niyojanbhan32आजच्या भागात सुभाष किसन सोनावणे (वय ५९) यांचे आíथक नियोजन जाणून घेऊ. सोनावणे हे त्यांची पत्नी सुनंदा (वय ५५) व त्यांची मुलगी सुषमा (वय २९) यांच्यासोबत सेवानिवृत्तपश्चात जीवन जगत आहेत. सुनंदा या गृहिणी आहेत, तर सुषमा या गेल्या तीन वर्षांपासून खासगी बँकेत नोकरी करत आहेत. सुभाष सोनावणे हे महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून प्रथम वर्ग अधिकारी म्हणून जून महिन्यात सेवानिवृत्त झाले. मूळचे सांगली जिल्ह्य़ातील इस्लामपूरचे असलेल्या सोनावणे यांचे वास्तव्य सध्या अंबरनाथ येथे आहे. त्यांनी आपल्या नोकरीतील कालावधी ठाणे व रायगड जिल्ह्य़ात व्यतीत केला. मुलगी मोठी झाल्यावर शिक्षणासाठी म्हणून आपले कुटुंब अंबरनाथ येथे ठेवले. त्यांच्याशी झालेल्या बोलण्यातून त्यांच्यातील एक कुटुंबवत्सल पिता कायम डोकावत होता. ‘‘एकदा का सुषमाचे लग्न झाले, की आम्ही दोघे गावाकडे जाऊन निवांत राहू,’’ असे ते म्हणाले. हे नियोजन लिहिताना वरील इंदिरा संतांच्या या ओळी कायम साथ करत होत्या. म्हणून आजची सुरुवात याच ओळींनी केली.
सोनावणे यांच्याकडे सहा लाखांच्या मुदत ठेवी आहेत. त्यांना दरमहा २३ हजाराचे निवृत्तिवेतन मिळणार आहे. त्यामुळे दैनंदिन खर्चाची तजवीज निवृत्तिवेतनातून होईल. निवृत्तीपश्चात लाभाचे २८ लाख मिळाले आहेत. त्यापकी काही रक्कम सुषमाच्या लग्नासाठी बाजूला ठेवून उर्वरित रकमेचे नियोजन करावे, अशी त्यांची इच्छा आहे. सुषमाच्या लग्नासाठी म्हणून सहा लाख वेगळे काढून उर्वरित रकमेचे नियोजन करावे, असे ठरले. लग्न नक्की कधी होईल, हे आज निश्चित सांगता येणार नसल्याने सहा लाख रुपये हे त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये याप्रमाणे तीन लिक्विड फंडात गुंतविण्याचा सल्ला दिला. मागील एका वर्षांत प्रथितयश लिक्विड फंडांनी नऊ टक्के परतावा दिला आहे; परंतु रिझव्‍‌र्ह बँकेकडून अपेक्षित असलेली दरकपात झाली, तर हा परताव्याचा दर कमी होण्याची शक्यता आहे.
सोनावणे यांना नोकरीत असताना असलेले आरोग्य विम्याचे कवच सेवानिवृत्तीनंतर संपुष्टात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स या सरकारी विमा कंपनीची ‘सेवा स्वास्थ्य’ या नावाची समूह विमा योजना आहे. या योजनेचे सभासदत्व ३१ मार्च २०११ नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना घेता येते.
इतर आरोग्य विमा योजनांच्या तुलनेत महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी ही सर्वोत्तम व सर्वात स्वस्त अशी योजना आहे. म्हणून सोनावणे यांनी या योजनेचे सभासदत्व घेणे त्यांच्या हिताचे आहे.
सेवानिवृत्तीनंतर बचतीची क्रयशक्ती टिकविणे हे सेवानिवृत्तांच्या समोरचे आव्हान असते. यासाठी सोनावणे यांना समभागात गुंतवणूक करणाऱ्या योजनांची शिफारस केली जाते; परंतु सोनावणे यांनी यापूर्वी कुठल्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली नाही.
या कारणाने त्यांना म्युच्युअल फंड गुंतवणूक व ती करण्याची कारणे हे थोडक्यात समजावले. सुषमा ज्या बँकेत काम करतात ती बँक भारतातील अव्वल म्युच्युअल फंड विक्रेती आहे, हे कारण पटल्याने त्यांनी सुषमा यांच्या सल्ल्याने गुंतवणूक करावी, असे ठरले. ही गुंतवणूक झाल्यावर उर्वरित रक्कम बचत खात्यात आणीबाणीसाठीची तरतूद म्हणून ठेवावी.
नियोजनातून  घ्यायचा धडा :
सोनावणे यांनी याआधी कधीही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली नसल्यामुळे त्यांना गुंतवणूक करण्यापूर्वी ‘केवायसी’ करणे आवश्यक आहे. प्रत्येक गुंतवणुकीत सुनंदा या सहगुंतवणूकदार असतील तर सुषमा यांचे नामनिर्देशन असणे जरुरीचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक म्हणजे मुदत ठेव नव्हे. गुंतवणुकीचा महिन्यातून एकदा तरी लेखाजोखा घेणे जरुरीचे आहे.
सुभाष सोनावणे यांनी आíथक नियोजनासाठी करावयाच्या गोष्टी :
 ‘सेवा स्वास्थ्य’ या न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सच्या समूह आरोग्य विमा योजनेचे सदस्यत्व स्वीकारणे.
 सुषमाच्या लग्नाची तरतूद म्हणून वेगळे ठेवायचे सहा लाख वेगवेगळ्या लिक्विड फंडांत गुंतविणे. सुचविलेले फंड : यूटीआय मनी मार्केट फंड, एलआयसी नुमोरा लिक्विड फंड, अ‍ॅक्सिस लिक्विड फंड ७-८%
 प्रत्येकी दोन लाख इन्डेक्स फंडात गुंतविणे. सुचविलेले फंड : एचडीएफसी इन्डेक्स फंड आयसीआयसीआय (सर्व निफ्टी प्लॅन) -१४%
 म्युच्युअल फंडात दोन लाख गुंतविणे (स्मॉल व मिड कॅप) सुचविलेले फंड : एसबीआय इमìजग बिझनेस, डीएसपी ब्लॅक रॉक मायक्रो कॅप १९-२०%
 दोन म्युच्युअल फंडांच्या योजनेत चार लाख गुंतविणे (लार्ज कॅप) सुचविलेले फंड : एचडीएफसी इक्विटी, आयसीआयसीआय फोकस्ड ब्ल्यू चीप १४-१५%
 सहा लाख रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडात प्रत्येकी दोन लाख गुंतविणे. सुचविलेले फंड : जेपी मोर्गन शॉर्ट टर्म इन्कम फंड, एचडीएफसी शॉर्ट टर्म, फंड आयसीआयसीआय प्रु. शॉर्ट टर्म १०-१०.५%
(लाल रंगातील % म्हणजे येत्या दोन वर्र्षांतील वार्षकि परताव्याचा अंदाजे दर)