11नवीन अथवा जुन्या (सेकंड हँड) ट्रक घेण्यासाठी वित्तीय सहाय्य हवे असेल तर पहिले नाव डोळ्यासमोर येते ते श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीचे.

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी ही श्रीराम समूहाची सर्वात जुनी आणि फ्लॅगशिप कंपनी. १९७९ मध्ये दक्षिण भारतात स्थापन झालेली श्रीराम समूहाची ही कंपनी ही सध्या भारतातील सर्वात मोठी व्यापारी वाहन वित्त पुरवठादारकर्ती म्हणून ओळखली जाते. भारतभरात ७४२ शाखांचे जाळे, १२ लाखांहून अधिक ग्राहक आणि ५९,००० कोटी रुपयाचे संपत्ती व्यवस्थापन (एयूएम-अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट) असलेली ही देशातील एकमेव कंपनी असावी. गेली ३६ वष्रे वित्तीय व्यवसायात असलेल्या या कंपनीची गुंतवणूक आता विमा व्यवसाय (सर्वसाधारण आणि जीवन), ग्राहक वित्त, समभाग दलाली आणि इतर बिगर बँकिंग वित्त पुरवठय़ातदेखील आहे. कंपनीचे मार्च २०१५ साठीचे आíथक निष्कर्ष नुकतेच जाहीर झाले आहेत. गेल्या आíथक वर्षांसाठी कंपनीने ४,११२.९४ कोटी रुपयांच्या व्याज उत्पन्नावर १,२३७.८१ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. गत वर्षांच्या तुलनेत तो यंदा कमी असला तरी कंपनीचे उत्तर आणि पूर्व भारतातील विस्ताराचे बेत पाहता तसेच व्यापारी वाहन उद्योगाला आशेचे दिवस दिसू लागल्याने येत्या दोन वर्षांत कंपनीचे भवितव्य अजून उजळेल असे वाटते. सध्या या क्षेत्रात २५% बाजार हिस्सा असलेल्या या कंपनीचा बाजार हिस्सा येत्या दोन वर्षांत ३०% पर्यंत गेल्यास हा ‘हाय बिटा’ शेअर खरेदीसाठी आकर्षक वाटू शकतो. निराशाजनक निकालामुळे आणि मंदीसदृश वातावरणामुळे ८०० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर अजूनही खाली येण्याची शक्यता आहे. योग्य वेळ साधून मध्यम ते दीर्घ कालीन गुंतवणुकीसाठी खरेदी करावा.
stocksandwealth@gmail.com

9