पुण्याच्या सदाशिव पेठेतील ‘लोकसत्ता’च्या वाचक पालवी भावे   यांनी टीसीएसने घोषणा केलेल्या पुनर्खरेदीबाबत (बायबॅक) प्रश्न विचारला आहे. त्यांचे समभाग त्यांनी टीसीएसच्या पुनर्खरेदी योजनेत कंपनीला विकावे किंवा कसे, हा प्रश्न विचारला आहे.

टीसीएसने १,६०० कोटी खर्च करून आपले ५.६१ कोटी समभाग प्रत्येकी २,८५० रुपये दराने खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. या खरेदीनंतर कंपनीचे भागभांडवल २.८५ टक्क्यांनी कमी होईल. एकूण भागभांडवलापैकी ७३.३१ टक्के समभाग टाटा सन्स, टाटा इंडस्ट्रीज व टाटा समूहाच्या अन्य गुंतवणूक कंपन्यांच्या मालकीचे आहेत. ‘सेबी’च्या नियमानुसार शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यात प्रवर्तकांचे भागभांडवल किमान ७५ टक्के असणे गरजेचे आहे. टीसीएसच्या प्रवर्तकांना त्यांचे कंपनीतील भागभांडवल ७५ टक्क्यांपेक्षा वाढून द्यायचे नसेल तर किमान ८८ लाख समभाग या पुनर्खरेदी योजनेत कंपनीला विकावे लागतील. सामान्यत: एखादी कंपनी जेव्हा आपले समभाग विकत घेते, तेव्हा प्रवर्तकांचा वाटा वाढत असतो, परंतु टीसीएसच्या बाबतीत प्रवर्तक आपले समभाग कंपनीला विकतील हे या योजनेचे वेगळेपण लक्षात घेणे गरजेचे आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही कंपनीला समभाग दिलेत तरी ते सर्व समभाग स्वीकारण्याचे बंधन कंपनीवर नाही. या पुनर्खरेदीला विद्यमान समभागधारकांकडून किती प्रतिसाद मिळतो त्यावर किती प्रमाणात समभाग स्वीकारायचे ते ठरते. सामान्यत: लबाड प्रवर्तक कंपनीचा भाव जेव्हा कमी असतो, तेव्हा पुनर्खरेदीच्या योजना आखतात. दुसरी गोष्ट अशी की कंपनी आपले समभागांची पुनर्खरेदी ही टेंडर पद्धतीने की खुल्या बाजारातून करेल हेसुद्धा पाहणे आवश्यक असते. जेव्हा ही खरेदी टेंडर पद्धतीने होते, तेव्हा सर्व भागधारकांना गुंतवणुकीची समान संधी उपलब्ध असते. आज शेअर बाजार निर्देशांक सार्वकालिक उच्चांकाच्या जवळ असताना ही पुनर्खरेदी होत आहे.

टीसीएसने ८५० दराने समभागांची खुली विक्री करून जुलै २००४ मध्ये बाजारात दमदार पदार्पण केले. समभागांचे नोंदणीच्या पहिल्याच दिवशी २६ टक्के अधिमूल्याने व्यवहार सुरू झाले. नोंदणी झाल्यापासून टीसीएसने दोन वेळा (जुलै २००७ व जून २००९) बक्षीस समभाग दिले आहेत. भांडवली वृद्धीव्यतिरिक्त नोंदणी झाल्यापासून ७३३.५० रुपये भागधारकांना लाभांशाच्या रूपाने परत मिळाले आहेत.

तज्ज्ञांच्या मते गुंतवणुकीवर नफा कमाविण्याची ही संधी असली तरी माझे मत फार वेगळे आहे. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या बाबतीत त्यांना अन्य उद्योगांप्रमाणे अवजड यंत्रे असलेले कारखाने, कच्चा माल खरेदीसाठी व तयार उत्पादने साठवणे वगैरेसाठी खेळते भांडवल आणि उत्पादने विकण्यासाठी विपणन व विक्री दालने यांची गरज नसते. हा उद्योग भांडवलापेक्षा कुशल मनुष्यबळावर आधारलेला आहे. साहजिकच हा उद्योग मोठय़ा प्रमाणावर रोकडनिर्मिती करणारा व्यवसाय असल्याने या कंपन्यांच्या ताळेबंदात रोकडमूल्य असलेल्या गुंतवणुकांचा समावेश असतो. या कंपन्यांचा लाभांशाचा दरदेखील अधिक असतो. तरीसुद्धा या रोकडीचा वापर करण्याची म्हणजे अन्य कंपन्या खरेदी करण्याची संधी नेहमीच मिळते असे नाही. लाभांश देण्यावर मर्यादा असल्याने साहजिकच ही रोकड कंपनीने आपल्या समभागांची खरेदी करण्यासाठी वापरली तर त्यात वावगे नाही.

कंपनीच्या प्रारंभिक खुल्या विक्रीनंतर टीसीएसचे नेतृत्व तीन वेळा बदलले. नोंदणी झाली त्या वेळी फकीरचंद कोहली कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांच्या निवृत्तीनंतर कंपनीची धुरा रामदोराई यांच्याकडे व रामदोराई यांच्यानंतर नटराजन चंद्रशेखरन यांच्याकडे आली. आता चंद्रशेखरन यांची नियुक्ती टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून झाल्यावर राजेश गोपीनाथ यांच्याकडे कंपनीची धुरा २१ फेब्रुवारीपासून आली आहे. राजेश गोपीनाथ यांच्यासाठीदेखील ही कंपनी नवी नाही. या सर्वच मंडळींनी टीसीएस उत्तमरीत्या चालविली.

अमेरिकेच्या व्हिसा व एकूण वाणिज्यविषयक बदलत्या धोरणामुळे सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या बाबतीत चिंता व्यक्त होताना दिसत आहे. याचे कारण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा वृद्धीदर हा अन्य क्षेत्रांतील कंपन्यांपेक्षा अधिक असतो. भविष्यात या कंपन्यांच्या नफ्यात हा वृद्धीदर दिसणार नाही अशी व्यक्त होत असलेली भीती जरी खरी असली, तरी अन्य उद्योगांपेक्षा हा वृद्धीदर निश्चितच अधिक असेल. टीसीएस भागधारकांना सढळहस्ते लाभांश देणारी व प्रसंगी बक्षीस (बोनस) समभाग देणारी कंपनी आहे. अशा कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी वारंवार येत नसते. एखाद्या कंपनीकडे व्यावसायिक पद्धतीने मूल्यांकनाआधारे पाहण्याचे कसब सामान्य गुंतवणूकदारांकडे नसते. हे लक्षात घेता केवळ कंपनीने पुनर्खरेदीची योजना आखली व बाजारातील विक्रीपेक्षा अधिक भाव मिळतो म्हणून वैयक्तिक गुंतवणूकदारांनी आपले समभाग कंपनीला विकणे योग्य नव्हे.

राजेश तांबे arthmanas@expressindia.com