niyojan2दीर्घकालीन संपत्तीची निर्मिती केवळ समभाग गुंतवणुकीतूनच शक्य आहे. बँकांच्या मुदत ठेवी बँकांना समृद्ध करतात ठेवीदारांना नाही. हे लक्षात घेऊन आपल्या गुंतवणुकीचे नियोजन करावे हाच  सल्ला आजच्या नियोजनभानच्या निमित्ताने देता येईल.
एखाद्याला आíथक नियोजनात एक विशिष्ट पद्धतीचे नियोजन सुचविले होते म्हणून तेच नियोजन मलाही लागू होते असे समज करून मेल लिहिणाऱ्या वाचकांची संख्या कमी नाही. वस्तुत: ज्यांचे नियोजन प्रसिद्ध होते त्यात संबंधितांची आवश्यक तितकीच माहिती दिली जाते. उदाहरण देऊन सांगायचे तर कोणाला एखाद्या वर्षांत नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करायचा असतो, तर सध्या नोकरीत असलेल्या कोणा तरुणाला परदेशातील शिक्षण घेण्यासाठी किंवा नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊन सरकारी अधिकारी बनण्यासाठी नोकरी सोडायची असते. आपल्या भविष्यातील या योजना सार्वजनिक करण्याची अनेकांची तयारी नसते. परंतु नियोजनात मात्र या गोष्टी विचारात घेतलेल्या असतात. साहजिकच इतरांनी हे नियोजन जसेच्या तसे स्वत:ला लागू होते असे मानणे धोक्याचे आहे. या सदरातून प्रसिद्ध झालेल्या कोणा एकीच्या व आपल्या आíथक परिस्थितीत साम्यस्थळे आढळल्याने आपलेही नियोजन असेच आहे असे वाटलेल्या, परंतु प्रत्यक्षात ते का व कसे वेगळे आहे हेही ज्यांना पटले त्यांची ही गोष्ट.
सुखदा दामले (३४) या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एका कंपनीत तंत्रज्ञ आहेत. पुण्याच्या सहकार नगर भागात त्या व त्यांच्या आई रहातात. मोठा विवाहित भाऊ व त्याचे कुटुंब याच इमारतीत स्वतंत्र राहतात. भाऊ रांजणगाव येथील वाहन उद्योगात नोकरी करतो तर त्याची पत्नी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत नोकरी करते. सुखदा यांचे वार्षकि वेतन २८ लाख असून करपश्चात वेतन २२ लाख आहे. सुखदा यांनी ६५ लाखांचे गृह कर्ज घेतले असून यापकी ५० लाखांची फेड अद्याप शिल्लक आहे. सुखदा यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत ११ लाख जमा आहेत.
av-03
सुखदा यांच्यावर विशेष जबाबदारी नसणे; सुखदा यांचे सध्याचे वय व अजून २५ वर्षांची शिल्लक असलेली नोकरी तसेच अद्याप फेडायचे शिल्लक असलेले गृहकर्ज याचा विचार करता त्यांना एलआयसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, एसबीआय लाईफ, बिर्ला सनलाईफ या चार विमा कंपन्या सुचविल्या यापकी त्यांनी निवड केलेल्या विमा कंपनीचा ५० लाखाचे विमा छत्र देणारा व २५ वष्रे मुदतीच्या विम्यासाठी त्या ९,००० रुपयांचा हप्ता भरणार आहेत. त्यांच्या आई या पॉलिसीच्या लाभार्थी असणार असल्याने दुर्दैवाने विम्याचा दावा दाखल करण्याची वेळ आलीच तर कुणी मदतनीस असावा या दृष्टीने विम्याची खरेदी ऑफलाईन पद्धतीने म्हणजे कुणा विक्रेत्यामार्फत करावी असे सुचविण्यात आले. जेणेकरून विम्याच्या दाव्याची पूर्तता करण्यास  हा विक्रेता सहाय्य करेल.

सुखदा यांना मोठय़ा रकमेचा जीवन विमा घेण्याचा सल्ला दिला नसला तरी मोठय़ा रकमेचा आरोग्य विमा घेण्याचे सुचविले. आयसीआयसीआय लॉम्बॉर्डची ‘सिक्युअर माइंड’ ही पॉलिसी प्रस्तावित केली. नोकरी पेशातील कर्जदारांनी या पॉलिसीचा त्यांच्या नियोजनात जरुर विचार करावा. ही पॉलिसी प्रामुख्याने एखाद्या अपघातामुळे किंवा निरनिराळ्या १८ गंभीर आजारामुळे पूर्ण अथवा अंशत: अपंगत्व आल्यास नोकरी सोडावी लागणे अशा प्रकारचा प्रसंग ओढवल्यास संरक्षण देणारी पॉलिसी आहे. सुखदा जोपर्यंत सुदृढ आहेत तोपर्यंत गृहकर्जाचा हप्ता भरतीलच. परंतु एखाद्या अपघातामुळे अथवा आजारपणामुळे नोकरी करणे अशक्य झाल्यास मोठय़ा कर्जाच्या हप्त्यापासून  विमा संरक्षण देणारी ही पॉलिसी आहे. या पॉलिसीत अंतर्भूत असलेल्या एखाद्या आजाराचे निदान जरी झाले तरी संपूर्ण विमाछत्राइतकी रक्कम विमाधारकाला मिळते. सुखदा यांनी ५० लाखांपर्यंत विमा संरक्षण घेतल्यास ४४ हजाराचा  हप्ता भरावा लागेल. सुखदा यांची रोकड सुलभता पाहता पुढील तीन वर्षांत गृहकर्ज फेडण्याचा त्यांना सल्ला दिला होता. परंतु हा सल्ला सुखदा यांना अस्वीकृत वाटल्याने ही पॉलिसी घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. सुखदा यांना त्यांच्या कंपनीच्या समूह आरोग्य विमा योजनेतून तीन लाखाचे आरोग्य विमा छत्र लाभले आहे. परंतु हे विमाछत्र पुरेसे नाही. कारण एखाद्या गंभीर आजारावर उपाय करण्यास अधिक रक्कम लागते. म्हणून या समूह आरोग्य विमा संरक्षण देणाऱ्या पॉलिसीवर दहा लाखांपर्यंतचे ‘टॉप अप’ असणे जरूरीचे आहे.
सुखदा यांच्याकडे मोठी रोकड सुलभता आहे. त्या भरत असलेल्या गृहकर्जाच्या हप्त्यात किमान ५० टक्के वाढ त्या सहज करू शकतात. परंतु त्या वाढ करू इच्छित नाहीत. परंतु दरवर्षी मिळालेल्या बोनसचा विनियोग गृहकर्ज फेडण्यासाठी त्या करणार आहेत. त्यांच्याकडे आठ लाखांच्या बँकांच्या मुदत ठेवी आहेत. पीपीएफ खाते नाही. सध्या गृहकर्जाची परतफेड सुरु असल्याने प्राप्तिकराची वजावटीस पात्र दीड लाख रुपयांची गुंतवणूक बहुतांशी ईपीएफ व गृहकर्जाची परतफेड या मध्ये होऊन जात असल्याने सुखदा यांनी कर नियोजनाचा फारसा विचार केलेला नाही. या वर्षीपासून ५० हजारापर्यंत गुंतवणूक राष्ट्रीय पेन्शन योजनेत (एनपीएस) केल्यास प्राप्तिकराच्या कलम ८० सीसीडी (१) व (२) खाली ही गुंतवणूक वजावटीस पात्र समजली जाऊन अंदाजे १५,००० अतिरिक्त कर वजावट मिळू शकेल. एनपीएस खाते उघडताना ५० टक्के समभाग गुंतवणूक हा विकल्प त्यांनी स्वीकारावा. आठ लाखांच्या बँकेतील ठेवीचे फेरनियोजन करणे गरजेचे आहे. या ठेवी रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या योजनेत गुंतावाव्या.
सुखदा यांनी समभाग गुंतवणुकीचा किंवा समभाग गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड यांचा कधीच विचार केलेला नाही.  सुखदा या गेली आठ वष्रे ज्या कंपनीत नोकरी करीत आहेत त्या कंपनीचे दरमहा पाच समभाग विकत घेतले असते तरी आज त्यांच्याकडे ७२० समभाग झाले असते व अंदाजे १० लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे आजच्या बाजारभावाप्रमाणे १६ लाख रुपये झाले असते. समभाग गुंतवणुकीच्या दीर्घकालीन परताव्याच्या दराशी अन्य कुठल्याही मालमत्तेच्या परताव्याची तुलना होऊ शकत नाही. हे सुखदा यांना पटवून दिल्यावर त्या समभाग गुंतवणूक करण्यास तयार झाल्या. दीर्घ काळ चालणाऱ्या (२० वष्रे) म्युच्युअल फंडांच्या एसआयपीच्या माध्यमातून सेवा निवृत्तीवेळी अडीच ते तीन कोटीचा कोष ( सोबतच्या कोष्टकात तपशील) निर्माण करण्याचे वित्तीय ध्येय निश्चित करण्यात आले.
shreeyachebaba@gmail.com