर विवरणपत्र दाखल करून कराचा परतावा मागता येईल.

3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
share market today
शेअर बाजारात नव्या उच्चांकाची गुढी; Sensex ची ७५००० हजारांच्या पुढे उसळी
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश
Hero MotoCorp sales
बाकी कंपन्यांची उडाली झोप, Hero ची बाजारपेठेत ‘हिरोगीरी’; विक्रीत मोठी वाढ, बाईक खरेदीसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा

* प्रश्न: माझे वय ३० वर्षे आहे. मी पगारदार नोकर आहे. माझे एकूण उत्पन्न ३,२५,००० रुपये आहे आणि ‘कलम ८० सी’प्रमाणे गुंतवणूक वजा जाता करपात्र उत्पन २,५०,००० रुपयांपेक्षा कमी आहे. मला विवरणपत्र भरणे गरजेचे आहे का?
आनंद शिंदे, ईमेलद्वारे

उत्तर
: आपले एकूण उत्पन्न (कलम ८० सीच्या वजावटी गृहीत न धरता) कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेच्या म्हणजेच आपल्यासाठी २,५०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे.

* प्रश्न:
मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. मागील वर्षी मला शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर ५,१०० रुपये इतका लघु मुदतीचा भांडवली नफा झाला. माझे इतर उत्पन्न ‘कलम ८० सी’नुसार गुंतवणुका वजा जाता २,८०,००० रुपये इतके आहे. मला ५,१०० रुपयांच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागेल का? मला माझ्या विवरणपत्रात प्रत्येक शेअरच्या खरेदी-विक्रीची माहिती द्यावी लागेल का?
श्रीराम कुलकर्णी, ईमेलद्वारे

उत्तर : आपले एकूण उत्पन्न (भांडवली नफा विचारात घेऊन) ३,००,००० रुपयांपेक्षा (ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे) कमी असल्यामुळे आपल्याला कर भरावा लागणार नाही. विवरणपत्रात आपल्याला एकूण विक्री किंमत आणि खरेदी किंमत दाखवून नफा किती झाला तो दाखवावा लागेल. प्रत्येक खरेदी आणि विक्रीची माहिती देणे गरजेचे नाही.

* प्रश्न: गेल्या चार महिन्यांत चार वेळा मी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालो. यातील काही खर्च माझ्या मुलाने, मुलीने व जावयाने केला. मेडिक्लेम पॉलिसीतून मिळालेल्या परताव्यातून मी त्यांचे पैसे परत करू शकतो का? यातील पैसे मी ज्याचे त्याला परत न केल्यास मला मेडिक्लेमद्वारे मिळालेल्या परताव्यावर कर भरावा लागेल का?
– डॉ. गोविंद सबनीस, ईमेलद्वारे

उत्तर :
मेडिक्लेम पॉलिसीतून मिळालेल्या परताव्यातून आपण त्यांना पैसे धनादेशाद्वारे देऊ शकता. आणि हे पैसे आपण परत केले नाहीत तरी त्यावर आपल्याला कर भरावा लागणार नाही.

* प्रश्न: माझी एका चाळीमध्ये खोली असून या चाळीचे पुनर्निर्माण होत आहे. नवीन इमारत होईपर्यंत रहिवाशांना राहण्यासाठी तात्पुरती सोय म्हणून भाडय़ाने जागा घेण्यासाठी बिल्डरने रहिवाशांना महिना १५,००० रुपये भाडे धनादेशाने दिलेले आहे. हे भाडे वर्षांचे एकदम दिलेले आहे. तसेच स्थलांतर भत्ता म्हणून १५,००० रुपये दिले आहेत. मी एका खासगी कंपनीत नोकरीला असून माझे मुदत ठेवीचे व्याजदेखील येते. राहण्यासाठी माझ्या नावावर दुसरीकडे जागा नाही. माझा प्रश्न असा आहे की, बिल्डरने दिलेले भाडे विवरणपत्रात दाखवावे लागेल का? दाखविल्यास ते करपात्र आहे का?
सत्यवान दुखंडे, ईमेलद्वारे

उत्तर : बिल्डरकडून मिळालेले भाडे हे ‘इतर उत्पन्नात’ गणले जाते. जर आपण भाडय़ाच्या घरात राहात असाल तर आपण दिलेले घरभाडे या उत्पन्नातून वजा करता येईल. आपण दिलेले घरभाडे जर आपल्याला बिल्डरकडून मिळालेल्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर त्यावर कर भरावा लागणार नाही. आणि जर आपण दिलेले घरभाडे आपल्याला बिल्डरकडून मिळालेल्या उत्पन्नापेक्षा कमी असेल तर त्या फरकावरच्या उत्पन्नावर कर भरावा लागेल. घरातील सामान स्थलांतर करण्यासाठी मिळालेला भत्ता हा करपात्र नाही.

* प्रश्न: मागील लेखात आपण असे सांगितले होते की, पुढील वर्षांपासून (आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून) कलम १०(३८) नुसार शेअर्स वरील दीर्घ मुदतीचा भांडवली नफा, जो करमुक्त आहे, तोसुद्धा विवरणपत्र भरण्याच्या उत्पन्नाच्या मर्यादेत गणला जाईल. याचा अर्थ असा आहे का हा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा करपात्र झाला आहे?
 सुनीता देसाई, ईमेलद्वारे

उत्तर :
कलम १०(३८) नुसार शेअर्स वरील दीर्घ मुदतीचा भांडवली नफा हा करमुक्तच आहे आणि तो पुढील वर्षीसुद्धा करमुक्तच आहे. विवरणपत्र भरण्यासाठी उत्पन्नाच्या काही मर्यादा आहेत. करदात्याचे उत्पन्न ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्यांना विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. मागील वर्षांपर्यंत कलम १०(३८) नुसार शेअर्स वरील दीर्घ मुदतीच्या भांडवली नफा विवरणपत्र भरण्याच्या उत्पन्नाच्या मर्यादेत गणला जात नव्हता तो आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून यासाठी गणला जाईल.

* प्रश्न:
मी डिसेंबर २००२ मध्ये एक गोडाऊन १,६८,७५० रुपयांना विकत घेतले होते. त्यावर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी असे ३४,३६० रुपये खर्च केले होते. हे गोडाऊन माझ्या धंद्यासाठी मी वापरत होतो. या गोडाऊनच्या व्यतिरिक्त माझ्याकडे कोणतीही मालमत्ता नाही. दर वर्षी मी ५ टक्के इतकी घसाऱ्याची वजावट धंद्याच्या उत्पन्नात घेत आहे. हे गोडाऊन मी एप्रिल, २०१५ मध्ये ६,६०,००० रुपयांना विकले. मी
ही रक्कम कोठेही गुंतविली नाही. हा दीर्घ मुदतीचा नफा असल्यामुळे मला महागाई निर्देशांकाचा फायदा घेऊन कर वाचविता येईल का?
– रवींद्र अम्भावणे, ईमेलद्वारे

उत्तर : आपण गोडाऊन वर घसाऱ्याची वजावट धंद्याच्या उत्पन्नातून घेत आला आहात. यामुळे, गोडाऊन जरी तीन वर्षांनंतर विकले तरी यावर होणारा नफा हा लघु मुदतीचाच असतो. आणि त्यावर महागाई निर्देशकांचा फायदा घेता येत नाही. हा लघु मुदतीचा नफा काढताना गोडाऊनची एकूण खरेदी किंमत (खरेदी किंमत आणि खरेदीवर झालेला मुद्रांक आणि नोंदणी शुल्क) वजा मार्च, २०१५ पर्यंतचा घसारा ही रक्कम विक्री किमतीतून वजा केल्यानंतर येणारी बाकी रक्कम हा लघु मुदतीचा भांडवली नफा असेल. म्हणजेच :
विक्री किंमत :                                          ६,६०,००० रुपये
खरेदी किंमत :                                         १,६८,७५० रुपये
अधिक खरेदीसाठी झालेला खर्च :               ३४,३६० रुपये
एकूण खरेदी किंमत :                              २,०३,११० रुपये
वजा : ३१ मार्च २०१५ पर्यंत घसारा* १,०१,४५० रुपये
(* घसारा हा दर वर्षी ५टक्के इतका विचारात घेऊन)
बाकी रक्कम                                         १,०१,६६० रुपये
लघु मुदतीचा भांडवली नफा                  ५,५८,३४० रुपये
हा लघु मुदतीचा नफा आपल्या उत्पन्नात गणला जाऊन आपल्याला उत्पन्नानुसार कर टप्प्याप्रमाणे (स्लॅब) त्यावर कर भरावा लागेल.
* लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार असून, वाचक त्यांना pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर आपले प्रश्न पाठवू शकतील.