भविष्यासाठी ठरविलेल्या आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी उपयुक्त गुंतवणूक पर्यायांविषयी सखोल माहिती देणारे मासिक सदर..

गत वर्षभरात या सदरात आर्थिक नियोजन म्हणजे काय व ते कसे करावे हे आपण पाहिले. ई-मेलमार्फत वाचकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला, त्यातून बऱ्याच जणांबरोबर झालेल्या चर्चेतून हे लक्षात आले की, गुंतवणूक सल्लागारांकडून गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय सुचविले तर जातात; परंतु या गुंतवणुकींचे इतर फायदे-तोटेही जाणून घेण्याची लोकांना गरज जाणवत आहे. प्रत्येक गुंतवणूक पर्यायाचे फायदे काय, ते केव्हा घेणे योग्य आहे, कर नियोजनाच्या दृष्टीने त्याचा खरेच उपयोग होऊ  शकतो काय? असेल तर कसा आणि नसेल तर कर कार्यक्षम गुंतवणुका कोणत्या? वगैरेसह आपण गुंतविलेले पैसे, ते जेथे गुंतविले गेले आहे त्या कंपन्या किंवा त्या स्कीम, त्याचे व्यवस्थापन कसे करतात. त्यातून आपल्याला कशा प्रकारे व किती परतावा मिळू शकतो, असे अनेकांचे स्वाभाविक प्रश्न आहेत. सर्वानीच हे आपणहून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर निर्णय चुकणार नाहीत.

वरील मुद्दय़ांना धरून या वर्षी आपण काही गुंतवणूक पर्यायांविषयी सखोल आढावा घेणार आहोत ज्यामध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश असेल.

– गुंतवणुकीचे लहान लहान पर्याय, ‘पीपीएफ’चे आर्थिक नियोजनातील महत्त्व

– विम्याचे योग्य पर्याय कुठल्या गरजेसाठी कुठले घेतले पाहिजेत

– शेअर बाजार म्हणजे जुगार की दीर्घकालीन गुंतवणूक?

– म्युच्युअल फंड कसे काम करते, त्यात आपल्या ध्येयांसाठी योग्य गुंतवणूक कशी करता येईल?

तसेच, निश्चलनीकरणानंतर तुम्हाला चलनटंचाई जाणवलीच असेलच. आपल्या सर्वाना नेहमीच वापरात असलेले बचत खाते / चालू खाते माहिती आहेच. रोकड नाही म्हणून आपण डेबिट कार्ड, नेटबँकिंग, पेमेंट वॉलेट वापरण्यास सुरुवात केली. हे सुरक्षित आणि रोख रकमेला पर्याय म्हणून वापरण्यास सुलभ आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातून केलेल्या खर्चाच्या  स्टेटमेंट उपलब्ध असल्यामुळे नोंदी राहतात. परिणामी केलेल्या खर्चाचा आढावा आपण सहज घेऊ  शकतो. पुढे मग खर्चाचा पाठपुरावा केल्यास बचतीत वाढही करता येऊ  शकते. या बचतीत वाढीचा उपयोग ध्येयपूर्तीच्या गुंतवणुकीसाठी करता येऊ  शकतो. ते कसे हे आपण सविस्तर पाहू.

प्रत्येक वेळी जेव्हा बँकेत खाते उघडता किंवा नवीन गुंतवणूक करता जसे की म्युच्युअल फंड किंवा विमा घेता, तेव्हा दर वेळी तुमचे ‘केवायसी’ पुरावे – पॅन कार्ड, निवासाचा दाखला द्यावा लागतो. तुमची ही माहिती मध्यवर्ती डेटाबेसमध्ये सुरक्षित ठेवली जाते. ही माहिती त्या गुंतवणुकीबरोबर जोडली जाते व त्याकरवी तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतील कंपन्या/बँक या माहितीद्वारे तुमच्याबरोबर पत्रव्यवहार करतात. कायद्याच्या दृष्टीनेही हे अतिशय महत्त्वाचे का आहे, हे करताना कोणती खबरदारी घ्यावी यासबंधी आपण सविस्तर पाहणार आहोत.

Although, no one can go back and make a brand new start, anyone can start from now and make a brand new ending.

–  Carl Brad

पूर्वी घेतलेले निर्णय आपण बदलू शकत नाही आणि काळही बदलता येत नाही; परंतु यापुढे गुंतवणुकीसंदर्भात आपण जे काही निर्णय घेऊ  ते पूर्ण माहिती व विचाराअंती घेता यावे यासाठी हे गुंतवणूक पर्यायांविषयीचे सखोल माहिती देणारे सदर आपणासाठी घेऊन येत आहोत. विविध गुंतवणूक पर्यायांची सखोल माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे हा यामागचा उद्देश आहे.

लेखक आर्थिक नियोजनातील ‘सीएफपी’ पात्रताधारक व सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत. त्यांच्याशी ई-मेल kiran@fingenie.in  वर संपर्क साधता येईल.

निवड कशी?

  • शेअर बाजार म्हणजे जुगार की दीर्घकालीन गुंतवणूक?
  • म्युच्युअल फंड कसे काम करते, त्यात आपल्या ध्येयांसाठी योग्य गुंतवणूक कशी करता येईल?
  • गुंतवणुकीचे लहान लहान पर्याय, ‘पीपीएफ’चे आर्थिक नियोजनातील महत्त्व.
  • विम्याचे योग्य पर्याय कुठल्या गरजेसाठी कुठले घेतले पाहिजेत